Sunday, May 6, 2018

धक्कादायक! ठाण्यात अर्ध्या तासाला लोकांना कुत्रा चावतोय



धक्कादायक! ठाण्यात अर्ध्या तासाला लोकांना कुत्रा चावतोय
मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही भटक्या कुत्र्यांचा वावर वाढू लागलाय. ठाणे महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,२०१०-२०१७ या वर्षात पालिका दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या ९०,२४९ ठाणेकरांना कुत्रा चावल्याची घटना समोर आल्यात



  • मुंबईनंतर ठाण्यातही भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ
  • ठाण्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकजण जखमी
  • २०१०-२०१७ या वर्षात कुत्रा चावल्याने ९०,२४९ रूग्णांनी पालिका रूग्णालयात घेतले उपचार
  • ठाण्यात घडतेय ३० मिनिटाला एक कुत्रा चावण्याची घटना
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. मुंबईनंतर आता ठाण्यातही भटक्या कुत्र्यांचं प्रमाण अधिक असल्याने मोठ्याप्रमाणात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडू लागल्यात.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांच्या माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये,
  • २०१०-११ या वर्षांत ९,७७२ जणांना कुत्र्याने चावा घेतला
  • २०१२-१३ या वर्षांत या संख्येत किरकोळ वाढ होऊन ११ हजार १४६ इतकी झाली
  • २०१४-१५ मध्ये १४ हजार ६०३ लोकांना कुत्रा चावला
  • २०१५-१६ मध्ये १३ हजार ९६० जणांना कुत्रा चावला
  • २०१६-१७ मध्ये १४ हजार ७४२ लोकांना कुत्र्याने चावा घेतला
  • तर २०१७ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ४ हजार २३१ कुत्रा चावल्याच्या घटना घडल्यात
यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा म्हणाले, ‘‘पालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची ही आकडेवारी आहे. खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या यावरूनही जास्त असू शकते. सर्वसाधरणतः ३० मिनिटाला एक कुत्रा चावतो असं पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. कुत्रा चावण्याच्या या घटना भयंकर असून पालिकेनं याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही. कुत्र्यांची आकडेवारी विचारली असताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार एकूण लोकसंख्येच्या एक किंवा दोन टक्के कुत्रे असल्याचं उत्तर मिळालंय. यावरून भटक्या कुत्र्यांची आकडेवारी पालिका प्रशासनाकडे नसल्याचं समोर येतंय.’’
‘‘ठाण्यात ४५०-५०० जनरल फिजिशियन असून काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे दर दिवशी एक किंवा दोन कुत्रा चावल्याची प्रकरणं येतात. पण ही माहिती सरकारकडे नाही. मुळात कुत्र्याचं नख लागणं, भटक्या कुत्र्यानं ओरखडा काढणं, कुत्र्यांची लाळ माणसांच्या जखमेवर लागण्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे पालिका प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांबाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे’’ असंही शहा यांनी म्हटलं आहे.
ठाण्यातील मेडिकल सोशल वर्कर डॉ. आनंद हर्डीकर यांनी सांगितलं की, ‘‘भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचं मुळं बीज आहे. २००१ मध्ये अस्तिवात आलेला अॅनिमल वेल्फेअर बर्थ कंट्रोल या कायद्यात बदल होणं गरजेचं आहे. या कायद्यानुसार कुत्र्यांच्या प्रजनन क्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया करणं हा उपाय आहे. परंतु, यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय. कुत्र्यांच्या निर्जिनीकरणासाठी जे इंजेक्शन वापरलं जातं. यासाठी कल्याण महानगरपालिकेतर्फे दरवर्षी कोट्य़ावधी रुपये खर्च केले जातात.’’
‘‘माझ्याकडे दर आठवड्याला एक किंवा दोन रुग्ण कुत्रा चावल्याची तक्रार घेऊन येतात. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार भटक्या कुत्र्यांवर उपाय करण्याची विनंती केली. मात्र पालिका प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही. विशेषतः उच्च न्यायालयाने डिसेंबर २००८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार मुंबई पालिका प्रशासनाला कुत्र्यांना जीवे मारण्याचा अधिकार दिला होता. त्यावर काही प्राणी प्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अद्याप स्थगिती दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय होणं गरजेचं आहे’’, असं मतंही डॉ. हर्डीकर यांनी सांगितलं.
वर्ष               श्वानदंश            प्रति महिना         प्रति दिन
२०१०-११         ९७७२                ८१४                   २७
२०११-१२        ८३३२                 ६९४                   २३
२०१२-१३       ११,१४६               ९२९                   ३१
२०१३-१४       १३,२४३              १११९                   ३७
२०१४-१५       १४,६०३              १२१६                   ४१
२०१५-१६       १३,९६०              ११६३                   ३९
२०१६-१७       १४,७५२             १२२९                    ४१

No comments:

Post a Comment