Monday, June 29, 2015

नवीन उड्डाण पुलावरील खड्ड्यांची उड्डाणे .

 नवीन उड्डाण पुलावरील खड्ड्यांची  उड्डाणे .

" नवा काळ " या दैनिकाने आज ( सोमवार )  , २९ जून, २०१५ ला दिलेली हि बातमी वाचा त्याचप्रमाणे रविवार, ३ ऑगस्ट, २०१४ ला " नवा काळ " ने छापलेली बातमी वाचा.
तसेच   मी काही छायाचित्रे जोडत आहेत. हि सगळी छायाचित्रे मी  २८ जून, २०१५  रोजी सकाळीच काढली आहेत. या छायाचित्रांद्वारे  आपणाला या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे निदर्शनास आणून द्यायचे आहेत.
हे सगळे  ठाणे घोडबंदर मार्ग येथील कापुरबावडी येधील उड्डाणपुलाच्या नाशिक येथे जाणाऱ्या मार्गीकेवरील खड्डे आहेत.
२४ जुलै, २०१४ रोजी , घाई घाईत या अगोदरच्या राज्यशासनाने या उड्डाणपुलावरील हि नाशिक येथे  जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी चालू केली होती. त्यानंतरच्या पावसात म्हणजे २ / ४ दिवसातच त्या मार्गिकेवर  बरेच खड्डे पडले होते. व ते खड्डे दिवसागणिक मोठ्ठे होत होते.
त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या व इतर अनेक शासकीय अधिकार्यांना त्या खड्ड्यांबद्दल मी अनेक वेळा ई मेल द्वारे कळविले होते .  त्यावेळी भर पावसातच जुजबी  , तकलादू काम करून नव्या कोऱ्या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुझविले गेले होते.

सरकार बदलले , जून, २०१५ चा पाउस सुरु झाला आणि, मागच्याच वर्षी घाईत वाहतुकीसाठी सुरु केलेल्या या नाशिक येथे जाणाऱ्या कापुरबावडी येथील उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत. यातील एक खड्डा तर अंदाजे २ मीटर लांब , १ / २ मीटर रुंद व अंदाजे ६ ते ८ इंच खोल आहे.

या छायाचित्रावरून आपल्याला असे कळेल कि हे खड्डे काही विशिष्ट प्रकारच्या विटा भरून बुजविले आहेत. पण तरीही काही ठिकाणी त्या विटा बाहेर पडून खड्डा जसाच्या तसा आहे.

सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन उड्डाणपुलावर असे खड्डे पडतातच कसे ? याचा अर्थ या उड्डाण पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.  यात भरीस भर म्हणजे या संपूर्ण उड्डाण पुलावर काही ठिकाणी धोकादायक अशी वळणे व अपघात होवू शकतील अशी काही ठिकाणे आहेत.

मुख्यमंत्री साहेब शासन या खड्ड्यांमुळे एखादा मोठ्ठा अपघात झाल्यावरच हालचाल करणार आहेत का ?

या उड्डाणपुलावरील मी पाहिलेल्या खालील काही गोष्टींबद्दल मी आपले लक्ष्य वेधू इच्छितो.

१. ) विजेच्या खांबां खालील पोकळी / जागा गेले वर्ष भर उघडीच आहे.
२. ) २५ अथवा २६ वा खांब गेले वर्षभर गायबच आहे.
३. ) खड्ड्यात टाकलेल्या काही विटा रस्त्यावर विखुरलेल्या आहेत , त्याने अपघात होऊ शकतो.
४. ) विजेच्या खांबावरील WIRES , अनेक ठिकाणी लोंबकळत  आहेत.
५. ) धोकादायक वळणावर वाळूसदृष्य खडी पडलेली आहे. त्यामुळे वाहने घसरू शकतात.

या अगोदर   ही मी मुख्यमंत्र्यांना या उड्डाण पुलावरील काही धोकादायक गोष्टींबद्दल कळविले होते.  या उड्डाण पुलावरून आतापर्यंत काही अपघात झाले आहेत.

मी २८ जून, २०१५ ला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना ई मेल द्वारे हे सगळ , छायाचित्रांसकट कळविले आहे.

आपणही हा अपघाताला आमंत्रण देणारा उड्डाण पूल वापरताना अतिशय काळजी घ्या . जर काही दुर्घटना झाली तर शासन काहीच मदत करणार नाही.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet













Monday, June 22, 2015

BREAKING NEWS नाही तर अमानवी अशी SHOCKING NEWS

मंगळवार, २३ जून, २०१५

BREAKING NEWS नाही तर अमानवी अशी SHOCKING NEWS
नमस्कार,
जेंव्हा , जेंव्हा नवीन मंत्री शपथ घेतो , नवीन महापौर निवडले जातात , कोणताही नवीन शासकीय अधिकारी पदभार सांभाळतो तेंव्हा आपणा सर्वांना माहित आहे कि यातील बहुतेक व्यक्ती त्यांच्या कार्यालयातील, दालनातील व शासकीय निवासातील अनेक गोष्टी बदलतात , नव्या घेतात , नवी वाहने घेतात , काही छोटे , मोठे बदल करून घेतात . यावर प्रत्येक वेळी हजारो पासून लाखो रुपये खर्च होतात .
शासकीय योजना राबविण्यासाठी तरतूद नसल्याची कारणे दिली जातात , पण अश्या खर्चांना तातडीने मान्यता मिळते व युद्धपातळीवर अशी कामे पूर्ण होतात .
यावरून काय दिसते कि या सगळ्या शासकीय व्यक्तीना , त्यांचे कार्यालय त्यांच्या मनाप्रमाणे हवे असते .
आपण जे छायाचित्र पाहिले ते आहे " महामार्ग पोलिस चोव्की , लतीफ वाडी , कसारा “ . मुंबई , ठाणे येथून नाशिक येथे रस्ते मार्गाने जाताना , कसारा घाट सुरु होण्याअगोदर डाव्या हाताला , हमरस्त्यापासून अंदाजे २० / ३० मिटर आतमध्ये आहे.
या पोलिस चौकी ला विटांच्या भिंती नाहीत , पक्क छपर नाही , मुख्य दरवाजा नाही. आत मध्ये नळ नाही , पिण्याच्या पाण्याची सोय नाही , लघवी करण्यासाठी सोय नाही , शौचालय नाही , पोलिसांचे कपडे ठेवण्याची सोय नाही. त्यांचे सामान ठेवण्यासाठी कपाट नाही.
शासन हागणदारी मुक्त गाव हि स्पृहणीय योजना राबविते , पण येथे शासनाच्या अखत्यारीत असलेल्या पोलिस दलातील कर्मचार्यांसाठी मात्र हि मुलभूत सोय देखील नाही. दुखिः अंतकरणाने सांगाव लागत कि तेथील कर्मचाऱ्यांना चौकीच्या मागे रानात कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक विधींसाठी जावे लागते. रात्री, त्याचबरोबर पावसाळ्यात फारंच बिकट परिस्थिती असते. या चौकीतील कर्मचाऱ्यांना घाटाची जबाबदारी असल्याने बिचारे सदा धावपळीत असतात.
बर हि अशी एकच चौकी नाही तर या प्रकारच्या , अगदी मुलभूत सुविधा नसलेल्या अजून दोन चौक्या १. ) चिंतामणवाडी पोलिस चौकी, कसारा २. ) शिरोळ पोलिस चौकी , कसारा , या चौकीच्या जवळपास आहेत.
सांगायला लाज वाटते कि , ठाणे नावाच्या एका महाराष्ट्रातील वेगाने वाढत जाणाऱ्या शहरामध्ये ३ वाहतूक पोलिस चौक्या या CONTAINER मध्ये आहेत. तेथे हि नळ नाही , पिण्याच्या पाण्याची सोय नाही , लघवी करण्यासाठी सोय नाही , शौचालय नाही.
त्या पोलिस चौकी ची पुढून , मागून व बाजूने घेतलेली छायाचित्रे हि येथे आपल्या माहितीसाठी जोडत आहे. यावरून या वास्तूची दशा आपणाला कळू शकते.
हि काही BREAKING NEWS नाही तर अमानवी अशी SHOCKING NEWS आहे.
आपणाला हे खोटे वाटत असेल तर कृपया आपण नाशिक येथे जाताना व तेथून परत येताना थोडासा वेळ काढून खातर जमा करून घ्यावी हि विनंती.
माझा या अश्या पोलिस बांधवांना मानाचा सलाम.
आपण म्हणाल कि अश्या गोष्टी अनेक ठिकाणी पहायला मिळतात . त्यात एवढ आश्चर्य असे काय ? आपले आपल्या दृष्टीने बरोबर असेल, पण मी "नवा काळ " या दैनिकाने सुरु केलेल्या पोलिसांचे सबलीकर या उपक्रमाचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे . त्या मुळे हे सगळ्यांसमोर आणण्याचा एक प्रयत्न आहे. " नवा काळ " ROTORY CLUB , LOINS CLUB , व अशा काही संस्थांना विनंती करून या सगळ्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपल्याला सुद्धा जर अश्या काही गोष्टी दिसल्या तर , आपण त्याची छायाचित्र काढून महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यांना पाठवा , प्रसार माध्यमांना पाठवा , वृत्त वाहिन्यांना पाठवा . यामुळे असे प्रश्न सगळ्यांसमोर आणण्यास मदत होते.
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet






Breaking News ? No A Shocking , True, Real Fact.

सोमवार, २२ जून, २०१५ 
नमस्कार ,
कृपया हे छायाचित्र निरखून पहा .
जर तुम्ही हे छायाचित्र कशाचे आहे हे ओळखू शकलात तर ८१०८११६४३३ या क्रमांकावर SMS करून उत्तर व आपले नाव कळवा. पहिल्या २ योग्य उत्तरांना " नवा काळ " तर्फे Rs ५००=०० पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
कृपया हे एक वेळ घालविण्याचे साधन समजू नका, अथवा मी "नवा काळ" ची जाहिरात करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नका .
हे काय आहे, याची सत्य परिश्तिती जाणून घेण्यासाठी २३ जून , २०१५ चा "नवा काळ" वाचा, अथवा उद्या मी जे फेसबुक वर लिहिणार आहे ते वाचा.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Sunday, June 14, 2015

कोपरी रेल्वे पुलाचे प्लास्टर कोसळू लागले . ठाणेकर जागे व्हा .

कोपरी रेल्वे पुलाचे प्लास्टर कोसळू लागले . ठाणेकर जागे व्हा . 

ठाणेकर नागरिकांनो . कोपरी पुलाचे हाल , कोपरी पुलाच्या रुंदीकरणाची सत्य स्थिती कृपया वाचा. आमदार संजय केळकर साहेब गेले २ वर्षे या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. आम्ही ठाणेकर आमदार श्री. संजय केळकर साहेब यांच्या या प्रयत्नानबद्दल आभारी आहोत.
" ठाणे वैभव " या दैनिकाने १३ जुने, २०१५ च्या अंकात , पहिल्या पानावर हि बातमी छापून वाचकांपर्यंत ठाणेकरांशी निगडीत असलेला हा प्रश्न नेल्याबद्दल , मी " ठाणे वैभव " चे मनापासून आभार मानतो. आपल्याला हे वेगळ सांगण्याची आवशक्यता वाटत नाही कि हा कोपरी पूल ठाणे आणि मुंबई यांना रस्ते मार्गाने जोडणारा दुवा आहे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Tuesday, June 2, 2015

उच्च रक्त दाब च्या रुग्णांसाठी " अच्छे दिन " आले नाहीत

उच्च रक्त दाब च्या रुग्णांसाठी " अच्छे दिन " आले नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान " अच्छे दिन आयेंगे " या घोषणेमुळे भारतीय नागरीकांसारखा मी एक अति सामान्य भारतीय नागरिकही सुखावलो होतो.
निवडणुका झाल्या , आणि माझी रोजची सकाळ " अच्छे दिन " येतील या आशेवर सुरु होत होती व संपत होती. त्यातच मला डिसेंबर , २०१४ ला एक धक्का बसला . जरा सविस्तर पणे सांगतो.
मी स्वतः एक उच्च रक्त दाब या आजाराचा रोगी आहे. मला ALPHADOPA २५० नावाचे औषध दिवसातून ३ वेळा १ - १ गोळी अशी घ्यावी लागते. अंदाजे डिसेंबर , २०१४ पासून मला हे औषध कोणत्याच औषधाच्या दुकानात मिळेनासे झाले. मी अगदी नाशिक, वडोदरा येथे व्यवसाया निमित्त गेलो असताना तेथे देखील मिळाले नाही. सरतेशेवटी मी २५ जानेवारी , २०१५ ला बनविणाऱ्या Medibios Laboratories Pvt. Ltd. या कंपनीला ई-मेल टाकला . त्याचे उत्तर नाही आले म्हणून २९ , जानेवारी , २०१५ ला दुसरा ई-मेल टाकला. त्याचे हि उत्तर नाही आले म्हणून मग त्यांच्या कार्यालयात दूरध्वनी केला तेव्हा मला एक धक्का दायक माहिती मिळाली . ती म्हणजे या औषधामध्ये म्हणे त्यांना कमी नफा मिळतो म्हणून त्यांनी हे औषध बंद केले . जेव्हा मी त्यांना विचारले कि मग आमच्या सारख्या रुग्णांनी काय करायचे ? तर त्यांनी सांगितलं कि ALPHADOPA ५०० हि अर्धी गोळी दिवसातून तीनदा घ्यायची. जेव्हा मी औषधाच्या दुकानात गेलो तेव्हा परत मला एक मोठा धक्का बसला. ALPHADOPA ५०० या औषधाच्या १० गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १६० रुपये . म्हणजे एका गोळीची किंमत १६ रुपये , आणि अर्ध्या गोळीची किंमत ८ रुपये . पण ALPHADOPA २५० च्या १० गोळ्यांच्या पाकिटाची किंमत होती २४=८० पैसे . म्हणजे एका गोळीची किंमत होती २=४८ रुपये. याचा सरळ सरळ अर्थ होतो कि या अगोदर मला दिवसाला ७=४४ रुपयाच्या गोळ्या लागायच्या पण आता हाच खर्च दिवसाला २४ रुपये , म्हणजे २२२ टक्क्यांनी माझा या औषधाचा खर्च वाढला. पुरावा म्हणून दोन्ही औषधांच्या पाकिटाचे छायाचित्र जोडले आहे.
भारतात उच्च रक्तदाब हा आजार अनेकांना होतो . या आजारात जर औषध वेळेवर नाही घेतलं तर त्याचे तब्येतीवर अतिशय वाईट परिणाम होतात. या आजारात औषध हि एक गरज होवून बसली आहे. भारतात असे किती नागरिक २२२ टक्क्यांनी वाढलेला खर्च सहजच करू शकतात ? माझ्या साठी तर " अच्छे दिन " न येता " मेहेंगे दिन " आले आहेत .
माझी शासनाला कळकळीची विनंती आहे कि शेवटी माझ्या सारखे अनेक मतदार नागरिक नाही जगले तर तुम्हाला मते तरी कोण देणार ?
" ठाणे वैभव " च्या ३ जुने, २०१५ च्या अंकात देखील हि बातमी आली आहे.



Monday, June 1, 2015

जरा या आपल्या पोलिसांना मुलभूत सुविधा देता का हो ?

जरा या आपल्या पोलिसांना मुलभूत सुविधा देता का हो ?
२२ मे , २०१५ च्या भर दुपारी मी नाशिक येथून स्वतःच्या वाहनाने ठाणे येथे घरी येण्यासाठी निघालो होतो. इगतपुरी नंतर घाट लागला घाटात कोठेही नैसर्गिक विधी ( लघवी ) करण्यासाठी थांबणे योग्य न्हवते म्हणून तसाच पुढे आलो. कसारा गेल्यावर एकेठीकाणी रस्त्यावर पोलिस नेहमीच अडथळा उभारलेला असतो त्याच ठिकाणी एक पोलिस चौकी दिसली . गाडी थांबवली व चौकी मध्ये शिरलो व तेथील हजार असलेल्या पोलिसाला विचारले की स्वच्छतागृह कोठे आहे ? मला लघवीला जायचे आहे. त्या पोलिसाचे उत्तर ऐकून तर मला एक फार मोठा धक्का बसला . त्या चौकी मध्ये ना स्वच्छतागृह होते , ना एखादा नळ होता. मो त्या पोलिसाला विचारले की तुम्ही काय करता ? त्याचे उत्तर होते की सगळ्या प्रकारच्या नैसर्गिक विधींसाठी त्यांना बाहेर उघड्यावर ( निसर्गात ) जावे लागते . म्हणजे या पोलिसांना सगळ्या नैसर्गिक विधींसाठी खरोखरच निसर्गात जावे लागते. पुढे त्याने सांगितले की दिवसा एवढी अडचण येत नाही पण रात्री किंवा पावसाळ्यात त्यांना अतिशय त्रास होतो. रात्री प्राण्याची भीती असते.
मी ती चौकी (चिंतामणवाडी पोलिस चौकी, कसारा ) निरखून पाहत होतो तर माझ्या असे लक्षात आले की त्या चौकीला ना विटांच्या भिंती होत्या ना विटांचे छत होते. सगळी चौकी पत्र्यांनी बनविलेली होती. याचा अर्थ उन्हाळ्यात अति गरम व हिवाळ्यात अति थंड . मला तेथे जेवढा वेळ होतो तेवढ्या वेळात हि गर्मी मुळे असह्य होत होते.
तेथे नळ नव्हता म्हणजे पिण्याचे पाणी नाही. म्हणजेच सगळ्यासाठी पाणी बाहेरूनच आणावे लागते . त्या चौकी मध्ये दूरध्वनी ( LANDLINE ) नव्हती . मला असे कळाले की मोबाईल चे बिल हि पोलिसांना स्वतःलाच भाराव लागते. तेथे वीज होती पण माझ्या मते ती वीज हि दुसऱ्या कोठून तरी घेतली होती. त्या पोलिसाला सलाम करून तेथून पुढे निघालो .
वाटेत उजव्या हाताला एक पोलिस चौकी ( शिरोळ पोलिस चौकी , कसारा ) . गाडी थांबवून तेथे गेलो तर तेथेही अगोदर पाहिले तेच चित्र दिसले . तेथून काही अंतरावर इगतपुरी ला जाणाऱ्या वाटेवर , पण घाट लागण्या आधी एक लतीफ वाडी पोलिस चौकी ( घोटी पोलिसांच्या अंतर्गत ) आहे तेथेही हीच अवस्था आहे असे कळले .
तेथून मी ठाणे येथे पोहोचून साकेत वाटे ऐरोली ला जाताना राबोडी वाहतूक पोलिस चौकी दिसली ती चौकी तर CONTAINER मध्ये आहे. त्या चौकी मध्येही स्वच्छतागृह नाही , नळ नाही , अश्याच प्रकारे CONTAINER मध्ये ठाणे SATIS वाहतूक पोलिस चौकी व वर्तक नगर वाहतूक पोलिस चौकी आहे असे कळले . त्याच प्रमाणे तीन हाथ नाका येथे उड्डाण पुलाखाली एका छोट्याश्या prefabricated चौकोनी अशी एक छोटीसी पोलिस चौकी आहे . बहुतेक त्याला नौपाडा वाहतूक पोलिस चौकी असे नाव आहे.
जसे प्रत्येक नागरिकाला अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे माझ्या मते आपल्या या पोलिसांना पिण्याचे पाणी , प्रसाधन गृह , LANDLINE , या मुलभूत सुविधा तरी मिळाल्याच पाहिजे .
अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील अनेक पोलिस त्यांचे काम करीत असतात याचे खरोखरच कौतुक वाटते . अश्या या सगळ्या पोलिसांना माझा मानाचा सलाम.
माझी सगळ्या वाचकांना अशी विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून अश्या पोलिस चौकी मध्ये जावून कधी तरी या पोलिसांना एखादी तरी पिण्याच्या पाण्याची बाटली द्या. हे मी फक्त " लोकासांगे ब्रम्हद्यान .......... " नाही करत तर स्वतः वेळात वेळ काढून वाटेतल्या पोलिसांना थांबून पाण्याची बाटली देत असतो . 


श्वानदंशाचे भयावह चित्र

नमस्कार,

हि दोन छायाचित्रे जरूर पहा .

पहिल्या छायाचित्रात जे गृहस्थ दिसत  आहेत ते ५५ वर्षांचे आहेत व भटका कुत्रा चावल्यामुळे त्यांच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या आहेत.

दुसऱ्या छायाचित्रावरून आपल्याला भटका कुत्रा चावल्याची जखम किती खोल असू शकते हे कळेल.

हि छायाचित्रे डोंबिवली येथील डॉक्टर आनंद हर्डीकर यांनी पाठविली आहेत. हे गृहस्थ त्यांच्या रुग्णालयात भटक्या कुत्र्याच्या दंशावर उपचार करून घेण्यासाठी आले होते.

शासन अजून किती नागरिक श्वानदंशामुळे  जखमी होण्याची वाट बघणार हे काही कळत नाही.

भारत बहुतेक जगातील एकमेव असा देश असेल कि जेथे दिवसेंदिवस भटक्या कुत्रांमुळे श्वान दन्शांच्या घटना वाढत आहेत आणि त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांची संख्या हि अनेक पटीने वाढत आहे.

असे वाटते कि मानव प्राण्याला काही किंमत नाही पण भटका कुत्रा नावाच्या प्राण्याला मात्र भारतात फारच किंमत आहे.

मेरा भारत महा.....................न .