Wednesday, February 8, 2017

पुणे - वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा - लोकसत्ता

लोकसत्ता  मुखपृष्ठ » पुणे » वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा!
प्रतिक्रिया

वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा !

सध्या शहरात दोन ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना रेबिजची लस देण्याचे काम चालते.

प्रतिनिधी, पुणे | February 8, 2017 2:48 AM

वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा !

शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना होणार

रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून वेगाने जाणाऱ्या मोटारींच्या मागे धावणारी भटकी कुत्री हा चालणाऱ्या आणि दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांच्याही त्रासाचा विषय झाली आहेत. धनकवडी, वडगाव शेरी, सहकारनगर आणि शहराच्या बाहेरच्या भागातून महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत आहेत. गेल्या वर्षभरात (सन २०१६) १८,०५९ नागरिकांना कुत्रा चावल्यामुळे लस घेण्याची पाळी आली असून, हा केवळ महापालिका दवाखाने आणि नायडू रुग्णालयात नोंदला गेलेला आकडा आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी निर्बीजीकरणाद्वारे त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी नागरिकांना रस्त्यांवर होणाऱ्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून तो तोकडा असल्याचे दिसून येत आहे. जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत केवळ ५,३०६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण होऊ शकले आहे.

शहरात कुत्री किती आहेत हे कळावे म्हणून या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कुत्र्यांच्या गणनेचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात निर्बीजीकरण झालेली व न झालेली कुत्री, तसेच पूर्ण वाढ झालेली कुत्री व पिल्ले यांची संख्या काढण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरू असूनही त्यांचा उपद्रव असल्याच्या तक्रारी येतातच. कुत्र्यांच्या गणनेद्वारे निर्बीजीकरणाचे नियोजन सुकर होऊ शकेल. घरोघरी जाऊन पाळीव कुत्र्यांची तसेच रस्त्यावर फिरून भटक्या कुत्र्यांची गणना करून घेतली जाईल.’’

सध्या शहरात दोन ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना रेबिजची लस देण्याचे काम चालते. आता बाणेरमध्ये असे ‘डॉग पाँड’ मार्चअखेरीस तयार होईल, तसेच कोंढव्यातही त्यासाठी जागा बघत आहोत, असेही डॉ. साबणे यांनी सांगितले.


वर्षभरात रेबिजचे २० मृत्यू

* शहरात गेल्या वर्षभरात रेबिजच्या वीस मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील १९ व्यक्ती पुण्याबाहेर राहणाऱ्या होत्या, तर एक जण पुण्याचा रहिवासी होता. त्यापूर्वीही २०१५ मध्येही रेबिजचे १६ बळी गेले आहेत. हे सर्व रुग्णही पुण्याबाहेरून उपचारांसाठी शहरात आले होते.

* कुत्र्याचा चावा साधा असल्यास रुग्णाला ‘रॅबिपूर’ हे इंजेक्शन व धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते, परंतु चावा खोल असेल तर त्याबरोबर ‘अँटिरेबिज सीरम’ हे इंजेक्शनही जखमेच्या ठिकाणी द्यावे लागते. यातील ‘रॅबिपूर’ व धनुर्वाताचे इंजेक्शन ग्रामीण भागात उपलब्ध होत असले, तरी ‘अँटिरेबिज सीरम’ सर्व ठिकाणी उपलब्ध नाही. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये अशा रुग्णांना ससून, नायडू किंवा वायसीएम रुग्णालयातच जावे लागते आहे. ससूनमध्ये रुग्णांना हे इंजेक्शन बाहेरूनच आणावे लागत आहे.

* राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात कुत्रा चावण्याची समस्या अधिक आहे शासकीय संस्थांमध्ये रॅबिपूर लस मोफत मिळते. ‘अँटिरेबिज सीरम’ सर्वच रुग्णांना द्यावी लागत नसून त्यासाठी रुग्णांना वरच्या रुग्णालयात पाठवतात’’





No comments:

Post a Comment