Friday, September 2, 2016

" वाहतूक पोलिस मित्र " एक कविता

" वाहतूक पोलिस मित्र "

नमस्कार ,

परवा , मुंबईतील एक वाहतूक पोलीस विलास शिंदे हे कर्त्यव्य बजावीत असताना त्यांच्या वरील जीव घेण्या हल्ल्यात बळी पडले हि दुर्दैवी गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे.

दुखः याचे आहे कि नागरिकाला जर वाहतूक पोलिसाने नियम न पाळल्याबद्दल विचारल्यावर तो नागरिक असे कृत्य करतो ?

दुर्दैवाने " वाहतूक पोलीस " हि काय चीज आहे याचे अनेकांच्या खिसगणतीतच नसते. अंदाजे एक वर्षांपूर्वी माझ्याकडून " वाहतूक पोलिस मित्र " हि एक कविता लिहिली गेली . हि कविता " दक्षता " या पोलीस खात्याकडून काढल्या जाणाऱ्या मासिकात देखील छापून आली होती.

माझी सगळ्यांना विनंती आहे कि कधी तरी , फेसबुक वर GOOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT टाकण्यापेक्षा , नेहमी स्वतःची छबी काहीही कारण नसताना फेसबुक वर टाकण्यापेक्षा , येते जाता , एखाद्या वाहतूक पोलिसाला एखादी पाण्याची बाटली द्या, एखादा बिस्कीट चा पुडा द्या , एवढाही खर्च नसेल करायचा नसेल तर , त्याला कसे आहेत हे विचारा. त्याला धन्यवाद ( आजच्या शुद्ध मराठीत THANK YOU ) म्हणा . याला पैसे लागत नाहीत.

लक्ष्यात ठेवा हाताची सगळीच बोटे काही सारखी नसतात. तुम्ही कधीतरी त्यांच्या बरोबर अर्धा तास थांबून पहा .

" वाहतूक पोलिस मित्र " 
वाहतूक पोलिस मित्र
सदा रस्त्यावर असतो
आपला प्रवास म्हणून
सदा सुरळीत होतो
भर पावसातही भिजत
वाहतूक नियंत्रित करतो
थांबली चुकून वाहतूक
आपण त्याच्यावरच खेकसतो
शाळेतल्या मुलांना रस्ता
ओलांडून देतो
गाड्यांच्या गर्दीत
रुग्णवाहिकेला वाट करून देतो
बंद पडलेली गाडी
निमूट पणे ढकलतो
पाठलाग करून
साखळी चोरालाही पकडतो
बंदोबस्तासाठी VIP च्या
तासन तास उभा असतो
गणेश विसर्जनात
रात्रंदिवस वाहतूक सुरळीत ठेवतो
बिचाऱ्याचा हातात
साधा दांडू हि नसतो
तरीही वाहतूक
नियंत्रित करीत असतो
कधी तरी आम्ही
वाहतुकीचे नियम तोडतो
पकडले गेल्यावर
त्याच्याच अंगावर खेकसतो
गाड्यांच्या धुरातच
बिचारा श्वासोच्छ्वास करतो
A / C गाडीत बसून आम्ही
त्याच्याच नावाने बोटे मोडतो
तहान , भूक
सगळी तो विसरतो
वाहतूक मात्र
नेहमीच नियंत्रित ठेवतो
चिरी मिरी घेताना
एखादा दुसरा दिसतो
बाकीच्या वाहतूक पोलिसांना
नाहक बदनाम तो करतो
नवीन पोस्टिंग मध्ये
जरासा तो स्थिरावतो
तोच बदलीचा कागद
हातात त्याच्या पडतो
आमचा प्रवास
ज्याच्या मुळे सुरळीत होतो
अश्या त्या वाहतूक पोलिस
मित्राला मी मानाचा सलाम ठोकतो 

No comments:

Post a Comment