Saturday, July 2, 2016

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचा धोका कायम

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचा धोका कायम

निर्बीजीकरणाचा खर्च पाहता लसीकरणाचा भार पालिकेसाठी खूप जास्त असेल.

प्राजक्ता कासले, मुंबई | July 2, 2016 3:09 AM
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/lepto-risk-due-to-nomadic-dog-1260347/#sthash.PzJ9ls7T.dpuf

गुरे, उंदीर यांचा बंदोबस्त करणाऱ्या पालिकेसमोर कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न
दरवर्षी मुंबईकरांना बाधणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील गुरे आणि उंदरांचा बंदोबस्त करण्याच्या योजना महापालिकेने आखल्या आहेत. मात्र गुरे आणि उंदरांप्रमाणेच भटकी कुत्रीदेखील लेप्टोच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु शहरातील लाखभर भटक्या कुत्र्यांना हटवायचे कसे किंवा त्यांचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत लेप्टोचा प्रादुर्भाव रोखणे अशक्य असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी आलेली लेप्टोची साथ व या वेळी जूनमध्येच आढळलेले सहा रुग्ण यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने लेप्टोविरोधात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लेप्टोस्पायरोसिस आजाराचे जिवाणू पसरू नयेत यासाठी महानगरपालिकेने या वेळी तबेल्यांवर कारवाई केली. ३२६ तबेल्यांपैकी १७१ तबेल्यांवर कारवाई करण्यात आली. शहरात उंदरांना मारणाऱ्या मूषकनियंत्रकांची कमतरता भरून काढण्यासाठी पालिकेकडून पुन्हा निविदा देण्यात येणार आहेत. मात्र लेप्टोचा तिसरा वाहक असलेल्या कुत्र्यांबाबत मात्र पालिकेकडून अद्याप कोणतेही धोरण ठरवण्यात आलेले नाही. २०१४च्या कुत्र्यांच्या प्रगणनेनुसार शहराच्या वस्त्यांमध्ये ६८,०८७ तर रस्त्यांवर २९,०८५ कुत्रे आढळले. मात्र ही अंदाजे संख्या आहे. यातील २५ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणेही बाकी होते. त्यामुळे आजमितीला साधारण एक लाख कुत्रे शहरात असण्याची शक्यता आहे. कुत्र्यांकडून अनेक आजार माणसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांचे  लसीकरण आवश्यक असते. पाळीव कुत्र्यांचे मालक नियमितपणे लसीकरण करून घेत असले तरी निर्बीजीकरणाचे कामच करताना मेटाकुटीला आलेल्या पालिकेने कुत्र्यांच्या लसीकरणाचा विषयच हाती घेतलेला नाही.
लेप्टोच्या जिवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने धडक कार्यवाही करत तबेल्यांवर कारवाई केली व गुरांचे लसीकरण करून घेण्यास लावले.
उंदीर मारण्यासाठीही निविदा काढल्या जाणार आहेत. कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून निर्बीजीकरण केले जात आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या. मात्र निर्बीजीकरणाचा खर्च पाहता लसीकरणाचा भार पालिकेसाठी खूप जास्त असेल.
श्वानप्रेमींनीही त्यासाठी पुढाकार घेतला तर परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
लेप्टोस्पायरोसिस
  • कुत्रे, उंदीर, गुरे हे लेप्टो जिवाणूंचे वाहक असतात. या जनावरांच्या शरीरात असलेले लेप्टोचे जिवाणू त्यांच्या मलमूत्रावाटे बाहेर पडतात. हे मलमूत्र मिसळलेले पाणी पायाच्या जखमेवाटे (खरचटले असले तरी) शरीरात गेले तर लेप्टोचा संसर्ग होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. योग्य उपचार मिळाले नाहीत तर मूत्रपिंड व यकृतावर परिणाम होऊन प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो.
  • या वर्षांत आतापर्यंत लेप्टोचे २६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सहा रुग्ण जूनमधील आहेत. गेल्या वर्षी जूनच्या मध्यावर पडलेल्या पावसामुळे आलेल्या लेप्टोच्या साथीत १२ जणांचा बळी गेला होता. यावर्षीही लेप्टोची साथ येण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्यातून चालणे टाळावे तसेच लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्यावेत, अशा सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/lepto-risk-due-to-nomadic-dog-1260347/#sthash.PzJ9ls7T.dpuf


No comments:

Post a Comment