Sunday, August 12, 2012

Actaul Fact About Noise Pollution during Festivals

ध्वनिप्रदूषणप्रकरणी ठाण्यात दहीहंडी आयोजकांवर गुन्हे


- सकाळ वृत्तसेवा

Saturday, August 11, 2012 AT 11:46 PM (IST)

Tags: dahihandi, air pollution, thane

ठाणे - शुक्रवारी झालेल्या दहीहंडी उत्सवात ठाण्यातील सर्व महत्त्वाच्या दहीहंडी आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे भान ठेवले नसल्याचे आवाज फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले. विशेष म्हणजे दहीहंडीत पोलिसांच्या साक्षीने डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. काही ठिकाणी स्थानिक पोलिसांनी ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल दहीहंडी आयोजकांवर दरवर्षीप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.



आवाज फाऊंडेशनच्या वतीने यंदाही ठाण्यातील महत्त्वाच्या दहीहंडी उत्सवांतील आवाजाची तीव्रता मोजली. त्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी ध्वनिप्रदूषण झाल्याचे निरीक्षणही फाऊंडेशनने नोंदवले आहे. रस्त्यावर उत्सव साजरा करताना आवाजाची कमाल मर्यादा 45 डेसिबल इतकी असावी, असे बंधन सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे. पण राजकीय आयोजक कोणत्याही उत्सवात याचे भान राखत नसल्याचे वारंवार आढळते. आवाजच्या कार्यकर्त्या सुमेरा अब्दुला अली आणि ठाण्यातील नीलेश आंबेकर यांनी शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप केले. पाचपाखाडीत संघर्ष संस्थेच्या वतीने आयोजित उत्सवात आवाजाची तीव्रता 81 ते 96 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली. रात्री 9 च्या सुमारास कार्यकर्त्यांनी टेंभीनाका येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या उत्सवात आवाजाची पातळी 99 ते 101 डेसिबल इतकी आढळली. आवाजाची सर्वाधिक पातळी आमदार प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर येथे आयोजित केलेल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या उत्सवात होती. या उत्सवात आवाजाची पातळी 101 ते 105 इतकी होती, असे आवाजने अहवालात नमूद केले आहे.



रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या उत्सवांच्या संदर्भात आपण दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. परंतु जोपर्यंत उत्सवाबाबत लोकांमध्ये जागृती होत नाही, लोकांना हे पटत नाही तोपर्यंत हे थांबणे अशक्य असल्याचे मत याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.



रस्ते ब्लॉक

ठाणेकरांना या उत्सवात ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो, तसाच रस्त्यात वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागतो. संघर्षच्या दहीहंडीमुळे दोन-दोन दिवस रस्ते अडविले गेल्याने रहिवाशांची कोंडी होते. हे उत्सव साजरे होताना ठाणेकरांना वेठीस धरले जाते. या विरोधात आवाज उठविण्यासाठी ठाणेकरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नीलेश आंबेकर यांनी सांगितले. या प्रश्नावर एकत्र येऊ इच्छिणाऱ्या ठाणेकरांनी नीलेश आंबेकर - 9820032772 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment