कोपरी द्रुतगती मार्गासाठी आंदोलनाचा इशारा Nov 28, 2013, 08.50AM IST ठाणे : कोपरीहून मुंबईकडे जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या १० वर्षांपासून रखडले असून , हा मार्ग अरुंद असल्याने दरोरज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे १० वर्षांत या कामाची किंमत ९ कोटींवरून ५० कोटींवर गेली असल्याची माहिती माजी आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. एका महिन्याच्या आत रुंदीकरणाचे काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा केळकर यांनी रेल्वे प्रशासन आणि पीडब्लूडीला दिला आहे. ठाण्यात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमआरसीच्या वतीने घोडबंदर परिसरामध्ये चार मोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. एकीकडे घोडबंदर रस्त्याचा विकास होत असताना कोपरी येथून मुंबईकडे जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मात्र २००३ पासून रखडले आहे. कोपरी पुलाच्या खालून रेल्वेमार्ग असल्याने कामासाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. हे रुंदीकरण कशाप्रकारे होणार आहे याचे नकाशेदेखील रेल्वे प्रशासनाला पीडब्लूडीने सादर केले आहेत. मात्र या कामासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक न दिल्याने रुंदीकरणाचे काम सुरू झालेले नाही. २००३ साली हे काम करण्यासाठी ९ कोटींच्या निधींची आवश्यकता होती. पीडब्लूडी आणि रेल्वे प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे या कामाची किंमत आता ५० कोटींवर गेल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली. दक्ष नागरिक सत्यजित शाह यांनीही अनेकदा या कामासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. सप्टेंबर महिन्यात पीडब्लूडीच्या वतीने रेल्वेला यासंदर्भातील पत्र दिले आहे.
Thursday, November 28, 2013
Subscribe to:
Posts (Atom)