Wednesday, August 17, 2016

" भटक्या कुत्र्यांना भटकू द्या.! "

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" भटक्या कुत्र्यांना भटकू द्या.! "

या शीर्षकाचा माझा एक उपहासात्मक लेख "लोकमत" या वृत्त पत्राच्या 17.08.2016 च्या अंकातील " समाज संस्कृती " या हॅलो ठाणे पुरवणी मध्ये छापून आला आहे.

सर्वप्रथम हा लेख छापल्याबद्दल लोकमत चे मनापासून आभार . हा लेख वाचून तरी भारत या देशातील काही नागरिकांचे डोळे खाडकन उघडतील अशी मला एक आशा आहे.

आपणाला माहीत असेलच कि माझी या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या अनिर्बंध वाढीविरुद्ध गेली 4 / 5 वर्षे गल्ली ते दिल्ली लढाई चालू आहे.

"भटक्या कुत्र्यांना भटकू द्या.!"

'रेल्वेची श्वानबंदी', 'विमानतळ परिसरात भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला', 'राज्यसभेत शिरू पाहणार्या भटक्या कुत्र्याला सुरक्षा रक्षकाने हाकलले.' अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण नेहमीच वाचतो व अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना हाकलून देताना पाहतोदेखील. हा सगळा या भटक्या कुत्र्यांवर होणारा अन्यायच, नाही का? - सत्यजित अ. शाह 'भ टका कुत्रा' या नावातच 'भटका' असे असल्याने कोठेही मनसोक्त भटकणे, हुंदडणे हा 'भटका कुत्रा'नामक प्राण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. या हक्कावर बंदी आणणे 'अश्वानवी' (जसे मानवाच्या बाबतीत 'अमानवी') आहे. 'भटका कुत्रा' ही प्राण्यांची एक जमात देशातून लोप पावत चालली आहे, असे काही मोजक्याच भारतीयांना वाटते. त्यामुळे या अशा लोप पावत जाणार्या (आजच्या घडीला करोडोंच्या संख्येने हा प्राणी देशभरात आहे.) प्राण्यावर असा होणारा अन्याय ताबडतोब दूर झालाच पाहिजे, असे माझे मत आहे.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, लोकलखाली, मालगाडीखाली, दूर पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांखाली भटके कुत्रे येऊन अपघात होतात. रेल्वेच्या गाड्यांना अनेकदा यामुळे उशीर होतो. वेळापत्रक बिघडून जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना रेल्वेच्या परिसरात बंदी घातली पाहिजे. लोकलखाली, मालगाडी, प्रवासीगाडीखाली रोज थोड्या फार प्रमाणात भटके कुत्रे येत असतीलही.. त्यामुळे फक्त हजारो, लाखो प्रवाशांचा अनेकदा खोळंबा होतही असेल, रेल्वेचे थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असेलही, म्हणून त्या निष्पाप प्राण्यावर अन्याय करणे योग्य आहे का?

रेल्वेचे खांब हे तर भटक्या कुत्र्यांची पाय वर करण्याची हक्काची जागा. भटक्या कुत्र्यांवर रेल्वे असे बंदी घातली तर, त्या बिचार्या मुक्या, निष्पाप प्राण्यांनी पाय कोठे वर करायचे? तसेही आता रस्त्यावर विजेचे खांब (कुत्र्यांची पाय वर करण्याची अजून एक हक्काची जागा) देखील कमी होत चालली आहे. पूर्वी कसं रस्त्याच्या दोनही बाजूला विजेच्या दिव्यांचे खांब असायचे, पण आजकाल फक्त रस्त्याच्या मध्यभागी दिव्याचा एकच खांब असतो, दोन खांबांमध्ये जास्त अंतर असल्याने खांबांची संख्या कमी असते. या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खांबांकडे वेगात जाणार्या वाहनांमधून वाट काढून जाणं कठीण. वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की त्या वाहनांमधून वाट काढून खांबाकडे जाणे भटक्या कुत्र्यांना फार कठीण जाते. माणूस नावाचा प्राणी नित्यनियमाने सकाळच्या प्रहरी लोकल गाड्यांच्या रेल्वेमार्गावर जागोजागी बसलेले दिसतात; पण 'सकाळी रेल्वेमार्गावर बसणार्यांवर बंदी' असे कधी ऐकले आहे का? मग या बिचार्या मुक्या प्राण्याला रेल्वेची बंदी का?

भारतीय रेल्वे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांना रेल्वे रुळांच्या मध्ये, त्याचप्रमाणे या रु ळावरून, त्या रुळावर स्वछंदपणे भटकंती करू द्यावी. शासन त्या कुत्र्यांचे जे निर्बिजीकरण करते. ते खरे करते का माहीत नाही, पण त्यामुळे 'भटक्या कुत्र्यांची' संख्या मात्र वाढतच आहे. जर हे निर्बिजीकरण व्यविस्थतपणे केलं असतं तर एवढय़ात भटके कुत्रे नामशेष झाले असते. यावरून हे सिद्ध होते की शासनदेखील कधीतरी चांगलं काम करते.
रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल, फलाट, फलाटांच्या छतावर, लोकल गाडीत, फलाटांवरील जिन्यावर, फलाटावरील प्रवाशांच्या आसनावर, फलाटावरील उपहारगृहांमध्ये, तिकीट खिडकीजवळ, स्थानकातून बाहेर पडण्याच्या दरवाज्यात, फलाटावरील विश्रांतीगृहामध्ये व अशा इतर अनेक जागांवर या सगळ्या भटक्या कुत्र्यांना मुक्तविहार करण्याचा, खेळण्याचा , बागडण्याचा, एकमेकांच्या मागे धावण्याचा (पकडा पकडी खेळण्याचा), लपाछपी खेळण्याचा परंपरेने चालत आलेला हक्क मानव प्राण्याच्या स्वार्थासाठी भटक्या कुत्र्यांकडून हिरावून घेता कामा नये. जर ही निर्दयी श्वानबंदी झाली तर त्या भटक्या कुत्र्यांचे हाल 'कुत्रेही खाणार नाहीत.'
सुरक्षा कर्मचार्याने राज्यसभेत शिरू पाहणार्या त्या भटक्या कुत्र्याला हाकलले म्हणजे त्या बिचार्या, 'भटका कुत्रा' नावाच्या मुक्या प्राण्याचा हा फार मोठा अपमान झाला आहे.

माझी शासनाला विनंती आहे की यापुढे 'भटका कुत्रा' या देशातील अतिमहत्त्वाच्या व दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याला असे अपमानकारक कोठूनही हाकलून देणे, त्याच्या भटकण्यावर निर्बंध आणणे, त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे, त्याला हाड म्हणून तुच्छ लेखणे व इतर तत्सम अशा अघोरी, अतिशय गंभीर असा गुन्हा समजला जावा व असा गुन्हा करणार्या व्यक्तींना कठोरात कठोर अशी सजा देण्यात यावी.

ता. क . : या लेखात मी जे काही लिहिले आहे ते फक्त उपहासात्मक लिहिलेले आहे. या लेखाद्वारे भावना दुखविण्याचा हेतू नाही. भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या होणार्या अर्मयाद वाढीवर व त्यांच्या मुळे निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंशामुळे होणार्या त्रासावर जनजागृती करण्याचा, शासन, प्रशासन यांना जागे करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

satyajitshah64@gmail.com

No comments:

Post a Comment