प्रदूषण इथले संपत नाही
31 Mar 2010, 0218 hrs IST
- म. टा. प्रतिनिधी
प्रशासनाने घोडबंदरवरील कंपन्यांना प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नॅचरल गॅस पुरवणे अशक्य झाल्याने या भागातील प्रदुषणाची परिस्थिती 'जैसे थे' आहे.
घोडबंदर येथील रवी स्टील आणि शांती टेक्सटाईल या कंपन्यांमधले प्रदूषण सातत्याने सुरुच असून त्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशी संतापले आहेत. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाईल कंपन्यांमधून सोडल्या जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातली प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी तीन वर्षांपासून शुद्घ हवेसाठी लढा देत आहेत.
रवी टेक्सटाईल या कंपनीतल्या प्रदुषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाल्याची माहिती शुद्ध हवेसाठी लढा उभारणाऱ्या सत्यजीत शहा यांनी दिली. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली.
जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. हा गॅस उपलब्ध झाल्यानंतर प्रदूषण आटोक्यात येईल असे रहिवाशांना वाटत होते. परंतु, हा गॅसचा पुरवठाच अशक्य असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येथील लोकांची प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारी यंत्रणांनी कठोर कारवाई केली तर हे प्रदुषण बंद होईल. परंतु, हे विभाग थातुरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याने ही समस्या चिघळल्याचा आरोपही सत्यजित शहा यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment