प्रदूषणाविरोधातील लढाईसाठी आमदार केळकर सरसावले
शनिवारी घोडबंदरवासीयांचे धरणे आंदोलन
ठाणे/प्रतिनिधी
राज्याचे पर्यावरण सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या गणेश नाईक यांचे त्यांच्याच जिल्ह्यातील प्रदूषणाकडे लक्ष नसून, विषारी धूर ओकणाऱ्या कारखान्यांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य
धोक्यात आले आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर परिसरातील रहिवाशांतर्फे प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर येत्या १८ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘ठाणे वृत्तान्त’ ने या संबंधी वेळोवेळी आवाज उठविला होता. आमदार केळकर यांनीही या प्रश्नात काही महिन्यांपासून लक्ष घालण्यास सुरुवात केली असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणारी नरेंद्र सिल्क मिल ही कंपनी बंद करण्यात आली. घोडबंदर परिसरात सध्या मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहात आहेत. मात्र या भागातील काही कारखान्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असून, त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रवी स्टील, शांती टेक्सटाइल या कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. कंपन्या ओकणाऱ्या धुरामुळे कापूरबावडी, कोलशेत तसेच घोडबंदर भागातील विविध गृहसंकुलात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही हे कारखाने प्रदूषण करीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र केवळ सरकारच्या दबावामुळे आणि पर्यावरणमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे या कंपन्या रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला.
ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागात प्रदूषणात वाढ होत असूनही पर्यावरणमंत्री आणि त्यांचा प्रदूषण नियंत्रण विभाग काहीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळे १८ जुलै रोजी प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यात घोडबंदर परिसरातील रहिवासी सहभागी होणार आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment