Tuesday, January 5, 2010

News Appeared in LOKSATTA dt. 6th Jan.2010

Loksatta

6th Jan 2010

प्रदूषण रोखणे व पाणी बचतीसाठी आमदार केळकर यांचा पुढाकार
ठाणे/ प्रतिनिधी
पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊ न प्रचार करताना शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पदवीधर मतदारसंघातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. घोडबंदर तसेच वागळे इस्टेट परिसरात कारखान्यांच्या प्रदूषणाचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाण्यातील नागरिकांनी आंदोलन केले होते. जोपर्यंत कोळशाचा वापर होत राहील, तोपर्यंत प्रदूषण होणार, तसेच ग्लोबल वॉर्मिगला देखील कोळशाच्या ज्वलनाने भर पडते. त्यासाठी नैसर्गिक गॅस कारखान्यांना देखील उपलब्ध करून देण्याची मागणी केळकर यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत माहिती देण्यासाठी केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे भाजपा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर अ‍ॅड. सुभाष काळे उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर १८ हजारांचे कर्ज आहे. राज्यासाठी सर्वंकष असे गृह, क्रीडा, सांस्कृतिकविषयक धोरण राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली. सध्या विविध कामांसाठी जेएनआरयूएमअंतर्गत पैसे पालिकेला मिळतात, मात्र त्या खर्चापैकी अर्धा खर्च पालिकेला करावा लागतो. एवढा खर्च करण्याची तयारी पालिकांची नाही, त्यामुळे हे पैसे अनुदान म्हणून देण्याची मागणी केळकर यांनी शासनाला केली. कोकणात फयानग्रस्त झालेल्या शाळा व महाविद्यालयांना नुकसानभरपाई नव्हती, त्या संदर्भात आवाज उठवल्यावर महसूलमंत्री नारायण राणे यांनी शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालय सुरू न झाल्याबद्दल अधिवेशनात विचारणा केल्यावर २६ जानेवारीपूर्वी त्याचे उद्घाटन करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. खेळाडूंना प्रतिदिन फक्त ४० रुपये भत्ता मिळतो, तो वाढवला तर खेळाडू जगतील, याकडे केळकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. तसेच नागरी संरक्षण दलात काम करणाऱ्यांना होमगार्डच्या प्रमाणात भत्ता व हत्यारे मिळावी अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली.

No comments:

Post a Comment