Saturday, March 3, 2018

शिक्षणाचा दूत भाऊ नानिवडेकर विद्यादान सहायक मंडळ , ठाणे

शिक्षणाचा दूत

वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात.

लोकसत्ता टीम | Updated: March 4, 2016 12:47 AM



वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात. शक्यतो कोणतीही नवी जबाबदारी घेत नाहीत. प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात, शरीर पूर्वीसारखे साथ देत नसते. आजवर खूप काम केले, आता विश्रांती घेऊ, मजा करू, देश-विदेशात फिरू, मुले व नातवंडांमध्ये रमू, पुन्हा कशाला नसती कामे मागे लावून घ्यायची, असाही विचार काही जण करतात. काही मंडळी देवधर्म, अध्यात्माकडे वळतात. आपण आणि आपले कुटुंब एवढेच त्यांचे विश्व असते. त्यामुळे काही सामाजिक काम करणे, विशिष्ट ध्येय उराशी बाळगून संस्था/संघटना उभी करणे, समाजासाठी आपला काही वेळ देणे ही तर दूरचीच गोष्ट राहिली.

नोकरी-व्यवसाय करत असताना समाजासाठी पाहिजे तितका वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे आता रिकामा वेळ आहे, तर तो सत्कारणी लावू या, असा विचार करणारे अपवादात्मक असतात. ठाण्याचे श्री.कृ. ऊर्फ भाऊ नानिवडेकर हे ८४ वर्षीय ‘वृद्ध तरुण’ असाच एक अपवाद. शिक्षण घेण्याची इच्छा आणि गुणवत्ता असूनही आर्थिक किंवा अन्य परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यादान साहाय्यक मंडळा’च्या माध्यमातून भाऊंचे विद्याज्ञानाचे कार्य गेली आठ वर्षे सुरू आहे. ठाणे जिल्हय़ातील शहापूर येथून सुरूकेलेले काम आता बोरिवली, पुणे येथे विस्तारले आहे.
नानिवडेकर कुटुंबीय मूळचे सातारा जिल्हय़ातील कोरेगावचे. भाऊंच्या वडिलांचे नाव कृष्णाजी बळवंत ऊर्फ अण्णा नानिवडेकर. ते प्राथमिक शिक्षक होते. १९३० मध्ये महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनाच्या हाकेला ओ देऊन सरकारी नोकरी सोडून ते साबरमती आश्रमात दाखल झाले. भाऊंचा जन्म, बालपण कोरेगाव येथे गेले. ‘मेकॅनिकल इंजिनीअर’पर्यंत शिक्षण झालेल्या भाऊंना सामाजिक कार्याचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. नोकरी, संसार यात गुंतलेले असतानाच २००३ मध्ये भाऊ व त्यांच्या काही मित्रांनी बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’, ‘हेमलकसा’ तसेच डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘शोधग्राम’ या प्रकल्पांना भेट दिली होती. ते काम पाहून आल्यानंतर भाऊ प्रभावित झाले. आपण जे जीवन जगतोय ते काही खरे नाही. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी काही तरी करायला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यातून त्यांनी २००३ मध्ये आनंदवनस्नेही मंडळ या संस्थेची स्थापना केली. हे काम करत असतानाच भाऊ व त्यांचे काही सहकारी वैयक्तिक स्तरावर ज्या मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे, पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी जमेल तशी आर्थिक मदत करत होतेच. यातून पुढे अशा प्रकारचे काम संस्थात्मक स्तरावर करण्याचा विचार पुढे आला आणि १५ ऑगस्ट २००८ मध्ये शहापूर येथे विद्यादान साहाय्यक मंडळाची स्थापना करण्यात आली. समाजात आज असे अनेक विद्यार्थी आहेत, की ज्यांना आर्थिक परिस्थिती व अन्य काही कारणांमुळे शिकण्याची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही अथवा काही जणांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्या मुलांची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त होतात. अशा मुलांसाठी काम करणे आणि ते शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण कसे करता येईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. समाजात आजही सामाजिक बांधीलकीची जाणीव असलेला फार मोठा वर्ग आहे. प्रत्यक्ष काम किंवा वेळ देता येत नसला तरी आर्थिक मदतीच्या स्वरूपात आपण काही मदत करू शकतो, असे अनेकांना वाटते; पण हे करत असताना आपली आर्थिक मदत योग्य त्या ठिकाणी पोहोचावी, त्याचा योग्य तो विनियोग व्हावा, असेही त्यांना वाटत असते. या दोन्हींचा मेळ घालून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गरजू व लायक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

सुरुवातीला अवघे सहा ते आठ इतकीच विद्यार्थिसंख्या होती. सध्या १७० विद्यार्थी मंडळाच्या मदतीने शिक्षण घेत असून यात बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, एम.ए., एमएस्सी, पदवी आणि पदविकाधारक अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी, वैद्यकीय, परिचारिका, आयटीआय अशा विविध शैक्षणिक शाखांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या दोन-चार वर्षांत संस्थेतून ७० विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले असून त्यांना चांगली नोकरीही लागली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फक्त आर्थिक मदत केली जाते असे नाही, तर त्यांचा सर्वागीण विकास कसा होईल, त्याकडेही भाऊंचे कटाक्षाने लक्ष असते. त्यासाठी ‘कार्यकर्ता पालक’ अशी संकल्पना त्यांनी राबविली आहे. या प्रत्येक मुलामागे त्यांचा एक कार्यकर्ता त्या मुलाचा ‘पालक’ म्हणून काम करतो. आठवडय़ातून एकदा त्या मुलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याच्याशी तो बोलतो. महिन्यातून एकदा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी त्याचे बोलणे होते. वर्षांतून एकदा तो पालक कार्यकर्ता त्या मुलाच्या घरीही प्रत्यक्ष भेट देतो. या संवादातून विद्यार्थी व त्याच्या घरच्यांशी संवाद होतोच, पण त्याबरोबर त्यांच्या अडीअडचणी, त्याची शैक्षणिक प्रगती समजून घेतली जाते. प्रत्येक कार्यकर्ता पालक आपल्या पाल्याबाबतचा अहवाल दर महिन्याला संस्थेकडे सादर करतो. संस्थेकडे आज सुमारे दीडशे कार्यकर्ते असून यात अनेक जण उच्चविद्याविभूषितही आहेत.
दरमहा १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च या कार्यकर्त्यांनी केला, तर तो संस्थेकडून घ्यावा, असा संस्थेचा नियम आहे; पण आजवर एकाही कार्यकर्त्यांने एकही पैसा घेतलेला नाही. अनेक कार्यकर्ते संस्थेच्या कार्यालयात येऊन संस्थेसाठी विविध कामे करतात; पण कोणीही त्याचे मानधन घेत नाही. सर्व जण आपली मानद सेवा आणि वेळ संस्थेसाठी देतात. हे कार्यकर्ते संस्थेचे खरे वैभव असल्याचे भाऊ अभिमानाने सांगतात. कार्यकर्त्यांच्या विकासासाठीही शिबिरे घेतली जातात. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, श्रमसंस्कार छावणी, नोकरीसाठीच्या मुलाखतीकरिता मार्गदर्शन, इंग्रजी संभाषण व मार्गदर्शन वर्ग असे विविध उपक्रम आयोजित केले जातात. संस्थेतर्फे शहापूर व ठाणे येथे विद्यार्थी वसतिगृहसुद्धा सुरू करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी २० विद्यार्थी त्याता लाभ घेत आहेत.
खोपट येथे अरुण शेठ यांनी त्यांची स्वत:ची जागा संस्थेसाठी दिली आहे. या जागेचा उपयोग कार्यालय म्हणून केला जातो. रमेश कचोरिया, निमेश शहा यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून संस्थेच्या विविध उपक्रमांना उदार हस्ते आर्थिक मदत दिली जाते.

आज वयाच्या ८४ व्या वर्षीही भाऊ आजोबांचे काम एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा प्रकारे सुरू आहे. आता वयोपरत्वे ते सल्लागार, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले तरी आठवडय़ातून दोन दिवस ठाण्यातील खोपट भागात असलेल्या संस्थेच्या कार्यालयात ते आजही नियमितपणे जातात. संस्थेच्या कामासाठी ते काही वेळ देतात. संस्थेच्या कारभारावर त्यांचे बारीक लक्ष असते. संस्थेसाठी काम करण्याकरिता तरुण पिढी पुढे येत नाही. कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे काम करणारी मंडळी ४०-४५ वयाच्या पुढचीच आहेत. तरुण पिढीनेही आपण या समाजाचा एक भाग आहोत या जाणिवेतून सामाजिक/संस्थात्मक कामासाठी आपला काही वेळ द्यावा, असे आवाहनही भाऊ करतात. भाऊंच्या या कामाला त्यांच्या सौभाग्यवती शकुंतला, मुलगी नीता फाळके आणि हेमंत व प्रशांत या मुलांचाही नैतिक पाठिंबा आहे. मुले, सुना व नातंवडांत रमून एकीकडे त्यांचे हे सामाजिक कामही सुरू आहे. अशा सकारात्मक कामातून मिळणारा आनंद व समाधान खूप मोठे असल्याचे ते सांगतात. 

(  https://www.loksatta.com/thane-news/bhau-nanivadekar-social-activist-1210912/#sthash.Rt1uAOHp.gbpl  )  

(  http://vsmthane.org/  )  




No comments:

Post a Comment