Sunday, April 2, 2017

तर साई माफ करणार नाही.............. नवा काळ सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे अप्रतिम व सर्वांचे डोळे उघडणारा अग्रलेख

तर साई माफ करणार नाही..............

रविवार , २ एप्रिल, २०१७ च्या " नवा काळ " या वृत्त पत्रातील सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांचा एक अप्रतिम व सर्वांचे डोळे उघडणारा अग्रलेख " तर साई माफ करणार नाही.............. " येथे देत आहे.


शिर्डी येथील श्रीसाईबाबा समाधीला २०१८ साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी २०१८ साली जागतिक दर्जाचा उत्सव व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने शताब्दी महोत्सवासाठी ३०००कोटींचा निधी मंजूर केला पण ज्या श्री साई्ंच्या समाधी शताब्दी महोत्सवासाठी हे ३००० कोटी रू सरकार खर्च करणार आहे त्या श्री साईंना हे आवडेल का? त्यांना आनंद वाटेल का?
श्री साईंचे संपूर्ण आयुष्य फाटके कपडे आणि पोटापुरते अन्न यात गेले. निरपेक्ष समाजसेवा करणारे ते कर्मयोगी होते. फाटके कपडे आणि डोईवर कफन बांधून ते आले आणि त्याच स्थितीत गेले शेवटपर्यंत पोटापूरते अन्न यापलीकडे त्यांनी काहीच साठवले नाही. दुःखी, पिडीत समाजाला मार्ग दाखवायचा आणि मदत करायची हे त्यांच्या जीवनाचे सार होते. आजच्या युगात अशी व्यक्तीमत्वे घडतील यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. म्हणूनच त्यांनी समाधी घेऊन १०० वर्षे झाल्यावरही आपण त्यांची आठवण काढतो. आजही दुःखात, संकटात आणि आनंदातही शिर्डीची वारी होते.
अशा श्री साईंच्या समाधी सोहळ्यावर ३००० कोटी रु. खर्च केले जाणार आहेेत.हे ऐकून साईंना काय वाटले असावे? त्यांना दुःख झाले असेल, ते मम्हणत असतील की, माझ्या कार्यातून मी जो संदेश दिला तो माझ्या भक्तांना कळलाच नाही. मी सेवेचे व्रत घेतले आणि माझे भक्त संपत्तीचा आरास बांधतात. कशासाठी? कुणासाठी? मला मोगऱ्याची फुले आवडतील, भाकरी-भाजी ने मी समाधानी होईन, माझ्या भक्तांनी कोणाचे अश्रू पुसले तर मी शांतपणे झोपेन पण माझ्या भक्तांनी मला सोन्याने मढवून ठेवले ज्या सोन्याला मी मातीसमान मानले, त्याच सोन्याच्या सिंहासनावर मला बसवले, आता माझ्या समाधी सोहळ्यावर ३००० कोटी ते खर्च करणार? जागतिक महोत्सव करणार, अशा महोत्सवातून त्यागाचा आणि सेवेचे संदेश जाऊ शकतो का? माझ्या प्रतिमेपुढे जग झुकते, भरभरून दान देते. मात्र मला आनंद वाटत नाही. कारण हे सर्वजण माझे संदेश, माझे कार्यच विसरून गेले आहेत. मी माझ्या आयुष्यात कधी सोन्याची चैन काढून दाखवली नाही. फक्त धीर दिला. पाठीवर हात ठेवला आणि दुःख दुर करण्याचा प्रयत्न केला. पण माझे भक्त म्हणविणारी ही माणसे, चुकीच्या मार्गाने चालली आहेत.
महाराष्ट्राचे सरकार कर्जबाजारी आहे, त्यांच्याकडे शेतमालाला हमीभाव देण्यासाठी पैसे नाहीत, तुर डाळ साठवायला पारदाने आणण्यासाठी पैेसे नाहीत, शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने आम्ही थाटात लावून देतो असे हे सरकरा म्हणत नाही. रोज एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. तरूण शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केलेला शेतकरी जीव देतो आहे. कितीसे कर्ज असते त्यांचे? पन्नास हजार, एक लाख, नाहीतर दोन लाख इतकेच कर्ज असते. पण तेही फेडू शकत नाहीत. म्हणून आत्मह्त्या करू लागले आहेत. सरकारने विद्यार्थ्यांची फी माफ केली पण त्यांच्या पोटात दोन घास अन्न जात नाही, त्याचे काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार कोण देईल? त्या माऊलीचे अश्रू कोण पुसेल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. यावर्षी दुष्काळ पडणार असे भाकीत आहे. तसे झाले तर हाहाकार माजेल.
शेतकऱ्यांना मदत केली तर आर्थिक शिस्त बिघडते असे मुख्यमंत्री म्हणतात. मग शेतकऱ्यांना मरायला सोडून श्री साई समाधी उत्सवावर ३००० कोटी मंजूर केेले तेव्हा आपण श्री साईंच्या कार्याचा अपमान करतो आहोत असे वाटले नाही का? समाधी सोहळ्यासाठी तीन हजार तेवीस कोटी सरकार देणार आहे. त्यातील एक हजार सत्तावन्न कोटी दर्शन रांगा उभारण्यासाठी एकशे एकेचाळीस कोटी तारांगण आणि मेणाच्या मूर्तीच्या संग्रहालयासाठी, बहात्तर कोटी लेजर शो साठी, सत्तावीस कोटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आणि एकोणसाठी कोटी वाढीव पाणीपुरवण्यावर पहिल्या टप्प्प्यात खर्च होणार आहेत. या इतक्या रकमेत शेतडो शेतकरी कुटुंबिय कुटुंब वाचतील शेतकऱ्यांना वाचवायला पैस नाही, आणि तारांगण, म्यूझीेअम, लेजर शोवर उधळायला सरकारवर पैसा आहे. विमानतळासाठी पैसा आहे पण अनाथ झालेल्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी पैसा नाही.
श्री साईंचा समाधी शताब्दी सोहळा अत्यंत साधेपणाने व मनोभावाने साजरा झाला पाहीजे. एक हजार शेतकरी कुटूंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू या महोत्सवात दिसले पाहीजे. शेतकऱ्यांच्या मालासाठी ममुंबईच्या मध्यभागी मोठे मार्केट बांधून त्या मार्केटचे उद्धाटन या महोत्सवात झाले पाहिजे. हुंडा देता येत नाही. म्हणून लग्न थांबलेल्या आपल्या लेकींचे सामुहिक विवाह या महोत्सवाच्या दर दिवशी थाटात झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांची फी सरकारने माफ केली या मुलांचा वर्षभराचा हॉस्टेलचा खर्च आणि जेवणाचा खर्च भरून त्यांच्या पावत्य साईचरणी अर्पण करून हा महोत्सव झाला पाहिजे. श्रमदान झाले पाहिजे. बी-बियाणे खतांंचे मोफत वाटत दर दिवशी झाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा सोहळा जाहितक दर्जाचा करायचा आहे ना? मग श्री साईंचा संदेश अशा समाजोपयोगी कामांनी पोहोचवा तर जगात वाह वा तर होईलच, पण श्री साईंनी सांगितलेला मार्ग जगभरात पोहोचेल. लेजर शो आणि म्यूझीअम ने जे घडू शकत नाही ते सामाजिक उपक्रमांनी घडेल.
हिंदूंच्या उत्सवांवर फक्त टिका करता असे काही जण म्हणतील, होय, आम्ही टिका केली. जे जे अनिष्ठ आणि अयोग्य असते त्यावर आवाज उठवायचा हे हिंदू धर्माने शिकविले आहेे, त्यातूनच हिंदू धर्म समृद्ध होत गेला. आणि होत जाईल. शेतकरी मदतीविणा मरतो आहे, आणि श्री साईंसमोर ७२ कोटींचा लेजर शो सुरू आहे हे होऊ नये. तीन हजार कोटी रू. अनेकांचे जीव वाचवूू शकतात. पण जीव न वाचवता ही रक्कम झगमगाटासाठी उधळलीत तर साई माफ करणार नाहीत............

No comments:

Post a Comment