Monday, July 20, 2009

News in LOKSATTA dt. 19th July, 2009



Following news appeared in LOKSATTA dt. 19th July, 2009 on the main page. We are getting support from media also.

घोडबंदर रोडवरील प्रदूषणाविरोधात अभिनव आंदोलन
महिला व मुलांचाही सहभाग
कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल होणार
ठाणे, १८ जुलै/प्रतिनिधी
घोडबंदर रोडवरील हजारो रहिवाशांना वायूप्रदूषणामुळे जगणे अवघड करणाऱ्या कंपन्यांविरोधात सर्वसामान्य जनताच आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास बसल्याने धास्तावलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अखेर या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले.

घोडबंदर रोडवरील रवी इंडस्ट्रीज, शांती टेक्स्टाईल व नरेंद्र सिल्क मिल या कंपन्यांमधून बाहेर पडणारा उग्र दर्पाचा वायू, तसेच काळ्याकुट्ट धुरामुळे माजिवडा, ढोकाळी, तत्त्वज्ञान विद्यापीठ, कोलशेत रोड, पोखरण-२ येथील असंख्य नागरिकांना श्वसनाचे, तसेच त्वचाविकार होत आहेत. विशेषत: लहान मुलांना या प्रदूषणाचा त्रास जास्त होत होता. याविरोधात सत्यजित शहा, दीपाली पाटील, मैथिली चेंदवणकर, सत्यजित आहेर, सुहास पोतनीस, सुनील बारहाते आदी जागरुक रहिवाशांनी लढा सुरू केला होता. ‘लोकसत्ता’ने हा विषय सतत लावून धरलेल्या या प्रकरणात आमदार केळकर यांनीही या कंपन्यांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न चालविले होते. नरेंद्र सिल्क मिल या कंपनीला सूचना, नोटिसा देऊनही या कंपनीने प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसविण्यास टाळाटाळ केल्याने अखेर ती बंद झाली.
उर्वरित दोन कंपन्यांमुळे प्रदूषणाचा त्रास वाढत गेल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत होती, पण राष्ट्रवादीच्या एका वजनदार मंत्र्याच्या दबावामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शांत बसून होते. अखेर शनिवारी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी एकत्र आले व येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे धरले. ‘शुद्ध स्वच्छ मोकळी हवा, मिळणार आम्हाला केव्हा? ’, घोडबंदर रोड भोपाळ होण्यापासून वाचवा’, ‘प्रदूषणाचा लागला फास, केव्हा मिळणार मोकळा श्वास’ असे फलक घेऊन मुले व महिलाही या अभिनव आंदोलनात सहभागी झाले होते. रहिवाशांनी घोषणाबाजी केली. नंतर मंडळाचे अधिकारी पोहेकर हे आले व त्यांनी उपरोक्त दोन कारखान्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले, तसेच याप्रकरणी मंडळाच्या सायन येथील कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले. या बैठकीस मंडळाचे सचिव, तसेच दोन्ही कारखान्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंदीच्या काळात कारखाने बंद होऊन तेथील कामगार देशोधडीला लागू नयेत, अशीच आमची इच्छा आहे. या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती उपकरणे बसवावीत, हाच आमचा आग्रह असल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment