Sunday, September 18, 2016

" भटक्या कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा



" भटक्या  कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा

या शीर्षकाखाली मी लिहिलेला एक उपरोधिक लेख अंदाजे दीड वर्षांपूर्वी " नवा काळ " या दैनिकांमध्ये छापून आला होता.
शनिवार , १७ सप्टेंबर, २०१६ च्या " लोकसत्ता  " या वृत्तपत्रामध्ये " भटका कुत्रा  ' राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करा या मथळ्याखाली श्री. यशवंत भागवत - पुणे या एका " जागरूक नागरिकाने " वाचकांच्या पत्राद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वरून हे सिद्ध होत आहे कि भले उशिरा का होईना पण या प्रश्नाचे गांभीर्य आता नागरिकांना कळायला लागले आहे हे हि नसे थोडके.
आपल्या माहितीसाठी मी पूर्वी लिहिलेला  " भटक्या  कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा हा लेख येथे पुन्हा देत आहे.

" भटक्या  कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा

मी एक अति सामान्य असा क्षुद्र असा  भारतीय नागरिक आहे ज्याला या लोकशाही असलेल्या देशात काडीचीही किंमत दिली जात नाही.

माझी किंमत फक्त काही दिवसांपुरतीच असते आणि ती म्हणजे निवडणुकीच्या काळात. त्याकाळात मी फक्त काही दिवसांसाठी राजा झालेला असतो. पण निवडणुकीचे निकाल जाहीर होतात आणि मी धप्पकन जमिनीवर कोसळतो  परत एक क्षुद्र भारतीय म्हणून पुढील वर्षे खडतर आयुष्य जगत असतो. बर असही नाही कि मी कर भरता किव्वा कर चुकवून जगतो. मी सामान्य नोकरदार असल्याने भारतातील सगळे लागू असलेले कर मी नित्यनियमाने भारत असतो , भरून सांगतो कुणाला नाहीतर माझ्यावर लगेचच करचूकवेगिरीची  कारवाई  अतिशय तत्परतेने केली जाते.  

माझ्या सारख्याच्या करदात्याला जेव्हा भटका   कुत्रा चावतो तेव्हा माझ्यासारख्याचे " कुत्र्यापेक्षाही वाईट  हाल होतात" . अरेच्या चुकलोच मी . मला माफ करा मी एक जुनी झालेली पण आजच्या काळात अयोग्य असणाऱ्या अश्या म्हणीचा वापर केला. कारण आजच्या काळात भटक्या कुत्र्यांचे  वाईट हाल होतच नाहीत या उलट मानव प्राण्यांचेच हाल हे भटके कुत्रे चावल्यावर होतात.

असो मुद्दा असा कि जर मला एखादा भटका कुत्रा चावला तर मी शासकीय रुग्णालयात जावू शकत नाही कारण त्यांच्याकडे बऱ्याचदा नेमकी ती औषधे , लसी यांचा साठा ही उपलब्ध नसतो त्यामुळे मला शीव येथील शासकीय रुग्णालयात  पाठविले जाते अथवा के एम या परेल येथे असलेल्या रुग्णालयात पाठविले जातेइथून तिथून रुग्णालयात धावण्यात मी ( म्हणजे ज्याला श्वान दंश झाला आहे तो ) अगदी अर्ध मेला होवून जातो. हे सगळ टाळण्यासाठी मग खाजगी दवाखान्यात जातो महाग अश्या त्या INJECTION चा ठराविक असा COURSE पुरा करावा लागतो. या महाग अश्या औषधाच्या खर्चानेच माझ्या सारख्याचे कंबरडे मोडले जाते.

पण जर श्वान दंश लहान मुलांना झाला असेल तर त्यांची अवस्था  फारच बिकट असते . ( आपल्या माहितीसाठी सांगतो श्वान दंश झालेल्यांपैकी अंदाजे ८० % रुग्ण हे ते या वयोगटातील असतात. ) या लहान मुलांना श्वान दंशाची जखम अतिशय वेदनादायक असते. या बिचाऱ्या लहान मुलांना " तोंड  दाबून बुक्याचा मारहि म्हण तंतोतंत लागू होतेत्यांच्या उपचारादरम्यान त्या मुलांचे त्या बरोबरच  त्यांच्या पालकांचे असे काही हाल होतात किभिक नको पण कुत्र आवर " या म्हणीचा प्रत्यय येतो. हि म्हण मी थोडी कालानारूप बदलतो नवीन म्हण आहे " श्वानदंशाचा औषधोपचार नको पण भटक कुत्र आवर. ".

असे कळाले आहे कि अगदी परवा एका माननीय , आदरणीय  अश्या एका आमदार साहेबांना भटका कुत्रा चावला तर त्यांच्यासाठी एक परदेशातून अंदाजे २०,००० / ४०,०००  रुपये किमतीचे INJECTION आणणारमला एक आपला साधा प्रश्न पडला आहे ( साध्या माणसाला साधाच प्रश्न पडतो ) कि आतापर्यंत हजारो , लाखो सामान्य नागरिकांना भटका कुत्रा चावला तेव्हा कोणालाच याची गरज नाही लागली आताच कशी काय एकदम याची गरज लागली ?

एका कवितेत कवी मंगेश पाडगावकर म्हणतात किप्रेम म्हणजे प्रेम असत , तुमच आमच , तुमच आणि आमच सेम  असत " त्याच धर्तीवर आता म्हणव लागेल कि " श्वान दंश ,  श्वान दंश  हा सेम नसतो , आमदारांचा श्वान दंश हा सामान्य नागरिकाच्या श्वान दंशा पेक्ष्या फारच वेगळा असतो. "

मला असे कळाले आहे कि खाजगी दवाखान्यात श्वान दंश झाल्यावर VACCINE चे DOSES दिले जातात पण ठा पा च्या रुग्णालयात मात्र च्या ऐवजी नच दिल्या जातात कारण म्हणे त्यांच्या कडे या VACCINE चा आवश्यक असा साठा नसतो. यावर अजून काय लिहिणार

माझे ( अति शुद्र अश्या सामान्य माणसाचे ) दुख इथेच संपले नाही. समजा जर माझ्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला अथवा मला हल्ला होईल अशी शंका जरी आली म्हणून मी हातात एखादा दगड / काठी घेवून त्यांना मारला अथवा मारायला गेलो तर काही विशिष्ठ असे भारतीय नागरिक कोठून तरी उगवतात , कुत्र्याला मारले तर पोलिसांना सांगू आत मध्ये  टाकू अशी धमकी देतात. काही जण तर लगेचच पोलिसांना दूरध्वनी करतात अश्या वेळेला पोलिस तत्परतेने येतात माझ्यासाख्या अति सामान्य शुद्र माणसाला अटक करून घेवून जातात . खटला चालवितात . म्हणजे या भारतात मानवाला  स्व संरक्षण करण्याचा अधिकार हि वापरायची परवानगी नाही असेच म्हटले पाहिजे . आपण " बैल मुझे मारहा एक वाक्प्रचार वापरत असतो , त्या ऐवजी " कुत्ते माझे काट " असा नवीन वाक्प्रचार सध्याची परिस्थिती बघून प्रचलित  होवू  शकतो . .

मराठीत एक म्हण आहे "माय मरो पण मावशी जगो ". आजच्या भारतातील  एक म्हण मी  तुम्हाला सांगतो ती तुम्ही लक्ष्यात ठेवा " माणूस मरो पण भटका कुत्रा जगो ".

या सगळ्यावर मार्ग काढायला एवढ्या वर्षात एकाही राजकीय पक्षाला वेळ मिळाला नाही. का नाही मिळाला याचे विश्लेषण मी येथे करणार नाही कारण ते सगळ्या भारतीयांना माहित आहे. यावर माझ्या सारख्या एका अति क्षुद्र नागरिकाच्या मनात एक विचार आला . अहो हसू नका भारतात क्षुद्र नागरिकही विचार करू शकतात , पण त्यांची ते कोणासमोर बोलण्याची / मांडण्याची हिम्मत नसते कारण आतापर्यंत आम्हाला कोणी बोलूच दिले नाही.

असो. माझी भारतीय सरकारला एक नम्र मागणी आहे कि भारताचा राष्टीय प्राणी बदला  “ भटका कुत्रा " याला  भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करा .  हे  असे करणे भारतात काही अवघड नाही जर भारतात शहरांची , विमानतळाची , विद्यापीठाची  नावे बदलली जातात तर मग राष्ट्रीय प्राणी आपण का नाही बदलू शकत ?

दुसरी  माझी सरकारला महत्वाची विनंती आहे कि  जागो जागी रस्त्याच्या कडेला खांब उभे करावे म्हणजे या भटक्या कुत्र्यांना एक पाय वर करणे ( लघवी करणे ) फारच सोयीचे होईल .

रस्त्याच्या कडेला जनतेला मुतारी नसली तरी चालेल पण भटक्या  कुत्र्यांसाठी मात्र खांब हवेच. या खांबांचा अजून एक उपयोग म्हणजे राजकारण्यांना त्यांच्या वाढदिवसाचे प्रत्येक खांबावर फलक लावता येतील. या फलकाला कोणीही अनधिकृत म्हणू शकणार नाही.

नाक्या नाक्यावर भटक्या कुत्र्यांसाठी पाणी पिण्याची सोय हवी . हे पाणी BISLERI चे असावे म्हणजे त्यांना नळाच्या अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग होणार नाहीत. ( नागरिकांना मात्र साध नळाचेच पाणी द्यावे कारण त्यांना BISLERI पाणी हे पचणार नाही  ).  त्याच्या बाजूला दिवसातून तीन वेळा भटक्या कुत्र्यांसाठी सकस अश्या अन्नाची व्यवस्था शासनाने चुकता करावी. अगदी त्यासाठी शाळेतील मध्यांन भोजन थांबवावं लागले तरी चालेल. पण शाळेतील मध्यान्न्न भोजना सारखे या भटक्या कुत्र्यांच्या अन्नात किडे नसावेत . या मध्यान्न्न भोजनाचे कंत्राट त्या विभागातील नगरसेवकाच्या / नगरसेविकेच्या नातेवाईकालाच द्यावे .

ठाण्यातील ५० % तलाव  ( सध्यां सजीव असलेल्या तलावांपैकी )  या भटक्या कुत्र्यांच्या अंघोळीसाठी ( डुम्बण्यासाठी राखीव करावी ) . ठाण्यातील ५० % मैदाने ( अनधिकृत बांधकामातून वाचलेल्या मैदानांपैकी  ) भटक्या कुत्र्यांसाठी  राखीव ठेवावीत म्हणजे त्यांना बागडायला बरे पडेल.  ज्याप्रमाणे  काही ठिकाणी JOGGERS PARK असतात त्याप्रमाणे “ STRAY DOG PARK “  युद्ध पातळीवर बनवावेत .

अजून एक महत्वाच विसरलो . या भटक्या कुत्र्यांच्या शरीर स्वास्थाबाद्दल आपण कसे काय विसरू शकतोप्रत्येक प्रभाग समिती मध्ये एक तरी प्राण्यांचा डॉक्टर असावा. सगळ्या भटक्या कुत्र्यांची नित्य नियमाने शारीरिक तपासणी करावी ज्यामुळे त्यांचे शरीर स्वास्थ्य चांगले राहील.

विसरू नकात  भारत देशाला भटक्या कुत्र्यांची नितात्न्त गरज आहे माझ्या मते " भटके कुत्रे " ही एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावीजगभर भटका कुत्रा ही एक नष्ट होत असलेली प्राण्यांची जमात आहे. अगदी चीन या देशातही भटके  कुत्रे  रस्त्यावर  पाहायला मिळत नाहीत.

आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो कि भारताबाहेरील अनेक प्रगतशील देशांनी भटक्या कुत्र्यांना उपद्रव करतात म्हणून मारून टाकले आहे. रोमानिया या देशा तील  संसदेने तर एका वर्षाच्या मुला वर  भटक्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला म्हणून देशातील सगळे भटके कुत्रे ( अंदाजे ५०,००० भटके कुत्रे )  मारण्यासाठी विधेयक पारित केले. म्हणे त्यांच्याकडे मानवी जीवाला जास्त किंमत आहे. अगदी विचित्रच मागासलेला  देश म्हणायचा तो जेथे मानवी जीव हा भटक्या कुत्र्यापेक्षा महत्वाचा मानला जातो.

केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याने " STRAY DOG TOURISM " या नावाने भारताची  जगभर योग्य प्रकारे जाहिरात करावी ज्यामुळे अनेक प्रगत देशातील नागरिक " भटका कुत्राही अनोखी , नष्ट होत चाललेली प्राणी जात पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतात येतीलत्यामुळे भारताला अतिशय उपयोगी अशी  परदेशी गंगाजळी मिळेल. भारतात पर्यटनाला ही चालना मिळेल.

प्रत्येक कुत्री वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते  एका वेळेला १२ पिल्लांना जन्म देते . त्यामुळे कुत्रीच्या बाळंत पणाची योग्य जबाबदारी ही शासनाने घ्यावी ज्यायोगे या पिल्लांच्या जगण्याचे प्रमाण वाढेल म्हणजेच कुत्र्यांच्या पिल्लांच्या मृत्यूचे  ( बाल मृत्यूंचे ) प्रमाण कमी होईल त्या पिल्लांची योग्य काळजी घ्यावी म्हणजे या पिल्लांचा कुपोषणाने देखील मृत्यू होणार नाही . (  मानवी प्राण्यांच्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होताच आहे , तो तसाच झाला तरीही चालेल )

हिंदी सिनेमा मध्ये " कुत्ते मै तेरा खून पी जावूंगा " असा एक संवाद असतो . या पुढे असे वाक्य कोणत्याही सिनेमा मध्ये आले तर त्या निर्मात्यावर , लेखकावर, कलाकारावर अत्रोसिटी ( ATROCITY ) च्या कलमाखाली खटला भरण्यात यावा. त्याच प्रमाणे भारतीय नागरिकाला " कुत्ते कि मौत " , " कुत्ते कि औलाद " अशी कुत्र्यांची बदनामी होणारी वाक्ये उच्चारायला कायद्याने मनाई केली पाहिजे . जो अशी वाक्ये उच्चारेल अथवा लिखाणात वापरेल त्या व्यक्तींवर देखील अत्रोसिटी च्या कलमाखाली कारवाई करण्यात यावी.

जो चित्रपट निर्माता " कुत्ता मेरा साथी " असा कुत्र्यांची महती सांगणारा चित्रपट काढेल त्याला ५० % अनुदान द्यावे, तो चत्रपट करमुक्त करावा

जसा वर्षातून वेगवेगळा दिवस ( friendship  day सारखा ) साजरा केला जातो तसा " भटका कुत्रा दिवस”  शासकीय पातळीवर सर्वत्र साजरा केला जावा. त्या दिवशी सुट्टी देण्यात यावी.  शाळेत विद्यार्थ्यांना भटक्या कुत्र्यांचे महत्व पटवून द्यावे. कुत्र्यांवर चित्रकला, फोटो , निबंध अश्या वेगवेगळ्या स्पर्धा घाव्यात.

ज्या आमदार , खासदार , नगरसेवक यांच्या मतदार संघात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असेल त्यांना " महाराष्ट्र भूषण " , " ठाणे भूषण " , " मुंबई भूषण " , " नागपूर भूषणअसा पुरस्कार , सन्मान पत्र रोख रक्कम देण्यात यावी.

प्रत्येक निवासी संकुलामध्ये किमान घर हे भटक्या कुत्र्यांसाठी राखून ठेवाव. ज्या निवासी संकुलात भटके कुत्रे यांची संख्या जास्त असेल त्यांच्या PROPERTY TAX मध्ये भरघोस  सवलत द्यावी.
जे  नागरिक , भटक्या  कुत्र्याला " हाड " असे चुकून जरी म्हणाले तरीही तो  एक गंभीर असा दखल पात्र असा  गुन्हा ठरवून अश्या लोकांवर कठोर अशी कारवाई करावी. कुत्र्याच्या चुकीमुळे सुद्धा तो गाडीखाली येवून त्याचा मृत्यू झाला तरीही , गाडी चालविणाऱ्याला ताबडतोब अटक करून कठोर अशी शिक्षा  ताबडतोब सूनवावी. सलमान खान च्या खटल्यां सारखा खटला लांबवू नये.  

हे सगळ केल्यावर श्वान दंशाच्या घटना कमी होतील.

चला भटक्या कुत्र्यांची संख्या एवढी वाढवूया कि महाराष्ट्राचे    आपोआपच भारताचे  नाव Guinness Book of World Records मध्ये आणूया.


No comments:

Post a Comment