शापित घोडबंदर वासीयांना उ:शाप कधी?
अजून नाही सरल्या आशा..
राजीव कुळकर्णी
ठाणे रेल्वे स्थानकापासून फक्त पाच किमी अंतर.. निसर्गरम्य वातावरण.. प्रशस्त रस्ते.. हाकेच्या अंतरावर शाळा, बँका अन् रुग्णालय.. लॅण्डस्केप गार्डन आणि स्विमिंग पूल.. अशी वैशिष्टय़े
असणाऱ्या जाहिरातींना भुलून घोडबंदर रोड, कोलशेत रोड, ढोकाळी, माजिवडा येथे हजारो रहिवाशांनी फ्लॅट्स घेतले खरे! पण दहा वर्षांपूर्वी येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आजही तशाच आहेत. किंबहुना त्यात भरच पडत आहे. जगण्यासाठी फक्त स्वच्छ हवा द्या, ही साधी मागणीही महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पूर्ण करू शकलेले नाहीत!
टी. चंद्रशेखर हे पालिका आयुक्त असताना घोडबंदर रोडच्या दुतर्फा आलिशान व टोलेजंग गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. शहराच्या तुलनेत येथील फ्लॅटचे दर खूपच कमी असल्याने काही वर्षांतच येथील वनराई नष्ट होऊन सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभे राहिले. या भागात बऱ्याच कंपन्याही होत्या. जागांना सोन्याचा भाव येऊ लागल्याने मग अनेक कंपन्या हळूहळू बंद झाल्या. नशीबवान असलेल्या काही कामगारांना आपली कायदेशीर देणी मिळाली, पण हजारो जण देशोधडीला लागले.
जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या रेटय़ात अजूनही कारखाने तग धरून आहेत. कारखाने चालू राहावेत, लोकांचा रोजगारही कायम राहावा, हीच या भागातील रहिवाशांची इच्छा असली, तरी आपल्या कारखान्यातील रासायनिक पदार्थ, तसेच बाहेर पडणारा उग्र दर्पाचा वायू यासाठी प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा बसविण्याची तसदी कंपनी मालक घेत नाहीत. हीच या भागातील रहिवाशांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कारखान्यातून बाहेर फेकला जाणारा काळाकुट्ट धूर, कोळशाचे सूक्ष्म कण, डोके भणाणून टाकणारा रसायनांचा वास यामुळे येथील नागरिकांना श्वसन तसेच त्वचाविकाराचा त्रास सुरूआहे. महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने यादृष्टीने पावले उचलावीत, यासाठी रहिवाशांनी अनेकदा निवेदने दिली. आयुक्त नंदकुमार जंत्रे, महापौर स्मिता इंदुलकर, मनीषा प्रधान आदींच्या भेटी घेतल्या, पण थातूरमातूर उपाययोजनांपलीकडे काहीच प्रगती झाली नाही.
हाईड पार्क सोसायटीतील सत्यजित शहा हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या संकटातून घोडबंदरवासीयांना मुक्त करावे म्हणून संघर्षरत आहेत. त्यांच्या सोसायटीतील अनेकांनी त्यांना पाठिंबा व सहकार्य दिल्याने एका कंपनीवर कारवाई झाली. थोडेसे यश मिळाल्याने शंकर तलवार (श्रुती पार्क), सत्यजित आहेर (रुणवाल रिजन्सी), सुहास पोतनीस (ऑर्किड), मैथिली चेंदवणकर (ओसवाल पार्क), दीपाली पाटील (ऊर्वी पार्क), सुनील बारहाते (परमेश्वरी पॅरेडाईज) यासारखे काही जागरुक नागरिक त्यांच्यासमवेत या लढय़ात आता उतरले आहेत. स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. प्रताप सरनाईकांपासून सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळेंपासून इंदिसे यांच्यापर्यंत अनेकांना ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीची कोंडी, टीएमटीचा अनागोंदी कारभार, दररोज होणारे अपघात, पाणी टंचाई या प्रश्नांबरोबरच वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडेही या नेत्यांना लक्ष द्यावे लागेल. कापूरबावडी उड्डाणपुलाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली असली, तरी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडेच पर्यावरण खाते आहे, हेही या नेत्यांनी ध्यानात घेतल्यास बरे होईल. कारण प्रदूषण पसरविणाऱ्या या कारखान्यांबद्दल धोरण स्पष्ट करा व मगच मते मागायला या, अशी ठाम भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.
प्रदूषणाविरोधातील या लढय़ात सहभागी होण्यासाठी संपर्क- ९८२११ ५०८५८.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment