Sunday, August 28, 2016


" ५ वर्षांच्या बालकावर १० भटक्या कुत्र्यांचा हल्ला " ,

या मथ ळयाची बातमी , रविवार , २८, ऑगस्ट , २०१६ च्या " नवा काळ " या वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे.

यावर प्राणी मित्र, प्राणी मैत्रिणीचे छापील उत्तर असणार , त्या ५ वर्षांच्या बालकाने त्या भटक्या कुत्र्यांना अगोदर दगडाने , अथवा काठीने मारले असणार .
वाचा , विचार करा , माझ्या या लढ्यात मला साथ द्या . मी कधीच पैसे वगैरे मागत नाही , उगाचच गैर समाज नको . हा एक मोठ्ठा लढा , गेली ४ / ५ वर्षे मी लढत आहे . तुमच्या बाबत अशी श्वान दंशाची घटना होण्याची वाट पाहत बसू नका .

Wednesday, August 24, 2016

" नवा काळ " एक अप्रतिम , अत्यंत परखड आणि विचार करायला भाग पाडणारा अग्रलेख !



एक अप्रतिम , अत्यंत परखड आणि विचार करायला भाग पाडणारा अग्रलेख !
" नवा काळ "
मुंबई, रविवार २१ ऑगस्ट, २०१६
👉 संपादकीय 👈
सौ. जयश्री खाडिलकर-पांडेकृत
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची २० फुटापर्यंत ठेवायची आणि १८ वर्षाखालील गोविंदांना बंदी हा निर्णय दिला आणि महाराष्ट्रातील तमाम आयाबहिणींनी न्यायालयाचे मनापासून आभार मानले. पण सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेल्या राज्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात ओरड सुरू केली आहे. गेले दोन दिवस या राज्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात चालविलेली बाष्कळ बडबड तमाम महाराष्ट्र ऐकतो आहे. या जनतेच्या वतीने आज या नेत्यांना आम्ही ठामपणे सांगतो की, प्रत्येक सण आणि प्रत्येक सोहळ्याचे बाजारीकरण करणे थांबवा. यावेळी कोर्टाचा निर्णय पाळावाच लागेल. आमच्या एकाही गोविंदाचा जीव धोक्यात घालू देणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा दहीहंडीचा निर्णय आला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन तासांत पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरेंनी म्हटले की, कोर्टाचं डोकं ठिकाणावर आहे का ? कोर्ट नको त्या प्रश्नात नाक खुपसतंय. हिंदू सणांवरच कोर्ट निर्बंध घालत आहे. राज ठाकरेंनी कोर्टाचा निर्णय धुडकावण्याचे आदेश दिले आहेत. या त्यांच्या वक्तव्याचं काय करावं ? कोर्टाचा आदेश पाळत राज ठाकरेंनी प्रत्येक न्यायालयात आजवर हजेरी लावली. यामुळे त्यांना महाराष्ट्रभर जावं लागलं ! तेवढाच महाराष्ट्र त्यांनी बघितला. तेव्हा बाहू उंचावून कोर्टाचा आदेश ठोकरला का नाही ? आज कोर्टाचा आदेश धुडकावण्याची खुमखुमी आली. कारण आज कोर्टाचा अवमान म्हणून राज ठाकरेंना जेलमध्ये टाकलं तर त्यामुळे आपल्या पक्षात थोडी तरी धुगधुगी येईल हे त्यांना माहीत आहे.

राज ठाकरे, कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असे म्हणता ना ? आम्ही उत्तर देतो. कोर्टाचंच डोकं ठिकाणावर आहे. तुम्हा राज्यकर्त्यांची डोकी ठिकाणावर नाहीत. सगळ्याला बाजारी रूप आणलंत. दरवर्षी गोविंदा थरावरून पडून मरतात. काही आयुष्यभरासाठी जायबंद झालेत. त्यांना भेटायला नेते जातात ? त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतात ? एकही नेता फिरकत नाही आणि आमच्या या गोविंदांना आठव्या, नवव्या थरांवर चढवून तुम्ही त्यांचा जीव धोक्यात घालणार ? कुणी दिला तुम्हाला हा हक्क ? कोणत्या आईने, कोणत्या बहिणीने, कोणत्या बापाने दिला तुम्हाला हा हक्क ?

राज ठाकरे, तुम्ही म्हणता की, माणसं रोज मरतात. मग दहीहंडीवर निर्बंध का ? याचे कारण म्हणजे माणसं मरू नयेत यासाठी प्रयत्न करायचा असतो. गरीबांना मोफत उपचार त्यासाठी असतात, इथे सेल्फी काढू नका हे बोर्ड त्यासाठी असतात, रस्त्यावर सिग्नल त्यासाठी असतात, सिगारेट ओढता ना तुम्ही ? त्या पाकिटावरही सिगारेट ओढणे हानीकारक आहे हे त्या माणसाचा जीव वाचविण्यासाठी लिहिलेलं असतं. माणसं रोज मरतात हे वाक्य शोभा डे यांच्या वाक्यासारखं आहे. ही वाक्ये शोभा देत नाहीत. आमच्या गोविंदाचा जीव धोक्यात आहे हे जाणून तुम्ही त्यांना आगीत ढकलणार ? सरावासाठी गेलेला आपला बाळ परत येत नाही तोपर्यंत घरातील आई, बहिण, वडील झोपतही नाहीत याची जाणीव आहे तुम्हाला ?

आणि होय, तुम्ही हिंदू सणांचा मुद्दा काढलात. कोर्ट हिंदू सणात नाक खुपसतं असा तुमचा आरोप आहे. याच कोर्टाने मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय दिला आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची हिम्मत एकाही नेत्यात नाही. तुमच्या आदेशानुसार ठाण्यात नऊ थरांची ११ लाखांची दहीहंडी लावणार आहेत ना ? त्या तुमच्या कार्यकर्त्यांना अशीच हिम्मत दाखवून बेकायदा भोंगे काढायला का नाही पाठवत ? जिथे सोयीस्कर तिथेच मर्दुमकी दाखवणार का ?

राज ठाकरेंनी इंजिनमधला कोळसा पेटवण्याचा प्रयत्न करताच वाघानेही डरकाळी फोडली. मतांचे राजकारण किती काळ करणार आहात ? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, या निर्णयामुळे जनतेत जो असंतोष पसरला आहे त्याचे मी स्वतः नेतृत्व करणार. उद्धवजी, कोणत्या जनतेबद्दल हा कळवळा दाखवत आहात ? तुम्ही जो असंतोष म्हणता तो जनतेत नाही तर मतांसाठी दहीहंडीवर लाखोंचा सट्टा लावणारे राजकारणी नाराज आहेत. तुम्ही त्यांचे नेतृत्व करणार आहात. जनतेच्या असंतोषाचे नेतृत्व करायचे असेल तर आम्ही जनतेचे प्रश्न तुम्हाला सांगतो. भाज्या ६० ते ८० रूपये किलो आहेत, त्यासाठी नेतृत्व करा, कॉलेजात मॅनेजमेंटच्या सीटसाठी लाखो रूपये मागतात त्याविरुद्ध नेतृत्व करा, मुलांना चांगल्या शाळेत घालायचे स्वप्न बघतो, पण खर्च परवडत नाही. त्याचे नेतृत्व करा. आम्हाला परवडेल अशा किंमतीत आणि पेलवेल इतके हप्ते भरून वन रुम किचन मिळेल का हो तुमच्या नेतृत्वाने ? अगदी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम केलंत तरी आमचे डोळे कौतुकाने भरुन येतील. पण हे प्रश्न सोडून उद्धवजी, तुम्ही बाजारबुणग्यांचं नेतृत्व करणार ?

सात, आठ, नऊ थर लावणे म्हणजे गंमत नाही. सणही नाही. पैशाचे आमिष दाखवून बळी देण्याचा प्रकार आहे. आमचे नेत्यांना चॅलेंज आहे की, दहीहंडीची बक्षिसं तीन वर्षे पूर्ण बंद करा. मग कोण किती थर लावायला पुढं येते ते सर्वांना कळेल. माखनचोर कृष्ण आपल्या सवंगड्यांच्या खांद्यावर चढून चोरायचा. आता रोजच्या जगण्यासाठी माणसं इतकी धडपड करतात की, सवंगडीच उरलेले नाहीत. स्टुलावरच चढण्याची वेळ आली आहे.
स्वाती पाटील सारख्या एका सामान्य गृहिणीने जिद्दीने कोर्टात जाऊन अनेक गोविंदांचे प्राण वाचवले आहेत. जवळजवळ २००० सालापर्यंत चार-पाच थरांचेच गोविंदा असायचे आणि सर्व जण तो निख्खळ आनंद घ्यायचे. स्वाती पाटील यांना या नेत्यांनी साथ द्यायला पाहिजे होती. पण या नेत्यांचीच डोकी फिरली आहेत.

मुंबईच्या केईएम, नायर, सायन रुग्णालयांत दरवर्षी जखमी गोविंदा भरती होतात. मणक्यावर मार लागल्याने अर्धांगवायू होतो. दरवर्षी एक दोघांचा मृत्यू होतो. एकट्या केईएम रुग्णालयात २०११ साली १४६, २०१२ साली २००, २०१३ साली २५० असे भरती झालेल्या गोविंदांचे आकडे आहेत.

.
२००९ साली नागेश भोईर थरावरून पडला तो आजही अंथरूणाला खिळून आहे. त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर स्त्रक्रिया झाली आहे. त्याची शुश्रूषा करताना वडिलांची नोकरी गेली. खर्च भागवायला आईचे सर्व दागिने विकले गेले. त्याला कुणीही मदत केली नाही. नेते आणि मोठी बक्षिसं लावणारे आयोजक कुणीही त्याची विचारपूस केली नाही. २०१० साली ठाण्याला किशोर कांबळे ठार झाला. २०१४ साली राजेंद्र बैकर याचे उंच थरावरून पडून निधन झाले. आज त्याचे आजारी आई-वडील, दोन लहान मुले आणि पाच हजारांची नोकरी करून धडपडत संसार सांभाळणारी पत्नी यांची बिकट स्थिती आहे. राजेंद्र बैकर चार महिने पलंगाला खिळून होता, तेव्हा मदतीला एकही नेता फिरकला नाही. मंडळे मदत करतात, पण किती दिवस करणार आहेत. राजेंद्र बैकर, किरण तळेकर, जोगेश्वरीचा ऋषिकेश पाटील हे गोविंदा तर सरावाच्या वेळी पडून ठार झाले. मुलं आईवडिलांचे ऐकत नाहीत. उंच थरावरून पडली तर काय होईल याचे भान त्यांना राहत नाही. अनेक गोविंदा जखमी झाले, फ्रॅक्चर झाले त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची ससेहोलपट होते. हे सगळं थांबलं पाहिजे. १९९० पर्यंत चार, पाचच थर असायचे. तेव्हाही आनंद मिळायचाच. आताही कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं तर आनंद मिळेल. कोर्टाने 'नाक खुपसलं' हे बरं झालं. कारण सर्वांना निवेदने देऊन कुणीच ऐकत नाही हे लक्षात आल्यावर स्वाती पाटील स्वतःचे पैसे खास करून कोर्टात गेल्या. शेवटी आज अशी परिस्थिती आहे की, सामान्य माणसाला फक्त कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा राहिली आहे. कोर्टाचं नाक खुपसणेच सामान्य माणसाला न्याय मिळवून देतं.