घोडबंदरच्या प्रदूषणावर नॅचरल गॅसचा उतारा!
6 Jan 2010, 0115 hrs IST
- म. टा. प्रतिनिधी
घोडबंदर रोडवरील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मेटाकुटीला आलेल्या रहिवाशांच्या लढ्याला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या कोळशाचा वापर करत असून त्यांनी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर केला तर प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे. या परिसरातील कंपन्यांनी कोळशाचा वापर बंद करण्यास सहमती दर्शवली असून महानगर गॅसनेही त्यांना आवश्यक असलेल्या गॅसचा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे.
घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाइल कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातील प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातील रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध हवेसाठी लढा देत आहेत.
भाजपचे आमदार संजय केळकर या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनस्तरावर प्रयत्न करण्यासह केळकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनताही हा प्रश्न मांडला होता. तसेच, चार महिन्यांपूवीर् रवी टेक्सटाइल या कंपनीच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाले आहे. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली. जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे, तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही, हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे, अशी मागणी केळकर यांनी केली.
त्यानंतर २ जानेवारी रोजी ठाण्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात संजय केळकर यांच्यासह स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी सत्यजित शहा, सुहास पोतनीस, दीपाली पाटील, मैथिली चंदवणकर, नैसगिर्क गॅस कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मोहेकर उपस्थित होते. त्या बैठकीत नैसगिर्क गॅस वापरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. येत्या दोन महिन्यांत या गॅस पुरवठ्यासाठी आणि कंपन्यांना तांत्रिक बदल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या घोडबंदरवासियांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment