Please go through following article of Shri. Chandrahas G Tavde - Thane published in Thane vrutant of LOKSATTA dt. 15th Aug. 2010. He also fight against various issues. We all shoud support him in his fights.
कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
नेमेचि येतो मग पावसाळा.. त्याप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यात रंगणाऱ्या कथा म्हणजे रस्त्यातील खड्डेपुराण! रस्त्यात पडलेल्या खड्डय़ांच्या चर्चा पावसाळ्यात त्यात पाणी साचल्यामुळे अधिक चवीने (किंबहुना चवताळून) चघळल्या जातात. नेहमीप्रमाणे संबंधित महापालिका किंवा नगरपालिका अगदी राष्ट्रीय कर्तव्य पाळल्याप्रमाणे लोकहितास्तव (?) घाईघाईने जागे झाल्याप्रमाणे हे खड्डे बुजविण्याचे नाटक करणार. पुढील वर्षी हा रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्यात आला तर ठीक अन्यथा पुन्हा पावसाळ्यात तीच रडकथा (की खड्डेकथा)! हे आजचेच नाही, तर गेली कित्येक वर्षे चाललेले आहे. या खड्डय़ांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे किती त्रास होतो, त्याची ना लाज ना लज्जा! सर्वसामान्य जनतेसाठीची खड्डेकथा या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना वा कंत्राटदारांना मात्र वैभवलक्ष्मी कथाच! पावसात साचलेल्या पाण्यामुळे खड्डय़ांचा अंदाज न आल्याने रिक्षांचे, बसचे तसेच खासगी वाहनांच्या धक्क्यांमुळे होणारे नुकसान याचा अंदाज कधी कोणी केलाय? या सार्वजनिक तसेच खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल तर बघायलाच नको! त्यातूनही रिक्षातील प्रवास अधिकच धोकादायक. विशेष करून गरोदर महिलांना. अशा या खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना शिव्या घालत लोक ‘टोल’ भरतात. या रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल यांचे कंत्राट घेणाऱ्या या कंत्राटदारांना ‘टोल’ वसूल करताना शरमही वाटत नाही. या खड्डय़ांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. नेमकी पावसाळ्यातच अशी खड्डे भरण्यासाठी तातडीने कंत्राटे दिली जातात. ऐन पावसात अशी कामे डांबरीकरण करून करता येत नसल्याने मग पेव्हरब्लॉकचे तुकडे, माती, ग्रीट अशा वस्तूंनी तात्पुरते खड्डे भरतात. मग पुन्हा ते उखडतात. पावसात कोल्ड मिक्स, तर इतर वेळी हॉटमिक्स पद्धतीने योग्य त्या प्रमाणात कार्बन कोर वापरून करावयाच्या रस्तेदुरुस्तीसाठी प्रत्यक्षात काय मटेरियल वापरले जाते, ते या कंत्राटदारांना व अभियंत्यांनाच माहीत. तातडीचे काम म्हणून मग लेखी कार्यादेशाऐवजी तोंडी आदेश देऊनही ही लाखो-करोडोंची दुरुस्तीची कामे पार पाडली जातात.
मात्र आतापर्यंत चाललेले हे साठा उत्तरी खड्डे व रस्ते दुरुस्तीपुराण आता थांबवायलाच हवे. रस्ते बनवितानाच ते योग्य त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे बनविले जात आहेत, हे पाहण्यासाठी विशेष तंत्रज्ञांची नेमणूक करावयास पाहिजे. त्याचे नमुने लॅब टेस्टिंगमध्ये तपासून त्याचे प्रमाणपत्र जारी केले पाहिजे. यासाठी मुंबईत उच्च न्यायालयाने नेमलेल्या स्टॅग कमिटीप्रमाणे ठाण्यातही नागरिकांची/तंत्रज्ञांची सुकाणू समिती नेमली पाहिजे. या कामात दिरंगाई, हेळसांड अथवा कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दिवाणी तसेच फौजदारी कारवाई करावयास हवी. प्रसंगी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटलाही दाखल करावयास हवा.
मी स्वत: माहिती अधिकार कायद्याखाली बरीच माहिती गोळा करीत आहे. काही माहिती हाती आलीही आहे. गेल्या १० वर्षांत रस्ते तयार करणे व रस्ते दुरुस्त करणे या कामी झालेल्या सर्व खर्चाची भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली चौकशी, ग्राहक संरक्षण अधिनियमाखाली दावे, तसेच मोटारवाहन अधिनियम (प्रवाशांवरील कर) आणि निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाखाली व जनतेच्या पैशाच्या अशा प्रकारे गैरवापर केल्याप्रकरणी प्रवासी संघातर्फे दावे दाखल करणार आहे. प्रसंगी जनहित याचिकाही दाखल करणार आहे आणि या सर्व रस्ते बांधणी व रस्तेदुरुस्ती प्रकरणास एका तर्कसंगत अंतास (लॉजिकल एन्ड) नेण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व नागरिकांची व पत्रकारांची साथ व प्रतिसादाची अपेक्षा आहे.
- चंद्रहास गो. तावडे,
ठाणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment