ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्वानदंश
सकाळ वृत्तसेवा
03.44 AM
उल्हासनगरमध्ये कुत्र्याने सात मुलांना चावा घेतल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत; मात्र पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच पालिकेकडे याची नोंद होते. या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे; पण प्रत्यक्षात हा आकडा 60 आहे, असा दावा या विषयावर पाठपुरावा करणारे दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे. गेल्या महिन्यात कुत्र्याने याच कुटुंबातील आर्यन (वय 10) याच्या पाठीचा चावा घेतला. तेव्हापासून आर्यनच्या मनात कुत्र्यांची भीती कायम आहे, असे शहा यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले वाढले आहेत. श्वानदंशाच्या घटनांपैकी 80 टक्के घटनांमध्ये तीन ते आठ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले.
एक लाख
भटकी कुत्री
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखापर्यंत असावी, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. कारण महापालिकेच्या दाव्यानुसार अद्याप शहरात 40 हजार भटकी कुत्री आहेत; मात्र त्याच वेळी दीड वर्षापासून कुत्र्यांचे सर्वेक्षण झालेले नसल्याने भटक्या कुत्र्यांची निश्चित संख्या सांगणे पालिका प्रशासनाला शक्य झालेले नाही.
No comments:
Post a Comment