Wednesday, February 28, 2018

सौ. लीला शाह - डोंबिवली - एक महान अविस्मरणीय भेट ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " )

" एक महान अविस्मरणीय भेट " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " ) 

सौ. लीला शाह - डोंबिवली यांचा २ / ३ दिवसांपूर्वी मला दूरध्वनी आला . त्या म्हणाल्या कि " आजची सत्यगीतं "हा माझा पहिला वाहिला काव्यसंग्रह त्यांनी वाचला व त्याचे परीक्षण त्यांनी लिहिले आहे . ते घेण्यासाठी व गप्पा मारण्यासाठी बोलविण्यासाठी त्यांचा दूरध्वनी होता. 

आज , बुधवार , २८ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्यांच्याकडे गेलो होतो . 

थोडं त्याच्या विषयी : त्या लेखिका , कवयित्री आहेत . त्याच्या अनेक कवितांना त्यांनी चाल देखील लावली आहे .  कोल्हापूरजवळील जयसिंगपूर येथे २२ ते २४ सप्टेंबर , २०१७  दरम्यान संपन्न झालेल्या  २२ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे  त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते . त्यांची  आतापर्यंत ६६ पुस्तके ( कादंबऱ्या , कविता ) प्रसिद्ध झाली आहेत . त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या एक पुस्तकाला तर महाराष्ट्र शासनाचा रुपये ५०,०००=०० चे ( अनुदान / पारितोषिक )  देखील मिळाले आहे . अरे हो विसरलो , त्यांचं वय फक्त ८३ वर्षे . अतिशय उर्जावान ( ENERGETIC ) . अजूनही विविध लिखाण चालू आहे . अतिशय नम्र , शांत बोलणं. 

अनेकविध विषयांवर बोलणं झालं . त्या आणि मी सुदैवाने मुळचे " इंडी " या कर्नाटक मधील एकाच गावचे . 

त्यांनी त्यांची एक अप्रतिम कविता ( चाल लावलेली ) , गाऊन  देखील ऐकवली . निघताना त्यांनी त्याचे एक पुस्तक मला सप्रेम भेट म्हणून दिलं . 

खरोखरच  " एक महान अविस्मरणीय भेट " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " ) 

माझ्या  " आजची सत्यगीतं " या माझ्या  पहिल्या  वाहिल्या  काव्यसंग्रहाचे  त्यांनी केलेलं परीक्षण , व त्याच्या सोबतच्या भेटीची काही छायाचित्रे येथे देत आहे . 

परीक्षण : 

सत्यजित शाह यांचा " आजची सत्यगीतं " हा कविता संग्रह वाचला . एकूण ऐंशी कविता - त्यातल्या काही दीर्घही आहेत. कविता वाचताना कवीच्या अतिशय संवेदनशील मनाचा पदोपदी प्रत्यय येत राहिला. त्यांच्या कवितांमधून समाज , राजकारण , राजकारणी , पर्यावरण , दुष्काळ , आत्महत्या , अंधश्रद्धा , कोडगी राजसत्ता , नवी पिढी असे अनेक विषय त्यांनी खूप तळमळीने मांडले आहेत . हे सर्व विषय जिवंत आहेत . 

सत्यजित यांच्या नावातच " सत्य " आहे त्या मुळे हे विचार अगदी सत्य आहेत . मात्र त्यांची " जीत " होईल का ? झाली तर जगातली कितीतरी दुःख दूर होतील. 

सत्यजित यांना जे जे प्रश्न पडलेत , ज्या ज्या व्यथा त्यांना छळतात ते सर्व प्रश्न संवेदनशील माणसालाही जाणवतातच . " अरे ! खरंच असंच चाललंय कि सगळं " " काय करू शकतो आपण " असं वाटून हृदयात एक बारीकशी कळ उठतेच - पण आपल्याला काय करायचंय ? मरेना  का कुणी तिकडे , या बधिर वृत्तीची खूप माणसं जगात असतात. अश्या माणसांना थोडं हलवण्याचं सामर्थ्य या कवितांमधून नक्कीच आहे . 

या पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण आहे . पाण्याचे प्रदूषण , कारखाने , रस्ते , धूर सारं काही त्यात आलेले आहे . 

या सर्व कवितांमधून कवीच्या मनातली वेदना , संवेदना , सामाजिक भान , तळमळ , कळकळ दिसून येते . कवीच्या इच्छेप्रमाणे लोकांना थोडी तरी " जाग " आली तरी कवीला कविता लिहिल्याचं सार्थक झालं वाटेल . 

सत्यजित यांच्या पहिल्या कविता संग्रहा साठी त्यांचं अभिनंदन आणि   पुढच्या दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा . 

सौ . लीला शाह 





No comments:

Post a Comment