Tuesday, March 27, 2018

धक्कादायक! वर्षभरात १ लाख मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा

धक्कादायक! वर्षभरात १ लाख मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा

मुंबईतील पालिका दवाखान्यात गेल्या दोन वर्षांत श्वानदंशाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीये. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५-२०१७ या वर्षात पालिका दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या ६४,९३४ मुंबईकरांना कुत्रा चावल्याची घटना समोर आली होती. यात शहरातील ११,४६२ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. तर पश्चिम उपनगरात ३१,२९३ लोकांना आणि पूर्व उपनगरातील २२,१७९ जणांना कुत्रा चावल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुंबई पालिका रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार,
  • मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६ वर्षांमध्ये ८० हजार ९३४ जणांना कुत्र्याचा चावा
  • मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ८२ हजार ५४६ जणांना कुत्रा चावला
  • तर मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या वर्षांमध्ये या प्रकऱणांमध्ये वाढ होऊन ही संख्या १ लाख ९ हजार ५६३ वर पोहोचलीये
ही आकडेवारी फार धक्कादायक असून यावर नागरिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. नागरिक संघटनेच्या म्हणण्यानुसार, “देशात दररोज जवळपास १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो. यातील वर्षाला साधारणतः वीस हजार जणांचा मृत्यू होतो. तर महाराष्ट्रात दररोज अंदाजे ७,७७७ जणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. विशेषतः श्वान दंश झालेल्यांपैकी ८० टक्के रुग्ण हे ३ ते ८ या वयोगटातील असतात. “
इतकंच नाही तर मुंबई सह महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी सांगितलं की, “कुत्रा चावल्यामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होताना दिसून येतेय. कुत्रा चावल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतो. मुंबईत साधारणतः दरवर्षी अंदाजे ८० हजार नागरिकांना कुत्रा चावतो होतो. तर ठाण्यात श्वानांची संख्या ४५ हजाराहून अधिक असून दरवर्षी ११ हजार कुत्र्याने चावा घेतल्याची प्रकरण समोर येतात.”
मुंबईत उघडय़ावरील कचऱ्यामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशात वाढ होतेय. काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्यानं मृत्यू झालाय. ही एकच घटना नसून वारंवार अशा घटना घडत असतात असंही शहा यांनी सांगितलंय.
शहा पुढे म्हणाले “रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये आशिया खंडात भारताचा पहिला क्रमांक लागतो. यासाठी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पालिका प्रयत्न करतेय मात्र तरीही ही प्रकरण वाढतायत. उच्च न्यायालयाने प्राण्यांसाठी शेल्टर होम बांधण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही याबाबत कुठल्याही प्रकारची पावलं उचलण्यात आलेली नाहीत.”

दरम्यान राज्य़ाचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन धोरण निश्चित केलं जाईल असं सांगितलं होतं.
या बातमीची साखळी ( LINK ) :  http://www.mymedicalmantra.com/marathi/dog-bites-total-one-lack-people-in-mumbai/

Sunday, March 25, 2018

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, सहावर्षीय साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू - हिंजवडी जवळील घटना


भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, सहावर्षीय साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू
हिंजवडी जवळील घटना
पिंपरी-चिंचवड | Updated: March 25, 2018 11:57 AM
कोठे गेले प्राणी मित्र ?
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?
तुम्ही , तुमच्यावर , तुमच्या आप्तेष्टांवर असा दुर्धर प्रसंग येईपर्यंत गप्प बसणार ?




सुमारे चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने एका सहा वर्षीय मुलाचा मुत्यू झाला. ही घटना हिंजवडी लगत असलेल्या माण गावात आज (दि.२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. साहिल अन्सारी असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
साहिल हा आज सकाळी सहाच्या सुमारास घरासमोर खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांनी साहिलच्या अंगाचे लचके तोडले. यात साहिल गंभीर जखमी झाला. सुरूवातीला त्याला माण गावात उपचार करण्यात आले. पण नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्या साहिलचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच एका बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये रोष असल्याचे दिसून येत आहे.


Saturday, March 17, 2018

विनोदी जाहिरात क्रमांक २ -केसांचे प्रत्यारोपण

विनोदी जाहिरात क्रमांक २ -केसांचे प्रत्यारोपण 

दूरचित्रवाणीवर केसांच्या प्रत्यारोपणाची एक जाहिरात जोरदारपणे चालू आहे . त्या जाहिरातीतील आशय पाहून मला भरपूर हसू येतं . 

ती जाहिरात तुमच्या साठी 

डोक्यावर कमी केस असलेलया  एका माणसाचा दूरध्वनीवर एका महिलेशी खालील संवाद होतो . 

माणूस : केसांच्या प्रत्यारोपणाचे ( HAIR TRANSPLANT चे ) किती पैसे लागतील . 
महिला : फक्त पंचावन्न हजार 
माणूस : काही समान मासिक हप्ता ( EMI )  वगैरे आहे का ?  
महिला : शून्य टक्के व्याज व फक्त एक रुपया आत्ता भरायचा . 
माणूस : मग एक रुपया कधी भरू ? 
महिला : भरला कि हो श्रीयुत देसाई , तुमची बायको आहे मी , तुमच्यावर एवढा खर्च तर मी करू शकते . 

ती जाहिरात तेथे संपते. 

या जाहिरातीतील गंमत पहा कि . तो माणूस ज्या आस्थापनामध्ये केसांच्या प्रत्यारोपणा च्या  चौकशीसाठी दूरध्वनी करतो त्या आस्थापनेमध्ये त्याचीच बायको नोकरी करते हे त्याला माहित नसते या पेश्या मोठ्ठा विनोद नसेल  त्याचप्रमाणे त्या बायकोला तिच्या नवऱ्याच्या टकलावर  केसांच्या प्रत्यारोपणाबद्दल पूर्वीच सांगतले नाही हा दुसरा विनोद देखील  अफलातून आहे . 

हसा व निरोगी व्हा ! 

" दुचाकी ( SCOOTER ) आकर्षक दिसते , कारण ती कमी पिते " - एक महा विनोदी जाहिरात


 " दुचाकी  ( SCOOTER ) आकर्षक  दिसते , कारण ती कमी पिते " - एक महा विनोदी जाहिरात 

एका सुप्रसिद्ध दुचाकीच्या  ( SCOOTER )  दूरचित्रवाहिनीवरील खालील जाहिरात पाहून माझं भरपूर मनोरंजन झालं . 

दारावरील घंटी ( DOOR BELL ) वाजते . एक तरुणी दरवाजा उघडते . दारावर बहुतेक एक विक्रेता तरुण दिसतो . तो म्हणतो माफ करा यावेळी आपल्याला त्रास दिला . ती तरुणी त्या तरुणाच्या मागे असलेल्या  दुचाकीकडे  ( SCOOTER )   बघते , आणि म्हणते कि तुझी XXXXXXXX  दुचाकी  एवढी  आकर्षक का आहे ? त्यावर " ती कमी पिते " असे तो तरुण उतरतो . 

कमी इंधन लागते म्हणून दुचाकी आकर्षक ? हा एक नवीन शोध लागला . मी यांत्रिकी अभियंता ( MECHANICAL ENGINEER  ) असूनही मला या एका गोष्टीबद्दल माहिती नव्हती याची मला लाज वाटली .  

कमी इंधन लागण्याचा  आणि दुचाकी आकर्षक दिसण्याचा काही संबंध आपल्याला द्यात असेल तर कृपया मला कळवावा . 

असो , आहे कि नाही हि एक अति विनोदी जाहिरात ? 

Monday, March 12, 2018

" मराठी Motivation ! " - अश्या मराठीची लाज वाटते .


" मराठी Motivation ! "
विद्या पालकर ताई ने हे मला कळविले आहे .
यांचे मराठी तुम्हाला कळले का ?
" मराठी Motivation ! " याला " मराठी प्रेरणा " असे देखील ते जे कोणी आहेत ते म्हणू शकले असते , पण त्यांना " मराठी Motivation ! " असे म्हणावेसे वाटले कारण , मराठी त्यांची MOTHER TONGUE आहे आणि त्यांना PROUD वाटते कारण THEY ARE MARATHI .
विद्या पालकर ताई धन्यवाद ( आजच्या शुद्ध मराठीत THANK YOU VERY MUCH .) .मला माहीत आहे कि " मराठीवर इंग्रजीच्या होणाऱ्या अतिक्रमणाविरुद्धच्या लढाईत तुझी मला मनापासून साथ आहे कारण तुझे देशील मराठीवर मनापासून प्रेम आहे.


Monday, March 5, 2018

मराठी भाषेवरील इंग्रजीचे अतिक्रमण





" प्रत्येक खऱ्या मराठी माणसाने गंभीरपणे विचार करावा "

कृपया या ध्वनिचित्रफितीतील साहित्यिक श्री. महेश एलकुंचवार यांचे विचार ध्यानपूर्वक ऐका .

अगदी याच मुद्द्यावर मी गेली अंदाजे २ / २.५ वर्षे मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध अक्षरशः एकट्याने लढत आहे .

या लढाईत सुद्धा मी " लोका सांगे ब्रम्हज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण " असे न करता अथवा " उंटावरून शेळ्या न राखता " मी स्वतः मराठी व्यक्तींशी ( अव्यावसायीक ) संवाद साधताना इंग्रजीचा वापर कमीत कमी करतो .

या विषयाबद्दल स्वतःला मराठी म्हणवून घेणाऱ्या अनेक व्यक्तींना जाणीव करून दिली आहे . आकाशवाणी ( RADIO ) वरील अनेक निवेदक , निवेदिका यांना दूरध्वनी करून अनेकदा विनवणी केली आहे . काही सुप्रसिद्ध साहित्यिकांबरोबर या विषयावर चर्चा केली आहे , पण दुर्दैव असे कि कोणालाच मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविषयी काहीच वाटत नाही . त्यांच्या मते जागतिकीकरणामुळे ( GLOBALISATION ) हे असं होणारच . पण हे असं ना जर्मनी मध्ये झालं , ना स्पेन मध्ये झालं . ते अजूनही एकमेकांशी त्यांच्या भाषेतच संवाद साधतात .

सुदैवाने " लोकप्रभा " या साप्ताहिकाने २७ फेब्रुवारी , २०१६ रोजी या विषयावरील माझा लेख छापून हा विषय वाचकांपर्यंत नेला होता.

" लोकसत्ता " या वृत्त्तपत्रामध्ये देखील बहुतांश बातम्या या शुद्ध मराठीत असतात .

दूरचित्रवाणीवरील आजकालच्या अनेक मराठी मालिकांमधील मराठी संवादांमध्ये कधी कधी तर ७० % एवढे इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्ये असतात . मराठी वृत्तवाहिन्यांचे देखील इंग्रजी मिश्रित मराठी ऐकून मन सुन्न होते .

आपण स्वतःला मराठी म्हणवून घेत असाल ( राजकारणापुरतं नव्हे ) , तर कृपया या गोष्टीचा गंभीरपणे विचार करा .

कृपया मराठी व्यक्तीशी / व्यक्तींशी ( अव्यावसायीक ) संवाद साधताना इंग्रजी शब्दे / वाक्ये यांचा कमीत कमी वापर करा .

कृपया माय मराठीला असं लोप पावण्यापासून वाचवा .

मराठीत बोला , मराठीतून लिहा .





बोला आवाज कोणाचा ? शुद्ध मराठीचा .

Saturday, March 3, 2018

शिक्षणाचा दूत भाऊ नानिवडेकर विद्यादान सहायक मंडळ , ठाणे

शिक्षणाचा दूत

वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात.

लोकसत्ता टीम | Updated: March 4, 2016 12:47 AM



वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात. शक्यतो कोणतीही नवी जबाबदारी घेत नाहीत. प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात, शरीर पूर्वीसारखे साथ देत नसते. आजवर खूप काम केले, आता विश्रांती घेऊ, मजा करू, देश-विदेशात फिरू, मुले व नातवंडांमध्ये रमू, पुन्हा कशाला नसती कामे मागे लावून घ्यायची, असाही विचार काही जण करतात. काही मंडळी देवधर्म, अध्यात्माकडे वळतात. आपण आणि आपले कुटुंब एवढेच त्यांचे विश्व असते. त्यामुळे काही सामाजिक काम करणे, विशिष्ट ध्येय उराशी बाळगून संस्था/संघटना उभी करणे, समाजासाठी आपला काही वेळ देणे ही तर दूरचीच गोष्ट राहिली.

नोकरी-व्यवसाय करत असताना समाजासाठी पाहिजे तितका वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे आता रिकामा वेळ आहे, तर तो सत्कारणी लावू या, असा विचार करणारे अपवादात्मक असतात. ठाण्याचे श्री.कृ. ऊर्फ भाऊ नानिवडेकर हे ८४ वर्षीय ‘वृद्ध तरुण’ असाच एक अपवाद. शिक्षण घेण्याची इच्छा आणि गुणवत्ता असूनही आर्थिक किंवा अन्य परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यादान साहाय्यक मंडळा’च्या माध्यमातून भाऊंचे विद्याज्ञानाचे कार्य गेली आठ वर्षे सुरू आहे. ठाणे जिल्हय़ातील शहापूर येथून सुरूकेलेले काम आता बोरिवली, पुणे येथे विस्तारले आहे.
नानिवडेकर कुटुंबीय मूळचे सातारा जिल्हय़ातील कोरेगावचे. भाऊंच्या वडिलांचे नाव कृष्णाजी बळवंत ऊर्फ अण्णा नानिवडेकर. ते प्राथमिक शिक्षक होते. १९३० मध्ये महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनाच्या हाकेला ओ देऊन सरकारी नोकरी सोडून ते साबरमती आश्रमात दाखल झाले. भाऊंचा जन्म, बालपण कोरेगाव येथे गेले. ‘मेकॅनिकल इंजिनीअर’पर्यंत शिक्षण झालेल्या भाऊंना सामाजिक कार्याचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. नोकरी, संसार यात गुंतलेले असतानाच २००३ मध्ये भाऊ व त्यांच्या काही मित्रांनी बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’, ‘हेमलकसा’ तसेच डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘शोधग्राम’ या प्रकल्पांना भेट दिली होती. ते काम पाहून आल्यानंतर भाऊ प्रभावित झाले. आपण जे जीवन जगतोय ते काही खरे नाही. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी काही तरी करायला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यातून त्यांनी २००३ मध्ये आनंदवनस्नेही मंडळ या संस्थेची स्थापना केली. हे काम करत असतानाच भाऊ व त्यांचे काही सहकारी वैयक्तिक स्तरावर ज्या मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे, पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी जमेल तशी आर्थिक मदत करत होतेच. यातून पुढे अशा प्रकारचे काम संस्थात्मक स्तरावर करण्याचा विचार पुढे आला आणि १५ ऑगस्ट २००८ मध्ये शहापूर येथे विद्यादान साहाय्यक मंडळाची स्थापना करण्यात आली. समाजात आज असे अनेक विद्यार्थी आहेत, की ज्यांना आर्थिक परिस्थिती व अन्य काही कारणांमुळे शिकण्याची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही अथवा काही जणांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्या मुलांची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त होतात. अशा मुलांसाठी काम करणे आणि ते शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण कसे करता येईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. समाजात आजही सामाजिक बांधीलकीची जाणीव असलेला फार मोठा वर्ग आहे. प्रत्यक्ष काम किंवा वेळ देता येत नसला तरी आर्थिक मदतीच्या स्वरूपात आपण काही मदत करू शकतो, असे अनेकांना वाटते; पण हे करत असताना आपली आर्थिक मदत योग्य त्या ठिकाणी पोहोचावी, त्याचा योग्य तो विनियोग व्हावा, असेही त्यांना वाटत असते. या दोन्हींचा मेळ घालून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गरजू व लायक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

सुरुवातीला अवघे सहा ते आठ इतकीच विद्यार्थिसंख्या होती. सध्या १७० विद्यार्थी मंडळाच्या मदतीने शिक्षण घेत असून यात बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, एम.ए., एमएस्सी, पदवी आणि पदविकाधारक अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी, वैद्यकीय, परिचारिका, आयटीआय अशा विविध शैक्षणिक शाखांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या दोन-चार वर्षांत संस्थेतून ७० विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले असून त्यांना चांगली नोकरीही लागली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फक्त आर्थिक मदत केली जाते असे नाही, तर त्यांचा सर्वागीण विकास कसा होईल, त्याकडेही भाऊंचे कटाक्षाने लक्ष असते. त्यासाठी ‘कार्यकर्ता पालक’ अशी संकल्पना त्यांनी राबविली आहे. या प्रत्येक मुलामागे त्यांचा एक कार्यकर्ता त्या मुलाचा ‘पालक’ म्हणून काम करतो. आठवडय़ातून एकदा त्या मुलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याच्याशी तो बोलतो. महिन्यातून एकदा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी त्याचे बोलणे होते. वर्षांतून एकदा तो पालक कार्यकर्ता त्या मुलाच्या घरीही प्रत्यक्ष भेट देतो. या संवादातून विद्यार्थी व त्याच्या घरच्यांशी संवाद होतोच, पण त्याबरोबर त्यांच्या अडीअडचणी, त्याची शैक्षणिक प्रगती समजून घेतली जाते. प्रत्येक कार्यकर्ता पालक आपल्या पाल्याबाबतचा अहवाल दर महिन्याला संस्थेकडे सादर करतो. संस्थेकडे आज सुमारे दीडशे कार्यकर्ते असून यात अनेक जण उच्चविद्याविभूषितही आहेत.
दरमहा १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च या कार्यकर्त्यांनी केला, तर तो संस्थेकडून घ्यावा, असा संस्थेचा नियम आहे; पण आजवर एकाही कार्यकर्त्यांने एकही पैसा घेतलेला नाही. अनेक कार्यकर्ते संस्थेच्या कार्यालयात येऊन संस्थेसाठी विविध कामे करतात; पण कोणीही त्याचे मानधन घेत नाही. सर्व जण आपली मानद सेवा आणि वेळ संस्थेसाठी देतात. हे कार्यकर्ते संस्थेचे खरे वैभव असल्याचे भाऊ अभिमानाने सांगतात. कार्यकर्त्यांच्या विकासासाठीही शिबिरे घेतली जातात. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, श्रमसंस्कार छावणी, नोकरीसाठीच्या मुलाखतीकरिता मार्गदर्शन, इंग्रजी संभाषण व मार्गदर्शन वर्ग असे विविध उपक्रम आयोजित केले जातात. संस्थेतर्फे शहापूर व ठाणे येथे विद्यार्थी वसतिगृहसुद्धा सुरू करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी २० विद्यार्थी त्याता लाभ घेत आहेत.
खोपट येथे अरुण शेठ यांनी त्यांची स्वत:ची जागा संस्थेसाठी दिली आहे. या जागेचा उपयोग कार्यालय म्हणून केला जातो. रमेश कचोरिया, निमेश शहा यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून संस्थेच्या विविध उपक्रमांना उदार हस्ते आर्थिक मदत दिली जाते.

आज वयाच्या ८४ व्या वर्षीही भाऊ आजोबांचे काम एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा प्रकारे सुरू आहे. आता वयोपरत्वे ते सल्लागार, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले तरी आठवडय़ातून दोन दिवस ठाण्यातील खोपट भागात असलेल्या संस्थेच्या कार्यालयात ते आजही नियमितपणे जातात. संस्थेच्या कामासाठी ते काही वेळ देतात. संस्थेच्या कारभारावर त्यांचे बारीक लक्ष असते. संस्थेसाठी काम करण्याकरिता तरुण पिढी पुढे येत नाही. कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे काम करणारी मंडळी ४०-४५ वयाच्या पुढचीच आहेत. तरुण पिढीनेही आपण या समाजाचा एक भाग आहोत या जाणिवेतून सामाजिक/संस्थात्मक कामासाठी आपला काही वेळ द्यावा, असे आवाहनही भाऊ करतात. भाऊंच्या या कामाला त्यांच्या सौभाग्यवती शकुंतला, मुलगी नीता फाळके आणि हेमंत व प्रशांत या मुलांचाही नैतिक पाठिंबा आहे. मुले, सुना व नातंवडांत रमून एकीकडे त्यांचे हे सामाजिक कामही सुरू आहे. अशा सकारात्मक कामातून मिळणारा आनंद व समाधान खूप मोठे असल्याचे ते सांगतात. 

(  https://www.loksatta.com/thane-news/bhau-nanivadekar-social-activist-1210912/#sthash.Rt1uAOHp.gbpl  )  

(  http://vsmthane.org/  )