प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस उद्योगमंत्री अनुकूल
कल्याण/प्रतिनिधी
डोंबिवली, अंबरनाथ औद्योगिक परिसरात प्रदूषण करणाऱ्या कारखाने मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कंपन्या बंद करून कामगारांना देशोधडीला लावू नये, प्रदूषण करणाऱ्या सर्व यंत्रणा सुस्थितीत करण्यात याव्यात, या खासदार आनंद परांजपे यांच्या मागण्या उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एका बैठकीत मान्य केल्या.
डोंबिवली परिसरातील प्रदूषणाबाबत खासदार परांजपे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार परांजपे यांनी एमआयडीसीतील तुटलेल्या वाहिन्या, उघडे नाले, चेंबर्स यांचे फोटो मंत्र्यांना दाखविले.
खासदार परांजपे यांच्या सूचनांची दखल घेत मंत्री राजेंद्र दर्डा यांनी रसायन वाहून नेणाऱ्या वाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात, उद्योगांना सीएनजी, एलपीजीद्वारे पुरवठा करावा, पेट्रोकोकचा वापर टाळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश दिले.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी चिखलोली धरण परिसरात सक्सेरिया व फुक्स लिर्बेकंटे या कंपन्या आपले प्रकल्प सुरू करून अंबरनाथमधील नागरिकांचे जीवन धोक्यात आणत असल्याचे लक्षात आणून दिले.
या कंपन्यांना एमआयडीसी व एमपीसीबीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
२७ गावांमधील थकीत पाणीपट्टीबाबत मंत्री दर्डा यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना एखादी नवीन योजना देऊन नव्याने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना खासदार परांजपे यांनी केली. मासिक हप्ता भरून नवीन नळ जोडणीस मंत्र्यांनी मान्यता दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment