रविवार , १० मे, २०१५ च्या " नवा काळ " च्या अंकात माझा " अच्छे दिन आयेंगे " हा लेख छापून आला आहे. तो तुमच्या साठी येथे देत आहे. काही सूचना , चुका असतील तर मला satyajitshah64@gmail.com या ई मेल वर कळवा.
“ अच्छे दिन आयेंगे “
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान एका राष्ट्रीय पक्षाने " अच्छे दिन आयेंगे " हि घोषणा दिली होती , त्याची सगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये खूप जाहिरात केली होती , व हि निवडणूक घोषणा / जाहिरात तुफान लोकप्रिय ( CATCHY ) झाली होती . अगदी लहाना पासून ते थोरांपर्यंत , गरिबा पासून श्रीमंतांपर्यंत हि घोषणा पोहोचली होती . अनेकांच्या बोलण्यातून जश्या गाण्याच्या ओळी येतात तशी हि घोषणा यायची . या घोषणेमुळे त्या पक्षाला चांगल च मतदान झाल व बऱ्याच वर्षांनी भारतात एखाद्या पक्षाला बहुमत मिळाल . तुम्ही म्हणाल कि हे तर आता सगळ्यांनाच माहित आहे , काही तरी नवीन लिहा . तुमच्यापैकी .काही तर असेही म्हणाल कि का आमच्या जखमेवर मीठ चोळताय ? अगदी बरोबर आहे तुमच , मी तुम्हाला काही नवीनच सांगणार आहे .अहो भाऊ , दादा , ताई, माई , अक्का माझे जरा थोडेसे तरी तुम्ही ऐका .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे , आपण सगळेच हे विसरत आहात कि या घोषणेत कोठेही म्हटले नव्हते कि कोणाचे " अच्छे दिन " येणार आहेत . निदान मला तरी कोठेही वाचल्यासारख आठवत नाही कि अमक्याचे " अच्छे दिन " येणार आहेत, तमक्याचे " अच्छे दिन " येणार आहेत. जर भारतीय नागरिकांनी असा समज करून घेतला कि त्यांचेच " अच्छे दिन " येणार आहेत तर त्या पक्षाची अथवा पक्षातील नेत्यांची कशी काय चूक आहे ? त्यांना का बरे जबाबदार पकडले जाते ? त्यांच्या या घोषणेची का “ कब आयेंगे अच्छे दिन ? “ अशी खिल्ली उडवली जाते हेच मला कळत नाही. विरोधकांना नाहीतरी काही कारणच हवे असते. बर असही नाही कि त्या घोषणे मध्ये " अच्छे दिन आयेंगे " याची तारीख , अथवा वर्ष सांगितलं नव्हत. भारतीय नागरिकांनी जर स्वतःच असा गैरसमज करून घेतला कि केंद्रात शासन बदलल तर लगेचच " अच्छे दिन " येणार आहेत तर हि नागरिकांची , मतदारांची फार मोठी चूक आहे. यात त्या पक्षाला दोषी धरणे हे चुकीचे आहे हे माझ्या सारख्या एका क्षुद्र भारतीय नागरिकाचे मत आहे . भारतात माझ्या सारख्या क्षुद्र नागरिकाच्या मताला काहीच किंमत नसते हे एक त्रिवार सत्य माहित असूनही मी हे माझे मत मांडतो आहे.
ही झाली नाण्याची एक बाजू , आता नाण्याची दुसरी बाजू मी आपल्या समोर मांडतो . कोण म्हणतो " अच्छे दिन " नाही आले ?
-
ज्यांनी या राजकीय पक्षा साठी ही घोषणा , जाहिरात बनविली त्यांना विचारा , ते जरूर म्हणतील त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत.
-
त्या राजकीय पक्षाचे जे नेते खासदार झाले आहेत त्यांना विचारा , ते म्हणतील त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत.
-
मित्र पक्षाचे व स्वतः अथवा स्वतःच्या पक्षामुळे निवडून यायची शक्यता कमी होती, पण " अच्छे दिन आयेंगे "या घोषणा देणाऱ्या राजकीय पक्षाबरोबरच्या युतीमुळे जे खासदार झाले त्यांना विचारा, ते ही म्हणतील त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत.
-
निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून ( म्हणजेच आपल्या भाषेत टोपी बदलून ) , त्या पक्षात प्रवेश करून खासदारकीचे तिकीट मिळवून खासदार झालेल्यांना विचारा त्यांचे मत , ते ही म्हणतील कि त्यांचे व त्यांच्या कार्याकार्यांचे " अच्छे दिन " आले आहेत .
-
जे खासदार केंद्रीय मंत्री मंडळात मंत्री झाले आहेत त्यांना विचारा , ते तर जरूर म्हणतील कि त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत..
-
ज्या उद्योगपतींनी या राजकीय पक्षाला राजकीय देणग्या दिल्या होत्या , त्यांना विचारा ते खाजगीत सांगतील कि त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत .
-
ज्या राजकीय नेत्यांची कोणत्या न कोणत्या पदावर नेमणूक झाली आहे त्यांना विचारा , ते देखील असेच म्हणतील कि त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत.
-
शेअर मार्केट मधील दलालांना विचारा ते तर " घणो सारो दिन आवे छे " ( " बहोत अच्छे दिन " ) आले आहेत असे म्हणतील .
-
असे ऐकले जाते कि काही ठराविक उद्योगपतींना " अच्छे दिन " आले आहेत.
-
अस म्हणे कि गुजरात ची जनता म्हणते कि त्यांना " अच्छे दिन " आले आहेत.
असे अजूनही काही भारतीय म्हणत असतील कि त्यांचे " अच्छे दिन " आले आहेत.
आपणा सर्वांना ती अर्धा ग्लास भरलेला व अर्धा ग्लास रिकामा ही कहाणी तर माहीतच असेल . त्यातून आपल्याला काय शिकविले जाते ? जरी तो अर्धा ग्लास रिकामा असला तरीही आपण नेहमी सकारात्मक रहाव व अस म्हणाव कि अर्धा ग्लास भरलेला आहे . हेच नेमक भारतीय नागरिक का बरे विसरतो ? सकारात्मक राहाण भारतीयांना का जमत नाही ? भारतीयांनी , विरोधकांनी सदा न कदा आपल नकारात्मक दृष्टीकोन ठेवण योग्य वाटत का ? आता एवढ्या मोठ- मोठ्ठ्या व्यक्ती जर म्हणतात कि " अच्छे दिन " आले आहेत तर बाकीच्यांनी हि गुमान म्हणाव कि नाही " अच्छे दिन " आले आहेत . पण नाही सदानकदा नन्नाचा पाढा .
आता जरा गाजत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रश्नाविषयी थोडस. अवेळी पाउस , गारपीट यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली , पण त्यांच्या हि कुटुंबाला " अच्छे दिवस " आलेच होते पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करताना जी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात गारपीट , वादळ , अवेळी पाउस यामुळे आत्महत्या केली असे लिहिले नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे " अच्छे दिवस " येण्यावर पाणी फिरलं आहे . त्याला हे सरकार , शासनकर्ते कसे काय जबाबदार आहेत तुम्हीच सांगा. आता या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी शासकीय चोकटीत बसेल अश्या पद्धतीनेच आत्महत्या करायला नको का ? उद्या तुम्ही असेही म्हणाल कि आत्महत्या कशी करायची, आत्महत्या करण्याअगोदरच्या चिठ्ठीत काय लिहायचे हे हि शासनानेच त्यांना शिकवायचे का ?
या पुढे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाचे “अच्छे दिन” येण्यासाठी खालील गोष्टींची काळजी आत्महत्या करण्यापूर्वी घ्यावी.
-
शासकीय सुट्टी , रविवार , अशा सुट्टीच्या दिवशी आत्महत्या करू नये. अशी आत्महत्या शासकीय मदतीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही .
-
आत्महत्या करण्याचे कारण सुस्पष्ट अक्षरात व कमाल २०० शब्दातच लिहावे. कागदावर पाठपोट लिहू नये.
-
आत्महत्येची चिठ्ठी मराठीतच असावी . अन्य भाषेतील चिठ्ठी ग्राह्य धरली जाणार नाही.
-
या पत्रात आत्महत्येची जी कारणे दिली असतील त्यात वादळ, गारपीट हे शब्द नसतील तर ती आत्महत्या शासकीय मदती साठी ग्राह्य धरली जाणार नाही.
-
आत्महत्या करण्याच्या कारणाच्या कागदावर तारीख, वार , साल, वेळ सगळ लिहाव.
-
त्या आत्महत्या पत्रात शेवटी आत्महत्या करणाऱ्याने स्वतःची सही करावी. सही खाली त्याने स्वतःचे नाव , वडिलांचे नाव व आडनाव सुस्पष्ट लिहावे व त्यासोबत २ साक्षीदारांची सही सुद्धा घ्यावी.
-
त्या आत्महत्या पत्रा सोबत आत्महत्या करणाऱ्याने स्वताचे २ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो लावावेत. फोटो सहा महिन्यापेक्षा जुने नसावेत .
-
आत्महत्या करणाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या बँकेतील खात्याचा नंबर , बँकेचे नाव , बँकेचा पत्ता लिहावा म्हणजे शासकीय मदत त्या बँकेच्या खात्यात जमा केली जाईल.
-
एका कुटुंबातील एकाच आत्महत्ये साठीची शासकीय मदत मिळेल.
-
माझ्या आत्महत्येस शासन जबाबदार नाही हे त्या आत्महत्या पत्रात नमूद केलेलं असाव .
-
आत्महत्येच्या चिठ्ठी मध्ये खाडाखोड केलेली किंवा अक्षरावर अक्षर लिहिलेलं शासकीय मदतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
आत्महत्या करण्याअगोदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फक्त एवढ्या काही साध्या , सोप्या गोष्टी केल्या तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे अच्छे दिन अवश्य येतील. शेतकरी का विसरतात कि शासनाचे काही नियम , धोरणे हि ठरलेली असतात . शासनाला नियमांचे उल्लंघन करता येत नाही, शासकीय नियम तोडून शासकीय मदत शासन कशी काय देणार ? उलट या शासनाचे आभार मानले पाहिजेत कारण शासनाने आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास कधीच नाही म्हटले नाही.
हि सगळी लिखा पढी व्यवस्थित करून जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांच्या कुटुंबियांचे अवश्य " अच्छे दिवस " आले असते. उगाचच काही विरोधक या विरुद्ध का आरडा ओरडा करताहेत हेच कळत नाही.
असच काहीस इतिहासात घडल होत. तेव्हा मी शाळेत होतो. त्यावेळेस एका राजकीय पक्षाने " गरिबी हटाओ " असा नारा निवडणूक प्रचारात दिला होता . तो नारा भारतीयांना एवढा भावला होता कि त्या राजकीय पक्षाला निवडणुकीत दणदणीत यश मिळाल होत. केंद्रात अनेक वर्षे त्याच पक्षाचे सरकार होते . " गरिबी हटाओ " या नाऱ्यावर त्या राजकीय पक्षाने अनेक निवडणुका जिंकल्या . अनेक वयोवृद्ध भारतीय असे म्हणतात कि" गरिबी हटाओ " हि घोषणा एक घोषणाच म्हणून इतिहास जमा झाली आहे. अस म्हणे कि अजूनही बहुतांश भारतीयांची गरिबी हटली नाही. पण गम्मत म्हणजे त्या राजकीय पक्षाला कधीच एकाही भारतीयाने जाब विचारला नाही कि आपण दिलेल्या " गरिबी हटाओ " या घोषणेचे काय झाले ? आमची गरिबी कधी हटणार ? मला मग हा एक प्रश्न पडतो कि याच पक्षाला ज्यांनी " अच्छे दिन आयेंगे " हि घोषणा दिली व निवडणुका जिंकल्या त्यांनाच का लगेचच विचारले जाते कि अच्छे दिन कब आयेंगे ?
आता मी आपल्या समोर या " गरिबी हटाओ " या नाण्याची दुसरी बाजू मांडू इच्छितो. आणि ती म्हणजे त्या पक्षाचे सरकार आल्यावर गेली अनेक वर्षे त्या राजकीय पक्षातील कितीतरी राजकीय नेत्यांची घराणी च्या घराणी राजकारणात स्थिरावली . अनेकांच्या अनेक स्थिर स्थावर मालमत्ता झाल्या , अनेक परदेशी गाड्या आल्या , त्यांची मुले परदेशात शिक्षण घेवू लागली. किती तरी नेत्यांची अनेक महामंडळांवर वर्णी लागली. किती तरी नेते साखर सम्राट झाले , मद्य सम्राट झाले , शिक्षण सम्राट झाले , बांधकाम सम्राट झाले असे वेग-वेगळे सम्राट त्या राजकीय पक्षातील अनेक नेते झाले . स्विस बँकेत भारतातून भरभरून पैसा पाठवला गेला असेही ऐकल जात. कितीतरी भारतीयांचे मोठ्ठे बंगले बांधले गेले . एका उद्योगपतीने तर २७ मजली इमारत त्याच्या फक्त ५ व्यक्तींच्या कुटुंबासाठी बांधली. यावरून असे सिद्ध होते कि काही ठराविक भारतीयांची श्रीमंती वाढली. तरीही तुम्ही म्हणता गरिबी दूर नाही झाली. किती हे भारतीयांचे नकारात्मक विचार ? आता ती अर्धा ग्लास भरलेला हि गोष्ट मी काही परत सांगत बसत नाही.
आता मला सांगा कि अनेक जण गोरं होण्यासाठी " FAIR & LOVELY " अथवा तत्सम क्रीम जाहिरात पाहून लावत असतील , पण त्यातील खरच कोणी गोरं झालं आहे ? एका शीतपेयाच्या जाहिराती मध्ये एक सुप्रसिद्ध सिने कलाकार " आज काही तुफानी करूया " असं सांगत असतो , पण तुम्हीच सांगा कि ते शीतपेय पिउन तुमच्यापैकी किती जणांना तुफानी करण्याची ताकत येते ? अनेक वर्षांपासून एका विशिष्ठ नावाच्या अंगाला लावायच्या साबणाच्या जाहिरातीत अनेक सुप्रसिद्ध चित्रपट नायिकांनी ते साबण लावलं आहे . त्याचं पाहून अनेक भारतीय स्त्रियांनी ते साबण वापरले असेल पण मला सांगा कि किती जणी ते साबण लाऊन त्या चित्रपट नायीकांसारख्या सुंदर झाल्या आहेत ? पण तरीही आपण या सगळ्या जाहिराती आवडीने पाहतो , भुलतो , त्या वस्तू विकत घेतो, वापरतो देखील व ताबडतोब विसरून देखील जातो.
तेव्हा भारतीयांनो नेहमीच सकारात्मक विचार करा. " अच्छे दिन " येणार हे त्या एका राजकीय पक्षाने तुमच्या मनावर बिंबवले . तुम्हाला तशी स्वप्ने पहायला शिकवले . हा एक मोठ्ठा भारतीय मतदारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला तेही नसे थोडे थोडके. याचे तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत. आत्तापर्यंत एकाही राजकीय पक्षाने सामान्य भारतीय नागरिक हि " अच्छे दिन " ची स्वप्ने बघू शकतो हे त्या नागरिकाच्या ध्यानात आणून दिले नव्हते का मुद्दामून येवू दिले नव्हते हा एक वाद विवादाचा मुद्दा ठरू शकेल . आता पर्यंत भारतीय नागरिक बिचारा जे वाटेला येईल तेच आपले नशीब मानून आपले आयुष्य कसे बसे ढकलत होता. या निवडणुकीतील घोषणा , नारे, आश्वासने , जाहिरात बाजी याच्या किती आहारी जायचं हे सुज्ञ भारतीयाने ठरविले पाहिजे, पण ते निवडणुकीत मतपेटीद्वारे योग्य वेळी दाखवून हि दिलं पाहिजे .
तेंव्हा भारतीयांनो खालील छोटीशी कविता हे सुखी जीवनाचे सूत्र म्हणून सदा लक्षात ठेवा व तुमच्या मुला बाळांनाही सांगा .
जो दिन थे
वो अच्छे समजो
जो दिन है
वो अच्छे समजो
जो दिन आयेंगे
वो अच्छे समजो
रोज सकाळी उठल्यावर काही व्यक्ती खालील प्रार्थना म्हणतात व दिनक्रम चालू करतात
कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
त्याच प्रमाणे आपण प्रत्येक भारतीयाने हि खालील छोटीशी प्रार्थना रोज झोपेतून उठल्यावर म्हणावी व आपला दिनक्रम चालू करावा म्हणजे आपल्याला सगळेच दिवस हे " अच्छे दिन " वाटतील .
अच्छे दिन आयेंगे,
तब हम बुढे हो जायेंगे ,
उनके ५ साल निकल जायेंगे ,
नयी घोषणा वे लायेंगे ,
मतदाता को नयी आशा दिखायेंगे ,
फिरसे वो हि चुनके आयेंगे ,
हम राह देखते ही रह जायेंगे
कभी तो अच्छे दिन आयेंगे
तेंव्हा भारतीयांनो नकारात्मक जगणं सोडा , नेहमीच सकारात्मक राहा. धीर धरा. तुम्ही नाही " अच्छे दिन " पाहू शकलात म्हणून काय झालं ? तुमची पुढची पिढी किंवा त्याच्या पुढील पिढी तरी ते निवडणुकीच्या घोषणेतील व मतदाराला गाजर दाखविलेले " अच्छे दिन " पाहू शकतील.
मी पण ते "अच्छे दिन" पाहण्यासाठी अगदी जय्यत तयारी निशी आतुरतेने वाट पाहतो आहे. नेत्र विशारद कडून माझे डोळे दाखवून चष्म्याचा नंबर वाढला तर नाहीना याची खातर जमा करून नुकताच आलो आहे.. नाहीतर ते " अच्छे दिन आयेंगे " पण मलाच ते नाही दिसायचे . तसे झाले तर माझ्या सारखा दुर्दैवी मीच असेल . आपले " अच्छे दिन " आले तर मला जरूर कळवा.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet