Friday, July 16, 2010

News appeared in LOKSATTA dt.15th July, 2010

घोडबंदरवासीयांना केव्हा मिळणार मोकळा श्वास?
राजीव कुळकर्णी, गुरुवार, १५ जुलै २०१०
rajeev.kulkarnee@expressindia.com
ठाणे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर निसर्गरम्य वातावरण, घराजवळच शाळा, रुग्णालये, शॉपिंगसाठी मॉल, विविध बँकांच्या शाखा अशा आकर्षक जाहिरातबाजीला भुलून हजारो कुटुंबांनी घोडबंदर रोड, माजिवडा, कोलशेत रोड, ब्रह्मांड, बाळकुम परिसरात फ्लॅट घेतले. पण निवासी परिसरात भीषण वायू प्रदूषण पसरविणाऱ्या काही कंपन्या आहेत, हे समजल्यानंतर गेली सात वर्षे या भागातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले व त्यानंतर या वायू प्रदूषणाविरोधात लढाई सुरू केली. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्य सरकारी यंत्रणांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा संघर्ष किती काळ चालेल, हे सांगणे मात्र अवघड आहे.
घोडबंदर रोड व त्या पट्टय़ातील काही भागांत प्रदूषणाच्या विळख्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर, सूक्ष्मकण आणि श्वास घेणे अवघड करणारा उग्र दर्प यामुळे अनेक सोसायटय़ांमधील रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. यातून काहींना श्वसनाचे तर काहींना त्वचाविकार जडले आहेत. रोजचे जगणे अवघड करणाऱ्या या कंपन्यांविरोधात सुरुवातीस तत्कालीन पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. पण त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांच्याकडे त्रस्त रहिवासी गेले. एक-दोन वेळा त्यांनी प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रे घेऊन पाहणी केली. मग वाढत्या दबावामुळे नरेंद्र सिल्क मिल या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. पण तरीही उग्र दर्पाचा वायू व काळ्याकुट्ट धुरापासून रहिवाशांची सुटका होत नव्हती.
हाइड पार्क सोसायटीतील जागरूक रहिवासी सत्यजित शहा यांनी मग हा लढा तीव्र केला. श्रुती पार्क, ओस्वाल पार्क, रुणवाल रिजन्सी, ऊर्वी पार्क, परमेश्वरी पॅरेडाइज, ऑर्किड्स आदी सोसायटय़ांमधील मैथिली चेंदवणकर, दीपाली पाटील, सत्यजित आहेर, सुहास पोतनीस, शंकर तलवार, सुनील बारहाते यांसारखे सहकारी त्यांना मिळाल्याने संघर्षांला धार आली. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गतवर्षी प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी आंदोलन झाले. या आंदोलनात महिला व मुलेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘शुद्ध स्वच्छ हवा, मिळणार आम्हाला केव्हा’, ‘घोडबंदर रोड भोपाळ होण्यापासून वाचवा’, ‘प्रदूषणाचा लागला फास, केव्हा मिळणार मोकळा श्वास’ असे फलक या आंदोलनात झळकले होते.
अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नरेंद्र सिल्क मिलवर कारवाई केली. ही कंपनी बंद झाली तरी अन्य दोन ते तीन कंपन्या अव्याहतपणे प्रदूषण फैलावण्याचे काम करीत आहेत. कंपन्या बंद करून कामगार देशोधडीला लागू नयेत, अशीच आमची इच्छा आहे. या कारखान्यांची प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती सामुग्री बसवावी व जनसामान्यांना स्वच्छ हवा मिळू द्यावी, यासाठीच आम्ही लढत असल्याचे सत्यजित शहा यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment