आता चेंडू रेल्वेच्या कोर्टात !
..तरच विटाव्यातील वाहतूक कोंडी सुटेल!
ठाणे/प्रतिनिधी
ठाणे आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रोडवरील विटावा येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या रेल्वे मार्गाखालील पुलाचे काम गेली तब्बल सहा वर्षे रखडले असून रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू असताना गाडय़ांना ताशी २० किलोमीटरची वेगमर्यादा आणि प्रत्येक ट्रॅकखाली बॉक्स पुश करण्यासाठी तीन तासांचा ब्लॉक देण्याची वाट महापालिका प्रशासन पाहत आहे. येत्या काही दिवसांत ही मंजुरी मिळाली तरच पावसाळ्यापूर्वी विटावा पुलाचे काम पूर्ण होऊ शकेल, अन्यथा पुन्हा पावसाळ्याचे चार महिने वाट पाहावी लागणार आहे.

ठाणे-बेलापूर रस्ता ३० मीटर रुंद असला तरी सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाची रुंदी केवळ ८ मीटर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची कोंडी होते. ती कोंडी सुटण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी २००२ मध्ये ठाणे-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान नवा पूल (आर.यू.बी.) बांधण्याचे काम निश्चित करण्यात आले. त्याच्या पुढच्याच वर्षी २००३ मध्ये या प्रकल्पाची वर्क ऑर्डर काढण्यात आली. २००५ मध्ये जवळजवळ अर्धे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर रेल्वेने या कामाच्या आराखडय़ात काही बदल सुचविले. शासकीय पुलावरील स्लॅबऐवजी सीमेंट बॉक्स बसवावेत, असे रेल्वे प्रशासनाने सुचविले. त्यानुसार महापालिकेने आता सीमेंट बॉक्स तयारही केले आहेत. मात्र रेल्वेने अद्याप गती नियमन आणि ब्लॉकची परवानगी दिलेली नाही.
रेल्वे आणि महापालिका यांच्या या टोलवाटोलवीत या मार्गाने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ आणि लाखो रुपयांचे इंधन वाया जात आहे. अनेक वर्षे या पुलाचे काम रखडल्याने आता त्याचा खर्चही तब्बल चार कोटीेंनी वाढला आहे. रेल्वेने मान्यता दिल्यानंतर तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. अर्थात येत्या काही दिवसांतच तशी परवानगी दिली तरच त्याचा उपयोग आहे. कारण पावसाळा तोंडावर आला आहे. या पुलामुळे आता आहे त्यापेक्षा तब्बल दुप्पट लांबीचा मार्ग वाहनांना रेल्वे मार्गाखालून ये-जा करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
या पुलामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या फार मोठय़ा प्रमाणात सुटणार आहे.
एकूणच दोन प्राधिकरणे मिळून हे प्रकल्प राबविले जातात, तेव्हा त्यात ‘अनेकदा सरकारी काम आणि सहा महिने थांबह्ण असा नागरिकांना अनुभव येतो. ठाणेकरांनी याचा अनेकदा अनुभव घेतला आहे.
कोपरी पुलाचे काम असो वा रेल्वे स्थानकातील तिसऱ्या पादचारी पुलाचे, ठाणेकरांच्या पदरात कायम निराशाच पडली आहे. विटावा पुलाचे बांधकाम हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
खरे तर या पुलाचे अर्धेअधिक काम २००५ मध्येच पूर्ण झाले होते. रेल्वेने वेळीच आवश्यक ते बदल सुचवून परवानग्या दिल्या असत्या तर चार वर्षांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला असता. दोन प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ते काम रखडले आहे.
No comments:
Post a Comment