आमचं कॉलेज वाचवा
Aug 31, 2012, 01.22AM IST
Maharashtra Times
संदीप शिंदे
कल्याणच्या कोळसेवाडीत राहणारा विश्वास आव्हाड पार्श्वनाथ कॉलेजात मॅकॅनिकल इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षात शिकतोय . विश्वासचे वडिल कल्याण रेल्वे स्टेशनजवळ भाजी विकून दिवसाकाळी कसेबसे शे सव्वाशे रुपये कमावतात . मात्र , मुलाच्या इंजिनीअरसाठी त्यांनी कष्ट उपसून पैसा उभा केला . गेल्या वर्षीची शिल्लक ३० हजार आणि यंदाची ६९ हजार अशा विश्वासची एक लाख रुपये फिचा डोंगर आजही त्यांच्या डोक्यावर आहे . हे पैसे कसेबसे जमवू . मग वर्षभरात मुलगा इंजिनीअर होईल . त्याला चांगली नोकरी लागेल आणि आपले हाल कायमचे संपतील अशी स्वप्न आव्हाड कुटुंब रंगवतंय . मात्र , आता या कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आल्याने त्यांना जबर हादरा बसलाय . कॉलेजची मान्यता रद्द व्हावी की नाही हा वादाचा विषय असला तरी त्यात बिच्चाऱ् या विश्वासची काय चुक ? रक्ताचं पाणी करून मुलाच्या शिक्षणासाठी पै पै गोळा करणारे वडिल आणि पोटाला चिमटा काढून घर चालविणाऱ् या विश्वासच्या आईनं कोणतं पाप केलंय ... ही व्यथा केवळ विश्वासच्या कुटुंबाची नाही . त्याच्यासारखीच या कॉलेजातील तीनचारशे गोरगरीब मुलं अक्षरशः रडकुंडीला आलीत .
१७ वर्षांपुर्वी इंजिनीअरिंग , फार्मसी आणि पॉलिटेक्निक अशा तीन अभ्यासक्रमांचा समावेश असलेले पार्श्वनाथ कॉलेज ठाण्यातील घोडबंदर रोडवर सुरू झाले . मात्र , माजी ट्रस्टींच्या अभद्र कारभारामुळे इथल्या शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला . विद्यार्थी आणि शिक्षकांनी निकराने लढा देत या वादग्रस्त ट्रस्ट्रींना हद्दपार करून कॉलेजच्या कारभाराला शिस्त लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केले . मात्र , कॉलेजच्या इमारतीला भोगवाटा प्रमामपत्र ( ओसी ) नाही . जमिनीची मालकी व्यवस्थापनाकडे नाही असे अशैक्षणिक मुद्दे उपस्थित करून २०१० साली आयसीईटीने कॉलेजती मान्यता रद्द करण्याचे फर्मान काढले . न्यायालयीन लढाईत हाय कोर्टानेही गेल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केले . इथल्या सुमारे १४०० विद्यार्थ्यांना अन्य इंजिनीअरींग कॉलेजमध्ये प्रवेश देऊन हे कॉलेज बंद करा असे निर्देष कोर्टाने युनिव्हर्सिटी आणि डीटींना दिले आहेत . मात्र , ही स्थलांतराची प्रक्रीया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आता ती हाती घेतली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते . तसेच , पार्श्वनाथच्या निर्णयाचा आधार घेत जर कुणी राज्यातील ओसी नसलेल्या आणि जमिन मालकीचा वाद असलेल्या कॉलेजांवर बंदी घालण्याची मागणी केली तर अनेक कॉलेजांवर बंदीचे संकट ओढावण्याची भितीही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे .
गेल्या वर्षी पार्श्वनाथच्या पॉलिटेक्नीक आणि फार्मसी कॉलेजची मान्यता रद्द झाली होती . मात्र , एक वर्ष संपुन दुसरे सुरू होण्यापुर्वी हे आदेश आले होते . त्यामुळे विभागांमधल्या ६८० विद्यार्थ्यांना अन्य कॉलेजांमध्ये प्रवेश देणे सोईचे झाले . मात्र , प्रवेश प्रक्रीया पुर्ण करून १६ जुलै रोजी इंजिनीअरींग कॉलेज सुरू झाले आहे . आता इथल्या 1400 विद्यार्थ्यांचे अन्य कॉलेजांमध्ये स्थलांतर करायचे म्हंटल्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल . त्या प्रक्रियेत पहिल्या टर्मच्या अभ्यासाचा बट्याबोळ होऊ शकतो . तसेच , शेवटच्या वर्षाला शिकणा ऱ् या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टसाठी तयार केलेले ग्रुप फुटून हे विद्यार्थी अडचणीत येऊ शकतात . एआयसीटीईने कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांची अन्य कॉलेजांमध्ये सोय करण्याची जबाबदारी युनिव्हर्सिटी आणि डीटींवर येऊन पडणार आहे . विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत अंधेरीतले चिनॉय कॉलेज सरकारने मॅनेजमेंटला बंद करू दिले नाही . मग , पार्श्वनाथ कॉलेज चालविण्यास मॅनेजमेंट तयार असताना इथल्या विद्यार्थ्यांचे हित सरकारला कळत नाही का , असा सवाल उपस्थित केला जातोय . एआयसीटीई ही केंद्रिय स्तरावरची संस्था असली तरी मुंबई युनिव्हर्सिटी आणि डीटींनी या विषयातले गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांची बाजू कोर्टासमोर प्रभावीपणे मांडली नाही असाही आक्षेप नोंदवला जातोय .
ज्या इमारतीला ओसी नाही असा ठपका एआयसीटीईने ठेवला आहे तिथे २००८ साली कॉलेजचे स्थलांतर झाले होते . त्यानंतर २००९ साली कोणतेही आढेवेढे न घेता एआयसीटीईनेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इनटेक क्षमता २८० वरून ३६० इतकी वाढवली . त्याशिवाय सिव्हिल इंजिनीअरींगची नवी शाखाही सुरू करण्याचीसुध्दा अनुमती दिली . तेव्हाच ओसीचा मुद्दा उपस्थित करून कॉलेजची मान्यता रद्द केली असती तर आज हा गदारोळ माजलाच नसता . तसेच , गेली दोन्ही वर्षे इंजिनीअरींग प्रवेशाच्या आदल्या दिवसापर्यंत पार्श्वनाथचे नाव कॅप राऊंडमध्ये असायचे . ऐनवेळी ते गाळले गेले . त्याशिवाय डीटी आणि एआयसीटीईच्या यंदाच्या अहवाल पत्रांतल्या मान्यताप्राप्त कॉलेजांच्या यादित पार्श्वनाथचे नाव आहे . तर , त्यातून विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात धुळफेक झाली त्याला जबाबदार कोण ? २०१० पुर्वी जेव्हा एका इमारतीत तीन - तीन कॉलेज भरवली जायची . माजी ट्रस्टी मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशासाठी पाच - पाच लाख रुपयांचे डोनेशन उकळत होते . अन्यायग्रस्त विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आंदोलनं करत होते . तेव्हा एआयसीटीईला इथल्या कारभारावर कोणताही आक्षेप नव्हते . मात्र , आता एका कॉलेजसाठी तीन सुसज्ज इमारती उभ्या राहिल्यात . तीन वर्षात एका नव्या पैशाचेही डोनेशन विद्यार्थ्यांनी दिलेले नाही . उलट गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते . शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीच नव्हे तर विद्यार्थीदेखिल इथल्या व्यवस्थेवर समाधानी आहेत . मग , आताच एआयसीटीच्या डोळ्यात इथला कारभार का खुपतोय . ९ एप्रिल , २०१० रोजी इथल्या भ्रष्ट आणि वादग्रस्त ट्रस्टींना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर महिन्याभरातच कॉलेजची मान्यता रद्द करण्याची नोटीस देण्यामागचे गौडबंगाल काय , असे सवाल उपस्थित करून इथल्या प्राध्यापकांनी एआयसीटीईच्या कारभारावरच संशय व्यक्त केला आहे .
पार्श्वनाथ कॉलेज ज्या चार एकर जागेवर उभे आहे तीला सोन्याचा भाव ( आजच्या बाजारभावानुसार ४५ ते ५० कोटी ) आहे . वादग्रस्त माजी ट्रस्टी आणि ठाण्यातल्या काही पुढा ऱ् यांचा त्यावर डोळा होता . परंतु , विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभेद्य एकजूट दाखवून त्यांचा डाव हाणून पाडला . बँकेकडे गहाण पडलेली जागा विद्यमान ट्रस्टींनी लिलावत विकत घेतली असून ती धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरीने लवकरत कॉलेज व्यवस्थापनाच्या नावे होणार आहे . ठाणे महापालिकेने कॉलेजच्या इमारतीला ओसी देत कॉलेजच्या मार्गातला मोठा अडसर दुर केलाय . हाय कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आले आहे . कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही फेसबुक आणि व्टिटरच्या माध्यामातून कॉलेज वाचवण्याची मोहिम हाती घेतली आहे . राष्ट्रपतींपासून ते नगरसेवकापर्यंत हजारो लोकांना तसे ई मेल धाडले जात आहेत . विद्यार्थ्यांच्या पाठी उभे राहण्याचे आश्वासन युवा सेनेने दिले आहे . चुका कोणाच्याही असतील त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी नको एवढीच साऱ् यांची अपेक्षा असली तरी या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या अनागोंदीचा जो नमुना समोर आला आहे तो धक्कादायक आणि दुर्देवी आहे .