Saturday, January 20, 2018

एका वर्षातील दुसरा " दिवाळी सण " ( दीपावली )

एका वर्षातील दुसरा " दिवाळी सण " ( दीपावली )
गम्मत पहा गणेशोत्स्तव हा दरवर्षी एकदा भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो व दुसऱ्यांदा माघी गणेशोत्स्तव असा दुसऱ्यांदा साजरा केला जातो . त्याच प्रमाणे नवरात्र हा सण वर्षातून दोनदा आश्विन (शारदीय) महानवरात्र व चैत्र (वासंती) नवरात्र , असा साजरा केला जातो .
आम्ही अतिशय सुदैवी आहोत कि आम्हाला वर्षातून दोनदा दीपावली म्हणजेच दिवाळी साजरी करायला मिळते . अहो असं वैतागू नकात . मी काही खोटं नाही बोलत . दरवर्षी हिंदू कार्तिक महिन्यात दीपावली हा पारंपरिक सण साजरा केला जातो , त्याचप्रमाणे आम्ही देखील वर्षातून एकदा कार्तिक महिन्यात दिवाळी सण साजरा करतो . पारंपरिक पद्धतीने आम्ही देखील दिव्यांची आरास करतो , आकाश कंदील लावतो . सारा परिसर हा " प्रकाश " मय झालेला असतो . सगळीकडे वातावरण उत्साहवर्धक झालेले असते . पण दुर्दैवाने हा सण एका वर्षातून फक्त एकदाच येतो .
पण आम्हाला मात्र वर्षातून दुसऱ्यांदा दिवाळी साजरा करण्याची संधी आमच्या सुदैवाने मिळते . त्या दुसऱ्या दिवाळीला मात्र सारा परिसर हा " प्रकाश " मय झालेला नसतो , पण आमच्या घरातील वातावरण हे " प्रकाश भाऊ आमटे " मय व " मंदा ताई आमटे " मय झालेले असते .
या वर्षातील आमच्या घरातील दुसरा " दिवाळी " हा सण शनिवार , १९ जानेवारी, २०१८ रोजी साजरा झाला . आमच्या घरातील वातावरण " प्रकाश भाऊ आमटे " मय व " मंदा ताई आमटे " मय कसे झाले होते ते या छायाचित्रातून दिसून येते .
मला येथे आवर्जून काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात .
प्रकाश भाऊ व मंदा ताई , यांचे कार्य तर अफाट , अवर्णनीय आहेच , प्रकाश भाऊ यांच्यावरील चित्रपटानंतर तर ते जोडपं अगदी घरा-घरात पोहोचले आहे . प्रसिद्धीच्या एवढं शिखरावर असून देखील , हे जोडपं अजूनही जमिनीवर आहे . साधी राहणी , उच्च विचारसरणी हे तर त्यांचे आपण सर्वांनी आवर्जून अंमलात आणण्यासारखे गुण आहेत. प्रकाश भाऊ , हेमलकसा येथे ज्याप्रमाणे बनियन व एका चड्डीत राहतात ( HALF PANT ) तसेच ते राहतात . त्या दोघांच्या चपला देखील अतिशय साध्या असतात .
दोंघांचे ही खाणं एवढं साधं त्याचप्रमाणे मोजून मापून आहे कि माझ्या सारख्या खादाड व्यक्तीला लाज वाटते.
भन्नाट वाचन , अनेक विषयांवरील भन्नाट माहिती , जगात काय काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती , अतिशय उच्च दर्जाची विनोद बुद्धी , भेटलेल्या व्यक्तींची नावे लक्ष्यात असणे , भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने बोलणे , हे व असे किती तरी गुण सांगण्यासारखे आहेत.
त्यांच्या कडून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत.
अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत , पण पुन्हा कधी तरी .
आम्हा सगळ्यांना अश्या प्रकारे येणारी दिवाळी वर्षातून अनेक वेळा यावीशी वाटते.
साधू संत येति घरा , तो ची दिवाळी दसरा !



No comments:

Post a Comment