Sunday, July 6, 2014

भटक्या कुत्र्यांची दहशत Article in Maharashtra Times dt. 6th July, 2014





भटक्या कुत्र्यांची दहशत
Jul 6, 2014, 12.00AM IST



  



मुंब्र्यात भटक्या कुत्र्याने हल्ला करून शाळकरी मुलाचे लचके तोडल्यानंतर मुंबई ठाणे परिसरातली भटक्या कुत्र्यांची दहशत समोर आली. रात्रीच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवर कुत्र्यांचं राज्य असतं! कुत्र्यांच्या टोळ्या एकट्या दुकट्या माणसाचा, बाईकस्वाराचा लांब अंतरापर्यंत जीवघेणा पाठलाग करतात. श्वानदंश किती होतात, याचे कुठेही अधिकृत रेकॉर्ड नाही. कुत्र्यांच्या भयाण भुंकण्यामुळे किती जणांना निद्रानाश जडलाय, याची गणती नाही. मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये कित्येक गल्ल्या कुत्र्यांच्या हल्ल्यासाठी ओळखल्या जातात, हे विदारक सत्य आहे....कुत्र्यांची दहशत, श्वानदंशावरील उपचार, प्राणिप्रेमींची भूमिका या सर्व बाजूंनी मुंबईतील श्वान समस्येचा साकल्याने घेतलेला हा आढावा .

ऑन स्पॉट:

मानखुर्द

मानखुर्दचा लल्लूभाई कंपाऊंड म्हणजे मुंबईतील अनेक प्रकल्पबाधित नागरिकांची पुनर्वसित वस्ती. जवळपास १०० इमारती असलेल्या या कंपाऊंडमध्ये एमएमआरडीए, एसआरए योजनेतली घरं आहेत. मानखुर्द आणि गोवंडी स्टेशनांपासून समान अंतरावरचा हा परिसर रात्री दहा नंतर सुनसान होतो. मधूनच येणारी एखादी शेअर रिक्षा आणि घोळक्याने चालत जाणारी माणसं हेच इथलं रात्रीचं चित्र. मानखुर्द स्टेशनला उतरून सोनापूरचा नाल्यापुढे कच्चा रस्ता लल्लूभाई कंपाऊंडकडे नेतो. कचऱ्याच्या डब्याजवळ चार-पाच कुत्रे कचरा उकरताना दिसतात. जवळून जाताना चाहुल लागल्याने कुत्रे आपल्याकडे रोखून पाहतात तेव्हा काळजात धस्स होतं. पावलांचा वेग वाढतो. लल्लूभाई कंपाऊंडच्या अगदी समोर येऊन उभे राहिल्यानंतर फुटपाथवर आणखी दोन कुत्रे पहुडलेले दिसतात. तेवढ्यात लांबून येणारी चारचाकी गाडी करकचून ब्रेक मारते. गाडीला चहुबाजूने कुत्र्यांनी घेरलेले असते. मागच्याच आठवड्यात रात्री अकराच्या सुमारास एका बाईकच्या मागे तीन कुत्रे लागल्याची घटना इथले रहिवासी विकास लोखंडे सांगतात. कुत्र्यांपासून पिच्छा सोडवण्याच्या नादात बाईकस्वाराने वेग वाढवला, पण त्या नादात समोरच्या स्पीडब्रेकरकडे त्यांचे लक्षच गेले नाही. बाईकचा तोल गेला आणि दोघेही पडले. बाईकस्वाराच्या खांद्याला दुखापत झाली. लोकांनी मदत केली खरी, पण कुत्र्यांचे ते भुंकणे आणि अंगावर धावून जाणे इतके भयंकर वाटते की, मदतीला पुढे धावण्याआधी दहावेळा विचार करावा लागतो, लोखंडे सांगतात
आजवर या परिसरात कुत्रा चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण सुदैवाने त्यातील कुणी फारसे गंभीर जखमी झालेले नाहीत.

मित्तल मैदान (मुंब्रा )

रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मुंब्र्यात भल्या पहाटे उत्सवी माहौल दिसतो. पहाटे साडेचार वाजण्याआधी 'सेहरी' म्हणजेच रोजा सुरू होण्याआधी खाण्यापिण्याची लगबग सुरू असते. सेहरीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री करणारी अनेक दुकानं मुंब्र्यात खुली असतात. पण अशा माहौलमध्येसुध्दा सध्या मोहम्मद सलीम सय्यद हा तरुण एकट्याने भल्या पहाटे खरेदीसाठी जातांना काहीसा बिचकतो. कारण मुंब्र्यात हल्ली भटक्या कुत्र्यांनी घातलेला धुडगूस ...

अवघ्या काही दिवसांपूर्वी सकाळी मुंब्र्यात मित्तल मैदानातून शाळेत जाणाऱ्या शाहीदला भटक्या कुत्र्यांनी घेरून त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याचे लचके तोडले. शाहीदवर प्लॅस्टीक सर्जरी करावी लागली. त्याला सुमारे दीडशे टाके घालावे लागलेत. १० दिवसांनंतरही तो मुंबर्ईत जे. जे. हॉस्पिटलात उपचार घेत आहे. कारण ठाणे सिव्हिल, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल या प्रमुख हॉस्पिटलांमध्येही श्वानदंशावर उपचार केले जात नाहीत. शाहीदचे दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव बचावला. पण या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांची दहशत मुंब्रावासीयांच्या मनात दाटली आहे.

मुंब्र्यात ही समस्या अधिक गंभीर झाली याची काही कारणे आहेत. ठाणे, कळवा आदी भागातून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी आल्या की हे कुत्रे पकडून मुंब्रा येथील विस्तीर्ण मोकळ्या मित्तल मैदानात आणून सोडले जातात, असे रहिवासी सांगतात. डम्पिंग ग्राऊंडअभावी, तिथे दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यावर कुत्रे पोसले जातात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढतच चालल्याचे सय्यद यांचे म्हणणे आहे. शाहीद प्रकरणामुळे शाळकरी विद्यार्थी तर इतके घाबरले आहेत, की पालकांशिवाय ते शाळेत जाण्यास तयारच होत नाहीत. भटक्या कुत्र्यांविषयी मुंब्रावासीयांमध्ये इतका संताप आहे की पालिकेने तातडीने ठोस उपाययोजना केली नाही तर कुत्रे पकडून ते पालिका मुख्यालयात सोडण्याचा विचार येथील तरुणांच्या मनात घोळतोय.

चारकोप

रात्री साडेअकरा बारानंतर चारकोपमधील सेक्टर क्रमांक सात, दहिसर पूर्वेतील शैलेंद्रनगर-फाटक आदी वेगवेगळ्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत सुरू होते. १० ते १२ भटक्या कुत्र्यांची टोळी बेधडक एकट्या दुकट्या व्यक्तीस लक्ष्य करण्यास सुरुवात करते. एखाद्या बाइकस्वारास लक्ष्य करण्यासाठी कुत्रे तयार राहतात. बाइकप्रमाणेच छोट्यामोठ्या वाहनांचा लांबपर्यंत पाठलाग करण्यात त्यांनी कौशल्य कमावले आहे. रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांना तर स्वसंरक्षणासाठी हातात दगड बाळगावे लागतात इतकी वाईट अवस्था आहे. चुकूनमाकून एखादी व्यक्ती एकाकी गल्लीमध्ये शिरल्यास सर्व बाजूंनी हल्ला चढवला जातो.
प्रामुख्याने कचराकुंडीजवळ या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. रात्रीच्या वेळी भरून वाहणाऱ्या कचराकुंड्यांमुळे तिथे पहाटेपर्यंत कुत्र्यांचा वावर असतो. या कुत्र्यांच्या कर्कश्श भुंकण्यामुळे झोपमोड होते ती वेगळीच.

मुंबईत एक लाख भटके कुत्रे!
पालिकेने २००७मध्ये केलेल्या गणनेत मुंबईत ७४ हजार भटके कुत्रे आढळले होते. यंदाच्या जानेवारीत ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत कुत्र्यांची गणना करण्यात आली. नवीन गणनेनुसार मुंबईत सध्या ९५ हजार १७२ कुत्रे आढळून आली आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्या ६६ हजार ८७ तर झोपडपट्टी भागातील २९ हजार ८५ कुत्र्यांचा यात समावेश आहे.
१० माणसांमागे सात कुत्रे
मुंबईत एका किलोमीटरच्या अंतरात १० तर दहा माणसांमागे सात कुत्रे असल्याचा निष्कर्ष २०१४ मध्ये केलेल्या श्वानगणनेत काढण्यात आला आहे.
आजारी कुत्र्यांसाठी मोबाइल व्हॅन
अपघातग्रस्त आणि आजारी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी इन डिफेन्स ऑफ अॅनिमल या स्वयंसेवी संस्थेतर्फे रविवार वगळता दररोज रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत मोबाइल व्हॅनची सेवा पुरवली जाते. या सेवेसाठी पालिका संस्थेला प्रत्येक महिन्याला ३२ हजार रुपये मोबदला देते. सेवेसाठी संपर्कः ९३२००५६५८१
कुत्र्यांसाठी कोर्टबाजी
मुंबईत दरवर्षी ३० ते ४० हजार नवीन कुत्र्यांचे प्रजोत्पादन होते. कुत्र्यांकडून नागरिकांच्या जिविताला धोका असल्याने पालिकेच्या १८८८च्या कायद्यात कलम १९१ () () अन्वये या कुत्र्यांना इलेक्ट्रिकचा शॉक देऊन ठार मारण्याची तरतूद आहे. त्यासाठी महालक्ष्मी येथे कुत्र्यांना मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली महापालिकाही याच पद्धतीचा अवलंब करत होती. मात्र मेनका गांधी यांनी प्राण्यांच्या हक्क रक्षणासाठी मोहीम सुरू करून हे क्रौर्य असल्याचे सांगून दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने अशा पद्धतीने कुत्रे मारण्यास बंदी घातली. त्यानंतर गांधी यांनी मुंबई महापालिकेलाही विनंती केली. केल्यामुळे कुत्रे मारण्याची प्रथा बंद करून त्यांच्या निर्बिजीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. १९९८मध्ये पालिकेत आलेल्या मेयर-इन कौन्सिलने कुत्र्यांना ठार मारण्याची प्रथा पुन्हा सुरू केली. त्यावेळी प्राणिमित्र संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने पालिकेच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर आजतागायत निर्बिजीकरण करण्यात येत आहे. सन २०११मध्ये भटक्या कुत्र्यांसंबधी मुंबई हायकोर्टापुढे आलेल्या एका प्रकरणात निकाल देताना उपद्रवी कुत्र्यांना ठार मारण्याचा पालिकेचा कायदा कोर्टाने मान्य केला. त्यामुळे प्राणिमित्र संघटना आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी निकाल प्रलंबित आहे.

देशात २० हजार मृत्यू रेबीजमुळे

कुत्र्याच्या चावल्यानंतर प्रामुख्याने रेबीज होण्याचा धोका असतो. रेबीज हा मज्जासंस्थेला अपाय करणारा संसर्जजन्य आजार आहे. एका प्राण्याला दुसऱ्या प्राण्याकडून आणि प्राण्यांपासून माणसाला होतो.

रेबिज हा जगातील १५०हून अधिक देशांमध्ये आढळून येतो.

जगात दरवर्षी ५५हजार माणसे यामुळे मृत्युमुखी पडतात.

भारतात दरवर्षी रेबीजमुळे सरासरी २० हजार लोक मृत्युमुखी पडतात.

रेबीजची लक्षणे

रेबीजची लागण झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याची लाळ माणसाच्या शरीरात शिरते. त्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर रेबीजची लक्षणे दिसतात. रेबीज झालेली व्यक्ती अस्वस्थ होते. तहान-भूक लागत नाही. आवाज प्रकाशाचा त्याला त्रास होतो. सतत चालल्यावर त्याच्या तोंडातून लाळ पडते. त्याचे डोळे भीतीदायक वाटतात. तो पाण्याला घाबरतो. त्याला ताप येतो. प्रसंगी तो वेडावाकडा उड्या मारतो. यामुळे लकवा येतो. प्रथम मज्जातंतू नंतर मेंदूला फुफ्फुसाला संसर्ग होऊन त्याचा मृत्यू होतो.

अँटीरेबीज इंजेक्शन

पूर्वी कुत्रा चावल्यावर पोटात चौदाइंजेक्शन घ्यावी लागत. ते अतिशय वेदनादायक होते. आता श्वानदंशावर प्रभावी लस तयार झाली आहे. हाफकीन महामंडळासह तीन चे चार खासगी कंपन्या श्वानदंशावर लस तयार करतात. श्वान दंशावर दोन प्रकारच्या लसी येतात. एक प्रतिबंधात्मक(व्हॅक्सीन) दुसरे कुत्रा चावल्यावर घ्यायचे ते अँटी रेबीज सीरम दिले जाते. कुत्रा चावल्यावर डॉक्टर कुत्र्याने घेतलेल्या चाव्याच्या जखमा पाहून व्हॅक्सीन द्यायचे की अँटी रेबीज सीरम द्यायचे ते ठरवतो. पिसाळलेला कुत्रा चावला असेल तर डॉक्टर अँटी रेबीज सीरम देतात. कुत्रा चावल्यावर डॉक्टर सर्वप्रथम त्या कुत्र्याचे वर्णन विचारतात. घरात पाळलेल्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाते. पण भटके कुत्रे चावल्यावर मात्र रेबीजचा धोका वाढतो. अनेकदा पालिकेच्या किंवा सरकारी दवाखान्यात अँटीरेबीज सीरमचा पुरेसा साठा नसतो. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते आणि महागडी इंजेक्शन घ्यावी लागतात.

वर्ष तक्रारी कुत्रे चावणे निर्बिजीकरण रेबीजची लागण

२०१० २९९० ७७,४८४ ३४,०४५
२०११ ३१८४ ८०,८८९ २६,९६१
२०१२ ३१७८ ८२, २७४ १५,१३४
२०१३ ३७१६ ७४,८१२ ,७२२

निर्बिजीकरण निधीचा पुरेसा वापर नाही (कोटींमध्ये)

वर्ष तरतूद खर्च शिल्लक
२०१० ,५०,००,००० ,७२६१,४४७ ,७७,३८,५५२
२०११ ,००,००,००० ९७,३३,०५० ,०२६६,९५०
२०१२ ,६३,००,००० १४,०६,७५० ,४८,९३,२५०
२०१३ ,६३,००,००० २३,८५,४५० ,३९,१४,५५०

पेटा म्हणते...कुत्ते तो अच्छे होते है!

पाळीव प्राण्यांच्या हक्कांविषयी पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल अर्थात 'पेटा' ही संस्था काम करते. कुत्र्याविषयी कुणी कितीही तक्रार केली, या श्वानांनी चावे घेऊन समस्त मनुष्यप्राण्याला जीव नकोसा केला तरीही पेटा मात्र कुत्र्याला शिस्त लावली की तो सुधारतो यावर प्रगाढ विश्वास ठेवते. पेटाने कुत्र्यांविषयीच्या प्रचार जागृती मोहिमांमधून कुत्र्याला माणसाळवण्याबद्दल आग्रही भूमिका व्यक्त केली आहे. अलिकडे परदेशी कुत्रे पाळण्याचे स्तोम वाढले आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पेटा स्थानिक तसेच रस्त्यावरची कुत्रे पाळावी असा प्रचार करताना आढळते. त्यामुळे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना घर मिळेल, कुत्र्यांना शिस्त लागेल अन् भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही मार्गी लागेल, अशी उदात्त भूमिका त्यामागे आहे. भटक्या कुत्र्यांना शिस्त लावली, त्यांना प्रेमाने आपलंसं केलं की हे कुत्रे माणसाळतात. कुत्रा हा माणसाला दोस्त आहेच, माणूस, जमीन, संपत्ती यांची राखण करण्यासाठी कुत्र्याहून अधिक वफादार प्राणी नाही, याची 'पेटा'ला खात्री आहे. भारतात प्राणी हक्क आणि संरक्षणासंदर्भात अनेक कायदे असले तरीही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या ही मोठी समस्या झाल्याचे 'पेटा'ला वाटते. कुत्र्यांना मारुन टाकणे वा त्यांचे निर्बिजीकरण करणे हे अतिशय क्रूर कृत्य असून तो भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरचा उपाय निश्चितच नाही. कुत्र्यांना ठार मारण्यापेक्षा त्यांना दत्तक घ्यायला हवे, यासाठी 'पेटा'कडून अॅनिमल बर्थ कंट्रोल आणि भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्या, अशा दोन योजना राबवल्या जातात. प्राणीप्रेमी देशांनी या योजनांना चांगला प्रतिसाद दिला असून माणसांवर प्राण्यांवर प्रेम करा, अशी शिकवण देणाऱ्या भारतासारख्या देशानेही कुत्र्यांचा द्वेष करण्याऐवजी त्यांच्यावर प्रेम करायला हवं, अशी कळकळीची साद पेटाने घातली आहे.

...तर भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घ्या!

घरातून बाहेर टाकलेल्या वा रात्री उरलेल्या शिळ्या अन्नावर भटके कुत्रे जगतात. जे कुत्र्यांना असे शिळे अन्न घालतात, त्यांच्या मते कुत्रे निष्ठावान असतात, रात्री कुणी परकी माणसं अन्न मिळणाऱ्या राहत्या वसाहतीमध्ये आली तर ही कुत्रे भुंकून कल्ला करतात. या कुत्र्यांना रोजच्या रोज आंघोळ घालण्याचे, त्यांना खाऊ घालण्याचे निष्ठेने श्वानप्रेमी मंडळी करतात. त्यांना लसी देणे, त्यांच्या अंगावरीच गोचिड काढणे, त्यांना जंताचे औषध देणे, रेबीजची लस टोचणे, निर्बिजीकरण करणे, आजारी पडल्यास दवाखान्यात नेण्याची जबाबदारी मात्र टाळतात. त्यामुळे 'कुत्रा आमचा आहे', असा कांगावा भटक्या कुत्र्यांना उचलून नेण्यासाठी पालिकेची गाडी आल्यानंतर केला जातो, मात्र या कुत्र्यांला पाळीव माणसाळलेले बनवण्याचे प्रयत्न होत नाही. ही भटकी कुत्रे रात्रीच्या वेळी अन्नदाता त्यांच्या परिघातील ओळखीच्या मंडळीला सोडून इतर कुणालाही चावायला मोकळी असतात ती याच कारणामुळे!

सामान्यांनी लक्ष घालायला हवे

कुत्रा पकडून त्याचे निर्बिजीकरण केल्यावर त्याच्या कानावर वा पाठीवर विशिष्ट प्रकारची खूण केली जाते. आपल्या राहत्या भागात असे किती कुत्रे आहेत, याचा डोळसपणे शोध घ्यायला हवा. निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांचे प्रमाण कमी असेल तर संबधित विभागाला त्याची माहिती द्यायला हवी, केवळ कुत्र्यांना मारून प्रश्न सुटणार नसल्याचे स्वयंसेवी संस्थाचे म्हणणे आहे. ऑल इंडिया ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ ॅनिमल, अहिंसा तसेच बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टु ॅनिमल आणि पाल्स या संघटना भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करतात. या मोहिमेबाबत आणखी जागृती करण्याची आवश्यकता आहे. नुसते प्राणिसंरक्षणाचे कायदे करून घेऊन पुढील जबाबदारी सरकारची आहे असे म्हणत प्राणिमित्र हात वर करू लागले तर ही समस्या वाढतच राही. आणि याचा सर्वात जास्त त्रास सामान्य माणसाला होईल, असे मत सेव्ह नेचर संस्थेचे अध्यक्ष व्ही.एस. शहा व्यक्त करतात.

महत्त्वाचे
कुत्र्यांसंबंधी तक्रार तसेच परवाना काढण्यासाठी
(वेळ सकाळी आठ ते सायं. पाच)
शहरः धोबीघाट, जी. बी. सकपाळ मार्ग, सातरस्ता दूरध्वनी २३०८५११८
पश्चिम उपनगरः स्टेशन रोड वांद्रे . दूरध्वनी २६४०९२७५
काचपाडा मालाडः . २८८०८२०६
पूर्व उपनगरः दीनदयाल उपाध्याय मार्ग मुलुंड . २५६१८०००

स्वयंसेवी संस्थांची मदत
निर्बिजीकरण मोहिमेत कुत्र्यांचे हाल केले जात असल्याचा दावा करत प्राणिमित्र संघटनांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार आणि केंद्र राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे निर्बिजीकरण लसीकरणाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या मोहीमेमुळे भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. निर्बिजीकरण आणि लसीकरणासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांची मदत घेते. १९९४पासून हा उपक्रम प्रशासनाने सुरू केला आहे. मागील चार वर्षांपासून निर्बिजीकरणाला यश येत असून त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या घटत चालल्याचा दावा पालिकेने केला आहे.

गल्लीबोळात श्वानराज्य
कल्याणच्या आधारवाडी, वाडेघर भागातील रहिवाशांना रात्री- अपरात्री कामावरुन परततांना रिक्षा, बस किंवा इतर वाहनानेच घरी परतावे लागते.
कल्याण, डोंबिवली ही नोकरदार वर्गाची शहरे आहेत. सकाळी मुंबर्ईत नोकरीनिमित्त गेलेले चाकरमानी रात्री उशिरा घरी परततात. पण नेमक्या त्यांच्या झोपण्याच्या वेळीच कुत्र्यांची भांडणं सुरु होतात या भुंकण्यामुळे होणाऱ्या झोपमोडेतून अनेकांना निद्रानाशाचा विकार जडल्याचे डॉक्टर आनंद हर्डीकर यांनी सांगितले.

निर्बिजीकरणाचेही तोडले लचके
ठाणे शहरात साधारणतः ३० हजार कुत्रे असून २०१० अखेरीपर्यंत त्या सर्वांचे निर्बिजीकरण केले जाईल, असे आश्वासन ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी २००४ साली भर पालिका सभागृहात दिले होते. २०१४ अखेरीपर्यंत करोडो रुपये खर्च करून पालिकेने ४१ हजार ४३३ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. मात्र, निर्बिजीकरण झालेला एकही कुत्रा शहरात नाही असे सांगण्याची हिम्मत आजही पालिका अधिकाऱ्यांमध्ये नाही. निबिर्जीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविली असती तर आज भटक्या कुत्र्यांची गणना दुर्मिळ प्राण्यांमध्ये झाली असती. मात्र, प्रशासकीय भ्रष्टाचाराने या योजनेचे लचके तोडले आहेत.
सुरवातीला ठाणे पालिकेच्या हॉस्पिटलात दररोज १४ - १५ कुत्र्यांचे निबिर्जीकरण केले जायचे. आठ वर्षात २१ हजार ३७८ कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले. परंतु, या शस्त्रक्रियांचा वेग कुत्र्यांच्या जन्मापेक्षा कित्येक पटीने कमी होता. त्यामुळे एवढ्या धिम्या गतीने कुत्र्यांना नामशेष करण्याचा उद्देश कधीच सफल होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पालिकेने खासगी कंपनीला निर्बिजीकरणाचे काम दिले. या कंपनीने चार वर्षात २३ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. अन्य महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका या कामासाठी जवळपास दुप्पट पैसे अदा करते हा मुद्दाही वादग्रस्त ठरला होता. एवढे झाल्यानंतर आजही निर्बिजीकरण झालेले शेकडो कुत्रे ठाण्याच्या गल्लीबोळांमध्ये दहशतवाद्यांसारखे फिरत आहेत. निर्बिजीकरण झालेल्या श्वानांनी पिल्लांना जन्म दिल्याचे व्हिडीओ शुटींग शुक्रवारी काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी पालिकेच्या सभेत दाखविले. यावरून निर्बिजीकरण केवळ संस्थांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

डॉग शेल्टर होम बासनात
शहरातल्या सर्व कुत्र्यांना पकडून शहरापासून दूर अंतरावर शेल्टर होम उभारण्याचे आदेश मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांत हाय कोर्टाने दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णयही घेतला होता. वाडा तालुक्यात ४३ एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार होता. पुणे महापालिकेनेही ही योजना राबविण्याची घोषणा करून भरपूर प्रसिद्घी लाटली. ठाणे शहरात डायघर इथल्या भूखंडावर डॉग शेल्टर होम उभारण्याचा विचार सुरू होता. मात्र, तिन्ही महापालिकांनी ही योजना बासनात गुंडाळून ठेवली आहे. राज्यातल्या बहुतेक सर्व महापालिकांना ही योजना सादर करण्यात आली आहे. परंतु, ती किती वेळात पूर्ण करायची याचे कोणतेही बंधन हायकोर्टाने घातलेले नाही. त्यामुळे कुणालाही ती राबविण्यात स्वारस्य नाही.


वृत्तांकन नितीन चव्हाण, राजेश चुरी, हेमंत साटम, अनुराग कांबळे, शर्मिला कलगुटकर, संदीप शिंदे, आशिष पाठक

फोटो शैलेश जाधव, अनिल शिंदे

मांडणी सुदर्शन सुर्वे
चित्र अक्षरलेखन रोहन पोरे

No comments:

Post a Comment