Monday, March 5, 2018

मराठी भाषेवरील इंग्रजीचे अतिक्रमण





" प्रत्येक खऱ्या मराठी माणसाने गंभीरपणे विचार करावा "

कृपया या ध्वनिचित्रफितीतील साहित्यिक श्री. महेश एलकुंचवार यांचे विचार ध्यानपूर्वक ऐका .

अगदी याच मुद्द्यावर मी गेली अंदाजे २ / २.५ वर्षे मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध अक्षरशः एकट्याने लढत आहे .

या लढाईत सुद्धा मी " लोका सांगे ब्रम्हज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण " असे न करता अथवा " उंटावरून शेळ्या न राखता " मी स्वतः मराठी व्यक्तींशी ( अव्यावसायीक ) संवाद साधताना इंग्रजीचा वापर कमीत कमी करतो .

या विषयाबद्दल स्वतःला मराठी म्हणवून घेणाऱ्या अनेक व्यक्तींना जाणीव करून दिली आहे . आकाशवाणी ( RADIO ) वरील अनेक निवेदक , निवेदिका यांना दूरध्वनी करून अनेकदा विनवणी केली आहे . काही सुप्रसिद्ध साहित्यिकांबरोबर या विषयावर चर्चा केली आहे , पण दुर्दैव असे कि कोणालाच मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविषयी काहीच वाटत नाही . त्यांच्या मते जागतिकीकरणामुळे ( GLOBALISATION ) हे असं होणारच . पण हे असं ना जर्मनी मध्ये झालं , ना स्पेन मध्ये झालं . ते अजूनही एकमेकांशी त्यांच्या भाषेतच संवाद साधतात .

सुदैवाने " लोकप्रभा " या साप्ताहिकाने २७ फेब्रुवारी , २०१६ रोजी या विषयावरील माझा लेख छापून हा विषय वाचकांपर्यंत नेला होता.

" लोकसत्ता " या वृत्त्तपत्रामध्ये देखील बहुतांश बातम्या या शुद्ध मराठीत असतात .

दूरचित्रवाणीवरील आजकालच्या अनेक मराठी मालिकांमधील मराठी संवादांमध्ये कधी कधी तर ७० % एवढे इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्ये असतात . मराठी वृत्तवाहिन्यांचे देखील इंग्रजी मिश्रित मराठी ऐकून मन सुन्न होते .

आपण स्वतःला मराठी म्हणवून घेत असाल ( राजकारणापुरतं नव्हे ) , तर कृपया या गोष्टीचा गंभीरपणे विचार करा .

कृपया मराठी व्यक्तीशी / व्यक्तींशी ( अव्यावसायीक ) संवाद साधताना इंग्रजी शब्दे / वाक्ये यांचा कमीत कमी वापर करा .

कृपया माय मराठीला असं लोप पावण्यापासून वाचवा .

मराठीत बोला , मराठीतून लिहा .





बोला आवाज कोणाचा ? शुद्ध मराठीचा .

No comments:

Post a Comment