Monday, June 1, 2015

जरा या आपल्या पोलिसांना मुलभूत सुविधा देता का हो ?

जरा या आपल्या पोलिसांना मुलभूत सुविधा देता का हो ?
२२ मे , २०१५ च्या भर दुपारी मी नाशिक येथून स्वतःच्या वाहनाने ठाणे येथे घरी येण्यासाठी निघालो होतो. इगतपुरी नंतर घाट लागला घाटात कोठेही नैसर्गिक विधी ( लघवी ) करण्यासाठी थांबणे योग्य न्हवते म्हणून तसाच पुढे आलो. कसारा गेल्यावर एकेठीकाणी रस्त्यावर पोलिस नेहमीच अडथळा उभारलेला असतो त्याच ठिकाणी एक पोलिस चौकी दिसली . गाडी थांबवली व चौकी मध्ये शिरलो व तेथील हजार असलेल्या पोलिसाला विचारले की स्वच्छतागृह कोठे आहे ? मला लघवीला जायचे आहे. त्या पोलिसाचे उत्तर ऐकून तर मला एक फार मोठा धक्का बसला . त्या चौकी मध्ये ना स्वच्छतागृह होते , ना एखादा नळ होता. मो त्या पोलिसाला विचारले की तुम्ही काय करता ? त्याचे उत्तर होते की सगळ्या प्रकारच्या नैसर्गिक विधींसाठी त्यांना बाहेर उघड्यावर ( निसर्गात ) जावे लागते . म्हणजे या पोलिसांना सगळ्या नैसर्गिक विधींसाठी खरोखरच निसर्गात जावे लागते. पुढे त्याने सांगितले की दिवसा एवढी अडचण येत नाही पण रात्री किंवा पावसाळ्यात त्यांना अतिशय त्रास होतो. रात्री प्राण्याची भीती असते.
मी ती चौकी (चिंतामणवाडी पोलिस चौकी, कसारा ) निरखून पाहत होतो तर माझ्या असे लक्षात आले की त्या चौकीला ना विटांच्या भिंती होत्या ना विटांचे छत होते. सगळी चौकी पत्र्यांनी बनविलेली होती. याचा अर्थ उन्हाळ्यात अति गरम व हिवाळ्यात अति थंड . मला तेथे जेवढा वेळ होतो तेवढ्या वेळात हि गर्मी मुळे असह्य होत होते.
तेथे नळ नव्हता म्हणजे पिण्याचे पाणी नाही. म्हणजेच सगळ्यासाठी पाणी बाहेरूनच आणावे लागते . त्या चौकी मध्ये दूरध्वनी ( LANDLINE ) नव्हती . मला असे कळाले की मोबाईल चे बिल हि पोलिसांना स्वतःलाच भाराव लागते. तेथे वीज होती पण माझ्या मते ती वीज हि दुसऱ्या कोठून तरी घेतली होती. त्या पोलिसाला सलाम करून तेथून पुढे निघालो .
वाटेत उजव्या हाताला एक पोलिस चौकी ( शिरोळ पोलिस चौकी , कसारा ) . गाडी थांबवून तेथे गेलो तर तेथेही अगोदर पाहिले तेच चित्र दिसले . तेथून काही अंतरावर इगतपुरी ला जाणाऱ्या वाटेवर , पण घाट लागण्या आधी एक लतीफ वाडी पोलिस चौकी ( घोटी पोलिसांच्या अंतर्गत ) आहे तेथेही हीच अवस्था आहे असे कळले .
तेथून मी ठाणे येथे पोहोचून साकेत वाटे ऐरोली ला जाताना राबोडी वाहतूक पोलिस चौकी दिसली ती चौकी तर CONTAINER मध्ये आहे. त्या चौकी मध्येही स्वच्छतागृह नाही , नळ नाही , अश्याच प्रकारे CONTAINER मध्ये ठाणे SATIS वाहतूक पोलिस चौकी व वर्तक नगर वाहतूक पोलिस चौकी आहे असे कळले . त्याच प्रमाणे तीन हाथ नाका येथे उड्डाण पुलाखाली एका छोट्याश्या prefabricated चौकोनी अशी एक छोटीसी पोलिस चौकी आहे . बहुतेक त्याला नौपाडा वाहतूक पोलिस चौकी असे नाव आहे.
जसे प्रत्येक नागरिकाला अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे माझ्या मते आपल्या या पोलिसांना पिण्याचे पाणी , प्रसाधन गृह , LANDLINE , या मुलभूत सुविधा तरी मिळाल्याच पाहिजे .
अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील अनेक पोलिस त्यांचे काम करीत असतात याचे खरोखरच कौतुक वाटते . अश्या या सगळ्या पोलिसांना माझा मानाचा सलाम.
माझी सगळ्या वाचकांना अशी विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून अश्या पोलिस चौकी मध्ये जावून कधी तरी या पोलिसांना एखादी तरी पिण्याच्या पाण्याची बाटली द्या. हे मी फक्त " लोकासांगे ब्रम्हद्यान .......... " नाही करत तर स्वतः वेळात वेळ काढून वाटेतल्या पोलिसांना थांबून पाण्याची बाटली देत असतो . 


No comments:

Post a Comment