Wednesday, January 24, 2018

आरोग्य यंत्रणेने घेतला चिमुकल्याचा बळी - थरारून सोडणारी बातमी.......

थरारून सोडणारी बातमी.......
        मी आजवर अनेक थरारक बातम्या लिहल्या आहेत. अंडरवर्ल्ड, खून, बलात्कार, दरोडा, अपघात अशा घटनांचे वृत्तांकन केले आहे. परंतु कधीही बातमी लिहतांना हात थरथरला नाही की मन डगमगलं नाही. पण परवा मुंबई पोलीस दलात वाहतूक पोलीस असलेल्या संदीप सुर्वे यांची व्यथा ऐकून मन थरारून गेलं. मन थरारलं ते एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून.!!!  मीच काय पण संदीप सुर्वे यांची व्यथा ऐकून कुठलाही बाप थरारल्या शिवाय राहणार नाही.
       संदीप सुर्वे यांचा सात वर्षांचा चिमुरडा नाताळाच्या सुट्टीत मामाच्या गावी जायला मिळेल म्हणून खूप आनंदी होता. एकुलता एक मुलगा असल्याने आई बाबा त्याचे नेहमीच हट्ट पुरवायचे. तसाच सुट्टीत गावी जाण्याचा हट्ट देखील बाबांनी पुरवला. बाबांबरोबर गावी जातांना त्या चिमुकल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मला मामाच्या गावी खूप खूप खेळायचंय असं म्हणत तो चिमुकला गावी पोचताच खेळण्यास अंगणात गेला. अंगणात खेळत असतांनाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्या चिमुकल्याचा चावा घेतला अन ही छोटीशी घटनाच त्या चिमुकल्या जीवाची हेळसांड करण्यास कारणीभूत ठरली. कुत्र्याने चावा घेतल्या नंतर त्या चिमुकल्या मुलास योग्य वैद्यकीय उपचार मिळाला नाही. वेदनेने कळवळत असलेल्या आपल्या बाळास घेवून त्याचे आई बाबा अख्या मुंबईभरचे मोठमोठे हॉस्पिटल फिरत होते. मात्र त्या चिमुकल्याला कुठल्याही हॉस्पिटलवाल्यांनी दाखल करून घेतले नाही.
      देशाची आर्थिक राजधानी, जगातील आघाडीची स्मार्ट मेट्रो सिटी अशी बिरुद मिरवणाऱ्या शहरातील त्या हॉस्पिटलवाल्यांकडे एकच कारण होते ते म्हणजे आमच्याकडे रेबीज वरील औषधे उपलब्ध नाहीत तर कुणी म्हणत होते आमच्याकडे बेड उपलब्ध नाही. त्या जीवाची ही हेळसांड सतत सात तास सुरु होती. अखेर त्या चिमुकल्याने अक्षरशः आपल्या आई बाबांच्या मांडीवर तळमळत जीव सोडला....पण त्या आई बाबांची आर्तहाक त्या सफेद कापड्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोहचली नाही. त्या चिमुकल्याने जीव सोडल्यानंतर देखील तब्बल अडीच तास हॉस्पिटलवाल्यांनी तो गेलाय असे सांगितले नाही. हतबल झालेले आई बाबा आपल्या चिमुकल्याच्या निर्जीव शरीरा सोबत अडीच तास बोलत होते. त्याला उठवत होते.... तुला हे घेवून देवू ते घेवून देवू असे सांगत होते. परंतु अखेर त्यांचा बाळ उठलाच नाही.
        डॉक्टर हा पृथ्वीवरचा देव असतो असे म्हणतात पण खरंच देव इतका निष्ठुर असतो का? ज्यांच्या डोळ्यादेखत एका निरागस चिमुकल्याने तळमळत जीव सोडावा अन देवाने त्यास वाचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करू नये? अशा मुर्दाड लोकांना डॉक्टर तरी म्हणावे का, असा प्रश्न पडतो. एका हॉस्पिटलने तर हे कारण सांगून टाकले कि, आमच्याकडे मुलास ऍडमिट करून घेण्यासाठी बेडच शिल्लक नाही. खरंच या बड्या शहरात एका मुलाच्या जीवाची किंमत एका बेड पेक्षा स्वस्त आहे का?
- नरेंद्र राठोड,

No comments:

Post a Comment