Tuesday, December 29, 2015

" पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड " - BECOME AN ALERT CITIZEN

" पोलिसालाही  भरावा  लागला  नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "  

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

मंगळवार , २९.१२.२०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे जिल्ह्यातील  वर्तमान पत्रातील पृष्ठ क्रमांक १ व ४ वर आलेली " पोलिसालाही  भरावा  लागला  नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "  बातमी येथे माहितीसाठी देत आहे.

या बातमीसंदर्भात एक छोटेसे विश्लेषण हि पुढे देत आहे.

केल्याने होत आहे रे पण " नागरिकाने " आधी " जागरूक नागरिक " बनलेची  पाहिजे

" आपल्या देशात काहीच सुधारणा होणार नाही " ,  " हे सगळ असच चालत राहणार " , " मी एकटा कसा  काय समाजात बदल घडवू शकतो ? "  हि व अशी अनेक  समानार्थी वाक्ये अथवा अश्या " प्रतिक्रिया " अनेकदा म्हणजे नेहमीच आपल्याला ऐकू येतात . याचे एक कारण देखील आहे आणि ते म्हणजे बहुसंख्य भारतीय नागरिकांना फक्त " प्रतिक्रिया " देण्याची हौस असते. पण स्वतः क्रिया कधीच करायची नसते.

मी माझ्या एका कवितेत म्हटले आहे

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ,
      घरात बसून प्रतिक्रिया देणे निरर्थक आहे.

माझा अनुभव मात्र वेगळाच आहे . खालील दोन घटना आपल्यासमोर देत आहे. याचे सगळे पुरावे  ( छायाचित्रे , दंड केल्याची पावती , पत्र ) या स्वरुपात माझ्याकडे आहेत.

घटना क्रमांक १ ) : २४.११.२०१५ रोजी मी कार्यालयात जात असताना एक दुचाकीस्वार ज्याच्या वाहन क्रमांक पट्टीवर " पोलिस " असे लिहिले होते ( जो गुन्हा आहे ) , शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले , वाहन क्रमांक छोट्या अक्षरात व मोठ्या आकड्यात लिहिला होता . तो सिग्नलला थांबला होता तेंव्हा त्याला याबद्दल मी शांतपणे सांगितले, पण त्याने दुर्लक्ष केले . पुढचा धक्का म्हणजे तो समोरील सिग्नल हिरवा होण्यास १८ सेकंद बाकी असताना सिग्नल मोडून वेगात निघून गेला . तेंव्हा माझी सटकली. त्याचे छायाचित्र अगोदरच काढले होते.

रात्री घरी आल्यावर हे सगळ DCP TRAFFIC , THANE , व इतर पोलिस अधिकार्यांना ई मेल ने कळविले.

छायाचित्र टिपायला ३० सेकंद लागले. ई मेल पाठविण्यास ५ ते ८ मिनिटे लागली . त्यानंतर मी कधीच या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही.

पण याचा परिणाम पहा. मला २४.१२.२०१५ ला नौपाडा वाहतूक शाखेतून दूरध्वनी आला कि माझी तक्रारीवरून त्या दुचाकीच्या मालकाचा पत्ता शोधून वाहतूक पोलिसांनी त्याला बोलावले . ती दुचाकी दुसराच कोणीतरी चालवीत होता , त्याला देखील बोलावले व त्या गृहस्थाला वर लिहिलेल्या ४ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी  रुपये १०० म्हणजे एकूण रुपये ४०० दंड भरावा लागला. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर व त्या गृहास्थाला झालेल्या दंडाची पावती जोडली आहे ) 

घटना क्रमांक २  ) : शुक्रवार , ९ ओक्टोंबर , २०१५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५.५५ वाजता मी कार्यालयातून घरी निघालो होतो. . स्थळ ऐरोली कडून पटनी  कॉम्पुटर कडे जाणारा रस्ता .
समोर एक  दुचाकी चालविणारी व्यक्ती हि पोलिस असूनही त्या व्यक्तीने एकाच वेळी खालील  ३ नियम मोडले होते .
१. ) दुचाकी चालविताना शिरस्त्राण ( HELMET )  नव्हते घातले .
२. ) दुचाकी चालविताना भ्रमणध्वनी यंत्रावर ( MOBILE PHONE वर ) संभाषण करीत आहे
३. ) दुचाकीच्या मागे पोलिस असे एक वर्तुळाकार STICKER लावले आहे.

ताबडतोब ते छायाचित्र टिपले. त्याच दिवशी रात्री DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांना व इतर काही व्यक्तींना एक ई मेल व ते छायाचित्र पाठविले. हे सगळ करण्यासाठी फक्त ५ ते ७ मिनिटे एवढाच वेळ लागला . त्यानंतर मी त्याचा कधीच पाठपुरावा केला नाही.

मला बुधवार , ४ नोव्हेंबर , २०१५ ला दुपारी १२.१७ वाजता DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांच्या कडून मला एक ई मेल आला त्यात त्यांनी माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही केली हे कळविले. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर  जोडले  आहे ) 

आता मला सांगा की

१. ) पोलिसांना , राजकारण्यांना , मंत्र्यांना , राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना  वाहतुकीचे नियम माफ आहेत ?
२. ) केल्याने होत आहे कि नाही
३. ) हे सगळ करायला असा कितीसा वेळ आपल्याला लागतो ?

गेली अंदाजे ३.५ ( साडे तीन  ) वर्षे मी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घातले पाहिजे यासाठी विविध  पातळ्यांवर लढत आहे. त्या लढ्याला यश येताना दिसत आहे . मी काही वाहतूक चौक्यांमध्ये तेथील वरिष्ठ अधिकार्यांना भेटलो . त्यांनी मला पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल केलेल्या कारवाई बद्दल सांगितले कि  दर महिन्याला अंदाजे ५० ते १०० पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल दंडात्मक  कार्यवाही केली जाते. आपण याची शहनिशा करण्यासाठी DCP TRAFFIC , THANE यांच्याशी सम्पर्क साधू शकता.

आपणाला हे लक्ष्यात आले आहे कि नाही ते माहित नाही , पण गेले काही महिने दूरचित्रवाणी  ( T.V. ) वरील  नवीन मालिकांमध्ये जेंव्हा दुचाकीवरील एखादा प्रसंग असतो तेंव्हा त्या पुरुष , महिला कलाकारांनी शिरस्त्राण घातलेले असते .

हे तर मी नेहमीच सांगतो कि फक्त एकट्याच्या प्रयत्नांनी १०० % यश येण्यासाठी जास्त वेळ लागेल . पण जर " नागरिक " हि व्यकी " जागरूक नागरिक झाली व सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी हा प्रश्न घेतला तर तो दिवस दूर नाही जेव्हा " भारत " या देशातील  प्रत्येक पोलिस दुचाकीवर शिरस्त्राण घातलेला दिसेल. प्रत्येक राजकारणी , मंत्री, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , शासकीय कर्मचारी व नागरिक वाहतुकीचे व इतर सगळे नियम पाळताना दिसतील.

या पुढील लढाई आसन पट्टा ( SEAT BELT ) न लावणे , गाडीला काळ्या काचा असणे, विचित्र  पद्धतीने वाहन क्रमांक लिहिणे , वाहन क्रमांक पट्टीवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे , गाडीचा दिवा प्रखर पांढरा  ठेवणे ,  देवनागरी मध्ये वाहन क्रमांक लिहिणे , चित्र विचित्र असे भोंगे ( HORN ) बसविणे , सिग्नल न पाळणे , वाहन उलट दिशेला नेणे व इतर अश्या अनेक नियम मोडणाऱ्या च्या विरुद्ध चालू करायची आहे ( माझ्या कडून हि लढाई चालू सुद्धा  झाली आहे ) .

आपल्याला हे पटतंय ना ? " भारत " या देशात स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो.

चला मग कोणाची वाट  पाह्ताहात ?  आपण सगळे मिळून हि लढाई लढवूया ना ?

वारंवार स्वतःचे PROFILE PICTURE फेसबुक वर बदलणे , वारंवार खाद्य  पदार्थांची छायाचित्रे फेसबुक वर टाकणे , या पेक्षाही कमी वेळ " जागरूक नागरिक " बनण्यासाठी लागतो.

आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
ठाणे, महाराष्ट्र
एक अति सामान्य , पण जागरूक नागरिक.




No comments:

Post a Comment